Humanity
Humanity

दिल तो बच्चा है! : माणुसकी नावाचं पिल्लू

मित्राच्या घरी दूध आणायला चाललेलो. कॅनॉलच्या बाजूनं रस्ता होता. दहा मिनिटांत त्याच्या घरी पोचलो. घरासमोर थांबूनच त्याच्या आईला आवाज दिला. तोंडाला पदर बांधलेली त्याची आई आली आणि किटलीत दूध ओतत म्हणाली,
‘काळजी घेतोय ना बाबा? जास्त बाहेर फिरत नको जाऊ.’

‘ओ नाय नाय काकू. फक्त दूध न्यायला येतो. बाकी घरातच असतो.’किटलीत दूध ओतून झालं तशा त्या म्हणाल्या,
‘व्हय रे, मी ऐकलंय आता जनावरांनाबी कोरोनाची लागन होती म्हणून. सकाळी टीव्हीला सांगत होते, अमेरिकेतल्या कुठल्या तरी वाघिनीलाबी कोरोना झालाय म्हणून.’

‘काय माहिती नाय काकू,’ असं म्हणत मी किटलीचं झाकन लावलं. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी पसरली होती. तसं मी म्हणालो,
‘अहो, अमेरिकेतल्या वाघिनीला कोरोना झाल्याचं तुम्हाला इतकं का वाईट वाटतंय?’
त्या म्हणाल्या, ‘त्या अमेरिकेचा झाला जाळ. मला काळजी वाटती आमच्या जित्राबांची. हितं माणसांचे डॉक्‍टरच कोरोनानी आजारी पडू लागल्यात. उद्या जनावरं कोरोनानी आजारी पडली तर त्यांच्याकडं कोण बघणार? त्यांची हालत नाय बघवायची बाबा माझ्या डोळ्यांनी.’

असं म्हणत त्या काकू डोळ्याला पदर लावत घरात निघून गेल्या. मी शांतपणे गाडीपाशी आलो आणि गाडीला किटली अडकवून घराकडं निघालो. 
त्यांच्या गोठ्यात दोन बैल होते. पाच सहा गाया होत्या. चार पाच म्हशी होत्या.

सगळेजण भर दुपारच्या सावलीत निवांत रवंथ करत बसलेले. त्या जित्राबांच्या डोळ्यातली भयाण शांतता काळजावर ओरखडे ओढत होती. पण, काहीच पर्याय नव्हता. रस्त्यावर आलो तोच एका छपरात टांगेवाल्याचा घोडा दिसला. पुन्हा काळजात धस्स झालं. प्राण्यांना कोरोना झाला, तर माणूस काय करू शकतो? माणसाला कोरोना होतोय, तोच आपल्याला सावरता येईना. प्राण्यांमध्ये ही साथ पसरली तर काय अवस्था होईल? आपण त्यांना तडफडत मरणासाठी सोडून देऊ का? असा विचार करत कॅनॉलशेजारच्या रोडवर आलो. तोच कॅनॉलच्या काठावर कुत्र्याच्या पिल्लाचा अस्वस्थ आवाज ऐकू आला. गाडी थांबवून आजूबाजूला पाहिलं, तर कॅनॉलमधल्या काठावर जलपर्णीमध्ये एक लहानसं पिल्लू अडकलेलं दिसलं. डोळ्यासमोर त्याचा मृत्यू पाहण्याची हिंमत नव्हती. म्हणून मग चप्पल काढली आणि हळूहळू कॅनॉलमध्ये उतरलो. त्या पिलाला हात लागला, तसं ते शांत झालं. त्याला अलगद उचलून बाहेर काढलं आणि रस्त्यावर सोडलं. ते खूपच लहान होतं. त्याचे डोळे नुकतेच उघडले होते.

दातही जास्त आले नव्हते. त्याला रस्त्यावर सोडणं मनाला पटत नव्हतं. पण, प्राण्यांना कोरोना झाला तर काय होईल, हे काकूचं वाक्‍यही काळजात धडधडत होतं. समजा या कुत्र्याला कोरोना असेल, तर मी स्वत:हून कोरोना घरी नेतोय का? माझ्या पूर्ण कुटुंबाला धोक्‍यात घालतोय का? असाही विचार मनात येत होता. पण, एका निष्पाप जिवाला अशा आडरानात सोडून माणुसकीच्या नावानं स्वत:ला कलंक लावून घेतोय का, हाही विचार मनावर आदळत होता. दोन मिनिट विचार केला सरळ त्याला घरी आणून डेटॉलनं आंघोळ घातली. संपूर्ण कुटुंब आता आनंदात रमलंय. कुत्र्याला आणून पाच दिवस झालेत. विशेष म्हणजे, आरशासमोर थांबल्यावर मला मीच दिसतो. कॅनॉलमध्ये विव्हळणारं कुत्रं नाही... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com