esakal | टिवटिवाट : उंच झाडे, खुजी झाडे!
sakal

बोलून बातमी शोधा

Sunil-Anushka

प्रत्येक यशस्वी पुरुषामागं एक स्त्री असते, अशी घासून गुळगुळीत झालेली म्हण आहे. म्हणीची दुसरी बाजू सोशल मीडियानं जन्माला घातली, इतकं नक्की म्हणता येईल. ती दुसरी बाजू अशी; प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या अपयशाबद्दल बेजबाबदारपणे स्त्रीलाच जबाबदार धरलं जातं.

टिवटिवाट : उंच झाडे, खुजी झाडे!

sakal_logo
By
सम्राट फडणीस

प्रत्येक यशस्वी पुरुषामागं एक स्त्री असते, अशी घासून गुळगुळीत झालेली म्हण आहे. म्हणीची दुसरी बाजू सोशल मीडियानं जन्माला घातली, इतकं नक्की म्हणता येईल. ती दुसरी बाजू अशी; प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या अपयशाबद्दल बेजबाबदारपणे स्त्रीलाच जबाबदार धरलं जातं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या सेलिब्रिटी जोडप्याच्याबाबतीत सोशल मीडियानं म्हणीची दुसरी बाजू गेल्या पाच वर्षात तयार केलीय. क्रिकेटच्या मैदानावरचं विराटचं प्रत्येक अपयश सोशल मीडियावर अनुष्काशी जोडलं गेलं आणि तिलाच जबाबदार धरलं गेलं. म्हणीची दुसरी बाजू इतकी घट्ट झाली, की त्या बाजूला प्रख्यात क्रिकेटपटू, समालोचक सुनील गावसकर बळी पडले!
सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये विराटच्या अपयशाबद्दल केलेली टिप्पणी सोशल मीडियावर चर्चेचा गरमागरम विषय आहे. गावसकर यांनी विराटच्या अपयशाबद्दल त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का हिला जबाबदार धरलं.

‘बोलण्याच्या ओघात’, ‘गंमत करण्याच्या हेतूनं’ केलेली टिप्पणी ‘चुकीच्या अर्थानं घेतली गेली’, अशी सारवासारव नंतर केली गेली. ‘मी अनुष्काला दोष देत नव्हतो; मी फक्त म्हटलं,’ असं स्पष्टीकरण खुद्द गावसकर यांनी केलं. शिवाय, क्रिकेटपटूंच्या खासगी आयुष्याबद्दल आपण किती आग्रही राहिलो याचे दाखलेही दिले.

अनुष्काला जबाबदार धरण्याचा हेतू नव्हता वगैरे गावसकर यांची बाजू मान्य. परंतु, निर्हेतुकपणेसुद्धा आपण सहजपणानं किती पुरूषी प्रवृत्तीनं टिप्पणी करतो, याचं भान गावसकर यांच्यासारख्या ज्येष्ठ, प्रभावशाली आणि जबाबदार व्यक्तीला नसावं का, हा प्रश्‍न अनेकांना पडला आणि गावसकर यांच्यावर सोशल मीडिया तुटून पडला.

अनुष्कानं गावसकर यांना सोशल मीडियावरच उत्तरही दिलं. त्यातला एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा. ‘तुम्हाला माझ्या पतीच्या कामगिरीबद्दल बोलण्यासाठी शब्दांचं भांडार असेलही...की माझ्या नावाचा उल्लेख केल्यावरच तुमच्या शब्दांना अर्थ मिळतोय...?’, असं अनुष्कानं विचारलं. अनुष्काचं उत्तर गावसकर यांच्या टिप्पणीइतकंच गाजलं.

गावसकर यांचं विधान द्विअर्थी घेऊन अश्लीलतेकडे झुकणारा आणि दुसरा स्त्रीवादी भूमिकेचा असे दोन प्रवाह सोशल मीडियावर होते. स्त्रीवादी भूमिकेनं गावसकर यांच्यासमोर उपस्थित केलेले प्रश्‍न खरंतर सर्वसाधारण मानसिकतेलाच विचारले आहेत. क्रिकेटसाठी आयुष्य अर्पण केलेल्या गावसकर यांनी त्यांचं कुटुंब कधी क्रिकेटच्या मैदानावर आणू दिलं नसताना अनुष्काबाबत अपवाद का...? अनुष्काचे चित्रपट हिट होत नसतील, तर ‘विराट तिचा पती आहे, म्हणून अपयश येतं,’ असं ‘बोलण्याच्या ओघात’, ‘गंमत करण्याच्या हेतूनं’ कोणी का बोलत नाही, हे स्त्रीवादी भूमिकेचे प्रश्‍न आहेत.

विराट आणि अनुष्कानं या प्रश्‍नांचा सामना गेली किमान पाच वर्षे सतत केलाय. विराटचं यश हे त्याचं असतं आणि अपयशाला अनुष्का जबाबदार, अशी ही मानसिकता बदलायला हवी. उतारवयातल्या गावसकर यांनी ‘बोलण्याच्या ओघात’ नकळतपणे केलेली टिप्पणी याच मानसिकतेचं प्रतिनिधीत्व करते आणि कितीही पडदे टाकले; तरी एकदा दिसलेली मानसिकता कोणी विसरत नाही. गावसकर यांनी गायलेल्या गाण्यातील ओळींप्रमाणे उंच झाडे कधी खुजी झाडेही ठरतात, हे नक्की...

Edited By - Prashant Patil