विशेष : जळगाव ते 'स्कॅम' व्हाया सातारा!

Pratik-Gandhi
Pratik-Gandhi

‘सेक्रेड गेम’ ही वेब सीरिज रिलीज झाल्यावर नवाजुद्दीन सिद्दिकी या गुणी अभिनेत्यानं रसिकांना वेड लावलं होतं. तसाच अनुभव आता ‘स्कॅम : १९९२’ या सीरिजमधून येतो आहे. त्याचं कारण या सीरिजचा नायक. त्यानं हर्षद मेहता या कॅरेक्‍टरला पुन्हा जन्म दिला आहे. त्याचं नाव प्रतीक गांधी. या ‘हर्षद मेहता’चा प्रवास रंजक आहे...

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हर्षद मेहता हे नाव देशाला नवं नाही. अनेकांचा ‘बाजार’ उठवणारा हा माणूस छोट्या पडद्यावर जिवंत करणारा प्रतीक गांधी याचं नाव आता मराठी माणसाच्या मुखी आहे, ते त्याच्या अभिनय कौशल्यामुळं. मराठी माणूस मुळात नाट्यवेडा. त्यामुळं प्रतीकच्या कामाचं कौतुक होत आहे. प्रतीक मूळचा गुजरातचा; मात्र दीड दशकांपासून तो मुंबईत वास्तव्यास आहे. अभिनयाची सुरुवात कुठून आणि कशी झाली, याबद्दल तो म्हणतो, ‘‘सुरतमध्ये वाढलो. शालेय जीवनापासून अभिनयाची आवड होती. शाळेत छोट्या नाटिकांपासून सुरुवात झाली. पुढं इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला. त्यादरम्यान स्थानिक स्तरावर नाटकांच्या स्पर्धांत भाग घेत होतो. औद्योगिक अभियांत्रिकीची पदवी घेण्यासाठी जळगावला आलो. तिथं चार वर्षं राहिलो आणि पदवी घेऊन मुंबईत स्थिरावलो.’’ 

सुट्या राखून ठेवायचो 
प्रतीकला मुंबईत एका बड्या कंपनीत नोकरी मिळाली. पण, नाटकाचं वेड चैन पडू देत नाही. प्रतीकही याला अपवाद नव्हता. ‘‘दिवसा नोकरी आणि रात्री अभिनय असा माझा दिनक्रम होता. प्रायोगिक, व्यावसायिक नाटकं केली. गुजरातीबरोबर हिंदी आणि इंग्रजी रंगमंचाबरोबर जोडला गेलो. २००८ ते २०१६पर्यंत पूर्णवेळ नोकरी आणि नंतर नाटक, असं सूत्र होतं. याच काळात साताऱ्यातील नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी कौन्सिलबरोबर फ्रिलान्स प्रोजेक्‍टवरही काम केलं. पहाटे पाच वाजता निघायचं. नाटकाच्या तालमी करायच्या आणि नंतर नोकरीवर जायचं. शनिवार, रविवार नाटकाचे प्रयोग करायचे. नोकरी करीत असल्यानं मी सुट्या राखून ठेवत असे. कारण, कुठं नाटक वा चित्रपटाची संधी मिळाल्यास त्यांचा वापर करता यावा...’’ 

नोकरी सोडून सिनेमा 
आयुष्य नोकरी, नाटक यात खेळवत होतं. पण, अंगी कौशल्य असल्यास त्याला संधी मिळतेच. मला २०१२मध्ये गुजराती चित्रपट ‘बे यार’मध्ये संधी मिळाली. त्या वेळी मराठी चित्रपटात वेगवेगळे प्रयोग होत होते. परंतु, गुजराती चित्रपटांबाबत तसं नव्हतं. तरुण गुजराती चित्रपट पाहत नव्हते. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर चित्रपटांनी बदल अनुभवला. त्याला खूप प्रतिसाद मिळाला. चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या होत्या. पण, नोकरी सुरू असल्यानं चित्रपट स्वीकारू शकत नव्हतो. पुढं दोन वर्षांनी महिनाभराची सुटी काढली आणि ‘राँग साइड राजू’ सिनेमा केला. त्याला गुजरातीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. त्या वेळी ‘व्हेंटिलेटर’ला मराठीत हा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर मी आयुष्यात उद्दिष्ट निश्‍चित केलं आणि पूर्णवेळ अभिनय करण्याचा निश्‍चय केला. नोकरी सोडली आणि चाकोरी मोडली. आम्ही ‘व्हेंटिलेटर’ गुजरातीमध्ये केला. पुढं दहा गुजराती, दोन हिंदी सिनेमे आणि नाटकांचे अनेक प्रयोग केले, असं प्रतीक सांगतो. 

...हा तर परकाया प्रवेश
तुझा चेहरा, शरीरयष्टी हर्षद मेहतासारखी नाही; तरीही तू हर्षद वाटतो. यावर प्रतीक म्हणतो, ‘‘याचं सारं श्रेय रंगभूमीला आहे. ती अभिनेत्याला वेगळी शक्ती आणि कौशल्य देते. एखादं पात्र रंगवायचं, तर त्यात प्रवेश करावा लागतो. परकाया प्रवेशाची शक्ती रंगभूमीनं दिली. हंसल मेहता अनुभवी दिग्दर्शक आहेत. त्यांच्याबरोबर काम करण्याचं स्वप्न होतं. ते हर्षद मेहतावर वेब सीरिज करणार होते. माझा अभिनय त्यांनी पाहिला आणि हर्षद मेहता या पात्रासाठी निवडलं. मला त्याची मिमिक्री करायची नव्हती, साकारायचे होते. त्यासाठी त्यांची छायाचित्रं, मुलाखतींचे व्हिडिओ अनेकदा पाहिले. त्या पात्राचा प्रवास मी माझ्यात रुजविला. त्यांच्या आयुष्यातील सुख, यश, दु:ख, वेदना दाखविण्याचा प्रयत्न मी केला.’’ 

महाराष्ट्र माझी मावशी 
माझा जन्म गुजरातमध्ये झाला. पण, माझे उच्च शिक्षण महाराष्ट्रात झाले. कर्मभूमी गुजरातबरोबर मुंबई देखील आहे. माझी मावशी मुंबईत राहते. लहानपणी सुटी देखील मुंबईत जायची. त्यामुळं मराठी भाषा खूप जवळची आणि गोड वाटायची. जळगावमध्ये शिकत असतानाही मला कधीच परकं वाटलं नाही. आता सोळा वर्षांपासून मुंबईत राहतोय; म्हणजे एकप्रकारे मराठीच झालो आहे, असं प्रतीक अभिमानानं सांगतो. 

तू हर्षद मेहता पुन्हा जिवंत केला. पण, कधी शेअर विकत घेतलेस का, यावर प्रतीक म्हणतो, ‘‘माझे वडील शिक्षक, मी कलाकार. त्यामुळं व्यवसायाशी संबंध आलाच नाही. मी गुजराती असल्यानं सर्वांना वाटतं माझी गुंतवणूक चांगली असेल. पण, मी फार मोठी गुंतवणूकही केलेली नाही. शेअर बाजार जाणून घेण्यासाठी एक-दोन व्यवहार मात्र केले होते.’’

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com