दिल तो बच्चा है! : रडल्यावर समुद्राचं पाणी वाढतं! 

नितीन थोरात
Wednesday, 2 December 2020

आज्जी मला लहानपणी म्हणायची, ‘रडायचं नसतं. आपण रडलो की समुद्रातलं पाणी वाढतं. माणसं रडत राहिली आणि समुद्रातलं पाणी वाढत राहिलं तर एक दिवस सगळी पृथ्वी बुडून जाईल आणि आपण मरून जाऊ.’ मला ते खरं वाटायचं. रडायला आलं की, आज्जीचं वाक्‍य आठवायचं आणि पटकन डोळे पुसायचो. वर्गातला कुणी पोरगा रडायला लागल्यावर त्यालाही आज्जीचं वाक्‍य सांगायचो. मग तोही गप्प व्हायचा

आज्जी मला लहानपणी म्हणायची, ‘रडायचं नसतं. आपण रडलो की समुद्रातलं पाणी वाढतं. माणसं रडत राहिली आणि समुद्रातलं पाणी वाढत राहिलं तर एक दिवस सगळी पृथ्वी बुडून जाईल आणि आपण मरून जाऊ.’ मला ते खरं वाटायचं. रडायला आलं की, आज्जीचं वाक्‍य आठवायचं आणि पटकन डोळे पुसायचो. वर्गातला कुणी पोरगा रडायला लागल्यावर त्यालाही आज्जीचं वाक्‍य सांगायचो. मग तोही गप्प व्हायचा. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुढं मी मोठा होत गेलो. विज्ञान समजू लागलं. आज्जीचं वाक्‍य खोटं वाटू लागलं. मोठा झालो तसं रडणंही कमी झालं. प्रत्येकाचं कमी होतं. काल पोरगा रस्त्यावर खेळता खेळता पडला. त्याच्या पायाला जखम झाली. तो रडू लागला. त्याला मी कडेवर घेतलं आणि जखमेवर मलमपट्टी केली. तरीही तो रडतच होता. त्याला मी आज्जीचं वाक्‍य सांगितलं आणि त्यानं डोळे पुसले. मला वाटलं त्याला माझं वाक्‍य पटलं. तर तो म्हणाला, ‘‘डोळ्यातून पाणी येतं ते खारट असतं आणि समुद्राचं पाणीही खारट असतं म्हणून असं म्हणताय ना?’’ मी असा प्रश्‍न आज्जीला विचारला नव्हता. मी त्याला म्हणालो, ‘‘डोळ्यातलं आणि समुद्रातलं पाणी खारट असतं हे बरोबर आहे. पण, आपल्या डोळ्यातलं पाणी समुद्रापर्यंत जात नसतं. आपण रडू नये म्हणून असं म्हटलं जातं. माझी आज्जी मला असं सांगायची. तसंच मी तुला सांगतोय. आज्जीनं मला असं सांगितल्यावर मी रडणं बंद केलं होतं आणि मी माझ्या मित्रांनाही रडू नका असं सांगितलं होतं. मग माझे मित्रही रडायचे थांबले होते.’’ तसा लेक म्हणाला, ‘‘पण मग तुम्ही लहान होता तेव्हापासून आत्तापर्यंत तर किती सारे लोक रडले असतील. मग वाढलंय का समुद्राचं पाणी?’’ मी गप्प झालो. 

म्हणालो, ‘‘अरे मी आधीच म्हणालो की, डोळ्यातल्या पाण्याचा आणि समुद्राच्या पाण्याचा काहीच संबंध नसतो.’’ तसा लेक म्हणतोय, ‘‘पाहिजे होता संबंध. तुम्हीच मला म्हणता, पाणी वाचवत जा. जमिनीच्या पोटातलं पाणी कमी झालंय. दरवेळी उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही असं म्हणता. मग लोक रडत असतील आणि समुद्राचं पाणी वाढत असेल तर लोकांना रडवलंच पाहिजे ना?’’ आता काय बोलावं समजेना. मी म्हणालो, ‘‘अरे, पण समुद्राचं पाणी खारट असतं. ते पाणी वाढलं तरी आपल्याला पेता येत नाही.’’ तसा लेक म्हणाला, ‘‘अहो पप्पा, माणसं रडतील. समुद्राचं पाणी वाढेल. मग सूर्यामुळं समुद्राच्या पाण्याची वाफ होईल. त्याचे ढग होतील. मग त्याचा पाऊस पडेल आणि जमिनीच्या पोटातले पाणी वाढेल. मग लोक रडल्यामुळं पाणी वाढणार असेल तर लोकांनी रडलं तर काय हरकत आहे?’’ 

दगड होऊन लेकाकडं पाहू लागलो. मोठा तत्त्वज्ञानी आपल्या पोटी जन्माला आलाय, असं वाटत असतानाच लेकानं डोळ्यातलं पाणी पुसलं आणि म्हणाला, ‘‘मी रडत बसलो तर बाकी पोरांना रडवू शकणार नाही. त्यासाठी आधी मी रडणं थांबवतो, म्हणजे मी बाकीच्या पोरांना रडवून जमिनीतलं पाणी वाढवू शकतो.’’ मी अवाक होऊन लेकाकडं पाहत राहिलो. त्यानं डोळे पुसले आणि गेला खेळायला. 

पूर्वी विज्ञान प्रगत नव्हतं तेव्हा भावनांमध्ये ओलावा होता. भलेही त्या भोळसट असतील, पण त्यामध्ये ममत्व होतं. विज्ञान तळागाळापर्यंत पोचतंय तशा नव्या पिढीच्या भावना रूक्ष होऊ लागल्यात का?

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article write nitin thorat on grandmother