दिल तो बच्चा है! : अरे संस्कार संस्कार

नितीन थोरात
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

‘अरे तो किती घाणेरड्या शिव्या देतोय. त्याच्याकडं नको जाऊ. चल इकडं ये,’
असं म्हणत मी लेकाला माझ्याजवळ ओढलं. रस्त्याच्या कडेला बुटपॉलिश करणारा माणूस बसलेला. मी माझी चप्पल त्याच्याकडं दुरुस्त करायला दिली होती. म्हणून मी तिथं थांबलेलो, तोच माझा लेक त्याच्या पोराजवळ गेला. त्या पोराची शिवराळ भाषा ऐकून माझ्या अंगावरच काटा आला. मी लेकाला जवळ बोलवलं.

‘अरे तो किती घाणेरड्या शिव्या देतोय. त्याच्याकडं नको जाऊ. चल इकडं ये,’ असं म्हणत मी लेकाला माझ्याजवळ ओढलं. रस्त्याच्या कडेला बुटपॉलिश करणारा माणूस बसलेला. मी माझी चप्पल त्याच्याकडं दुरुस्त करायला दिली होती. म्हणून मी तिथं थांबलेलो, तोच माझा लेक त्याच्या पोराजवळ गेला. त्या पोराची शिवराळ भाषा ऐकून माझ्या अंगावरच काटा आला. मी लेकाला जवळ बोलवलं. बुटपॉलिश करणाऱ्या माणसानं हे पाहिलं होतं. मी त्याच्याकडं तिरस्कारानं बघतोय, हेही त्याला समजलेलं असावं. त्याच्या लेकाला मी नावं ठेवलेलीही त्यानं ऐकली होती. त्याच्या जिवाला याचं वाईटही वाटलं असेल. पण, प्रश्‍न पोटाचा होता. मला नाराज करणं त्याला परवडणारं नव्हतं. म्हणून कदाचित त्यानं मनातला राग गिळून टाकला. मी वीस रुपये दिले आणि चप्पल पायात विणून लेकराला ट्यूशनला सोडायला गेलो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तासभर इकडंतिकडं हिंडून पुन्हा ट्यूशनच्या बिल्डिंगसमोर आलो. बरेच पालक येऊन थांबले होते. एक जण माझ्याकडं आला. म्हणाला, ‘कशी आहे मुलाची ग्रोथ?’ 
मी स्मित करत होकारार्थी मान डोलावली. तसा तो बोलू लागला, ‘ॲक्‍च्युली मलाही हा क्‍लास आवडला. इथं पुस्तकी शिकवणीपेक्षा जगण्याचे धडे मिळतात. मुलांनी कसं वागावं, कसं वागू नये, हे आता शिकवायला हवं. प्रेमानं बोलणं, आदर करणं, मदत करणं या भावना मुलांना कळणं काळाची गरज आहे. मुलावर चांगले संस्कार व्हावेत, यासाठी मी खूप आग्रही आहे.’

असं म्हणत त्यानं डोळ्यांवरचा चष्मा नीट केला आणि खिशातून आयफोन काढला. त्याच्या बोलण्यानं मी पुरता भारावूनच गेलो. तो मला आजच्या काळातला आदर्श पिता वगैरे वाटू लागला. याच्या मुलासोबत आपण आपल्या मुलाची ओळख करून दिल्यास त्याच्या संगतीनं आपल्या मुलामध्येही थोडेफार संस्कार रुजतील, असा विचार डोक्‍यात आला.

क्‍लास सुटला आणि लेकरं पटापटा बाहेर पळत आली. मी लेकाला शोधलं आणि गाडीपाशी आलो. तोवर तो आदर्श पिता ॲक्‍टिव्हावर बसून निघाला होता. त्याच्या आदर्श लेकरासोबत आपल्या लेकाची ओळख करून द्यायची, म्हणून मी पटकन किक मारली आणि त्याच्या गाडीमागं गाडी दामटू लागलो. 

एक किलोमीटर अंतर क्रॉस झालं असेल, तोच एका जीपगाडीवाल्यानं वाकडीतिकडी गाडी चालवत एका दुचाकीवाल्याला कट मारला. बिचारा दुचाकीवाला होलपडत रोडच्या खाली घसरून पडला. बरोबर त्याच्या मागंच त्या आदर्श पिता-पुत्राची ॲक्‍टिव्हा होती. मी त्यांच्या जवळ गेलो, तर आदर्श बाप गाडीवर बसल्या बसल्याच आपल्या लेकाला म्हणत होता,  

‘हे बघ वाहतुकीचे नियम नाही पाळले, तर असे अपघात होतात. म्हणून गाडी नेहमी जपून चालवावी. समजलं?’ 

असं म्हणत त्यानं रेस वाढवली आणि निघून गेला. मी गप्पच. समोर पाहिलं तर बुटपॉलिश करणारा तो माणूस जीपगाडीच्या समोर आडवा थांबून चालकाला आया-बहिणीवरून शिव्या हासडत होता आणि त्या शिव्या ऐकत त्याचा पोरगा रस्त्यावर पडलेल्या माणसाला उभं राहण्यासाठी मदत करत होता. निघून गेलेले आदर्श पिता-पुत्र आणि शिव्या देत मदत करणारे पिता-पुत्र लेक डोळ्यांनी पाहत होता. त्यानं कुणाचे संस्कार स्वीकारावे, मी त्याच्यावरच सोडलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article nitin thorat on rites