दिल तो बच्चा है! : गुलिगत धोका दिला राव तिनी

दिल तो बच्चा है! : गुलिगत धोका दिला राव तिनी

कुणाच्या प्रेमकथा कशा असतील काही नेम नसतो. परवा रात्री एका मित्राने फोन केला. रात्री अकरा वाजता कॅनॉलच्या कट्ट्यावर बसल्या बसल्या दारू पेत होता. त्याच्याकडं गेलो तर तो मोठमोठ्यानं रडायला लागला. काय करावं कळेना. म्हणाला, ‘तुला माझी लव्हस्टोरी माहितीये ना?’ मी होकार दिला. तर म्हणाला, ‘सांग काय स्टोरीहे माझी?’ मी म्हणालो, ‘अरे, तुझं एका ख्रिश्‍चन मुलीवर प्रेम होतं आणि तिनं तुला धोका देऊन दुसऱ्या मुलाबरोबर लग्न केलं.’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तसा डोळे पुसत म्हणाला, ‘तुला आठवतंय आपल्याला सव्वापाच हजार पगार होता, तेव्हा मी तिला बारा हजार रुपये शॉपिंगसाठी दिले होते.’ मी म्हणालो, ‘अरे हो, त्यावेळी तिनं तुला अडीचशे रुपयांचा शर्ट घेतला होता आणि आभाळ ठेंगणं झाल्यासारखं सात दिवस रोज तू तोच शर्ट घालत होता.’ ते आठवल्यावर मला गालातल्या गालात हसू येत होतं. ‘माझं लग्न जमलंय अर्जंट ये,’ असं म्हणत तिनं ह्याला रात्री घराखाली बोलवलं होतं. हा गडी रात्रभर तिच्या घराखाली बसला होता. तिनं मोबाईल बंद करून ठेवलेला आणि सकाळी हसत म्हणाली, ‘तू माझ्यावर खरं प्रेम करतो का हे मी चेक करत होती.’

दोस्त निव्वळ प्रेमवेडा झाला होता. छान प्रेमप्रकरण सुरू असताना तिनं अचानक याला व्हॉटस्ॲपवर लग्नाचा फोटो पाठवला आणि याला कामावरच चक्कर आलेली. मला सगळं आठवत होतं. नंतर त्या मुलीला जुळी मुलं झाली. याला दारू प्यायची सवय लागली. तिचा नवरा दुबईला गेला आणि तिनं पुन्हा याला कॉल केला. पुन्हा भेटीगाठी सुरू झाल्या. पुन्हा प्रेमप्रकरण सुरू झालं. ती नवऱ्याच्या नावानं खडे फोडत होती. तेव्हा याच्यातला प्रेमवीर जागा झाला.

हा गडी म्हणाला, ‘मी तुझ्या दोन्ही लेकरांना सांभाळायला तयार आहे, नवऱ्याला दे सोडून.’ तिनं खरोखरच नवऱ्यासोबत घटस्फोट घेतला. याला पुन्हा आभाळ ठेंगणं झालं. नवऱ्याला सोडून एक वर्ष ती आईबाबांकडं राहिली. तोपर्यत यानं नवीन घर घेतलं. घरच्यांना पटवलं. आयुष्याचं सार नियोजन करून ठेवलं. त्यावरून मी त्याला शिव्याही घातल्या होत्या. तसा डोळ्यातलं पाणी पुसत तो म्हणाला, ‘तुला माहितीये आज काय झालं?’ मी नकार दिला तसा तो म्हणाला, ‘आज आम्ही लॉजवर भेटलो. तिनंच ऑनलाइन बुकिंग केलं होतं. आम्ही लॉजवर गेलो. अर्धा तास झाला असेल तोच रूमचा दरवाजा वाजला. मला वाटलं वेटर टॉवेल किंवा साबण घेऊन आला असेल. म्हणून मी आहे त्या अवस्थेत थोडा दरवाजा उघडला तर एका अनोळखी पुरुषानं दारावर लाथ घातली. खोलीत येऊन कमालीच्या रागानं मला चोप चोप चोपू लागला.

तुला माहितीये तो कोण होता?’ मी म्हणालो, ‘दुबईवाला होता का?’ त्यानं नकार दिला. मी म्हणालो, ‘तिचा भाऊ होता का?’ नकार देत त्यानं दारूची बाटली तोंडाला लावली गटागट दारू पेला. संपलेली बाटली कमालीच्या रागानं कॅनॉलमध्ये फेकत म्हणाला, ‘आरं तो माणूस मला लाथा घालत फोटो दाखवत होता. हिनं दोन महिन्यापूर्वी त्याच्याबरं लग्न केलं होतं आणि लॉजच्या ऑनलाइन बुकिंगच नोटिफिकेशन त्याला गेलं होतं. तो तिचा दुसरा नवरा होता, दुसरा नवरा. गडी आम्हाला शोधत लॉजवर आला होता. गुलिगत धोका दिला राव त्या पोरीनी, लय धोका दिला.’

असं म्हणत गडी वर तोंड करून घोगऱ्या आवाजात रडू लागला. मला मातीत लोळून हसावं वाटत होतं. मला आभाळाकडं पाहत मोठमोठ्यानं हसावं वाटत होतं. मला कपडे फाडून हसावं वाटतं होतं. परंतु, समोर धाय मोकलून रडणारा मित्र पाहून मी कंट्रोल केलं. हाताचं बोट कडकडून चावत शांत राहिलो आणि त्याची दर्दभरी कहाणी पहाटेपर्यंत ऐकत बसलो. 

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com