दिल तो बच्चा है! : काका तुझी जात कोणती ?

Caste
Caste

‘काका तुझी जात कोणती रे?’ नऊ वर्षाची चिमुरडी अशी म्हणाली आणि माझे डोळेच मोठे झाले. ज्या वयात तिनं तुझा आवडता रंग कोणता, आवडतं कार्टून कोणतं, आवडता खाऊ कोणता असे प्रश्‍न विचारायला हवेत त्या वयात तिनं मला माझी जात विचारली होती. आता हिच्या डोक्‍यातून जात काढली पाहिजे या विचारानं मी प्रेमानं तिच्या डोक्‍यावरून हात फिरवला आणि म्हणालो, ‘अगं बाळा, मला माझी जात माहितीच नाही.’ त्यावर नाटकी तोंड करत ती म्हणाली, ‘हां, गप्प बस. खोटं नको बोलू. प्रत्येकाला जात असते. माझ्या पप्पांच्या शाळेच्या दाखल्यावरपण जात आहे आणि पप्पा म्हणतात, आपल्याला आपल्या जातीचा अभिमान असला पाहिजे. तुझ्यापण दाखल्यावर जात असेल. तू नीट पाहिली नसेल.’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आता हिच्यापुढं काय बोलणार? भलतीच ॲडव्हान्स पोरगी होती. जात कुठं असते याचीही तिला माहिती होती. मी म्हणालो, ‘मला सांग समजा तू घरी येताना तुझी स्कूलबॅग पाण्यात पडली. त्यामध्ये तुझ्या शाळेचा दाखला आणि मार्कशीट असेल. तर तुला शाळेचा दाखला भिजल्यावर वाईट वाटेल की मार्कशीट भिजल्यावर?’ पोरगी विचारात पडली. क्षणभर विचार करून म्हणाली, ‘अरे काका, मी माझं मार्कशीट तर सगळ्या गल्लीला दाखवते. तुला माहितीये सेमिस्टर वनला तर मी क्‍लासमध्ये टॉपर होती. माझं मार्कशीट पाहून शेजारच्या काकांनी मला पेढे दिलते. मम्मीने तर मार्कशीटची पूजा केली आणि म्हणाली, असेच मार्क पडले तर मोठी झाल्यावर तू डॉक्‍टर बनशील. त्यामुळं मार्कशीट भिजू नये असंच मला वाटेल.’ 

मला तिच्या तोंडून पाहिजे ते उत्तर मिळालं होतं. मी म्हणालो, ‘अगं, पण तुझे पप्पा म्हणतात जातीचा अभिमान वाटायला पाहिजे आणि शाळेच्या दाखल्यावर जात असते ना? मग शाळेचा दाखला भिजल्यावर पप्पा रागावणार नाहीत का?’ पोरगी क्षणभर गोंधळात पडली. विचार करून म्हणाली, ‘अरे पण काका, मी दवाखाना टाकल्यावर भिंतीवर तर डॉक्‍टर झाल्याचं मार्कशीटच लटकवेल ना? शाळेचा दाखला नाही लावणार. ते शितोळे डॉक्‍टर आहेत ना, त्यांच्या दवाखान्यात त्यांनी त्यांची मार्कशीटच लावली आहे. मी पाहिली होती.’

लहान लेकरांना मी त्यांच्याच भाषेत समजावून सांगितलं होतं. आपण जिंकलोय असा फिल माझ्या तोंडावर येत होता. अभिमानानं छाती फुलून आली होती. नऊ वर्षाच्या चिमुरडीला आपण बोलण्यात हरवलंय अशा विजयी भावात मी तिथून उठणार तोच पोरगी म्हणाली, ‘पण काका, समजा शाळेचा दाखला पाण्यात भिजला तर आपली जात वाहून जाते का?’ पोरीनं शेवटी असा एक बाऊन्सर टाकला की मी निःशब्दच झालो. आता तिला कोणत्या तोंडाने सांगू की शाळेचा दाखलाच काय, आपला मेंदू जरी पाण्यात भिजत ठेवला तरी डोक्‍यातली जात वाहून जात नाही. कागदावरची कुठून जाणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com