टिवटिवाट : दोन्ही गट फसवेच... 

सम्राट फडणीस
Wednesday, 25 November 2020

अमृता फडणवीस व्यवसायानं बॅंकिंग अधिकारी. एका मुलीची आई. त्यांचे पती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते. डी. रूपा कर्नाटकच्या गृहसचिव आणि आयपीएस अधिकारी. करिअरमध्ये वर्ष-सव्वा वर्षानं बदलीला सामोरे गेलेल्या. बोलण्याचं आणि अधिकार बजावण्याचं स्वातंत्र्य जपणाऱ्या.

अमृता फडणवीस व्यवसायानं बॅंकिंग अधिकारी. एका मुलीची आई. त्यांचे पती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते.

डी. रूपा कर्नाटकच्या गृहसचिव आणि आयपीएस अधिकारी. करिअरमध्ये वर्ष-सव्वा वर्षानं बदलीला सामोरे गेलेल्या. बोलण्याचं आणि अधिकार बजावण्याचं स्वातंत्र्य जपणाऱ्या.

या दोघी गेल्या आठवड्यात ट्रोलधाडीचं लक्ष्य बनल्या. अमृता किंवा डी. रूपा मांडत असलेल्या मतांबद्दल, त्यांच्या कृतीबद्दल तुम्ही सहमत असलंच पाहिजे, असा आग्रह नाही. असहमती व्यक्त करण्याची पद्धत लिंगभेदभावाची असते, हा आक्षेप आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमृता यांचं गाणं आवडत नसेल, तर डिसलाइक बटन पुरेसं आहे. त्यांची मतं आवडत नसतील, तर ते नीट शब्दांत सांगता येईल. त्यांचे दिवाळीचे फोटो तुम्हाला पाहायचे नसतील, तर नका पाहू. पण, ‘मंगळसूत्र नाही, कुंकू नाही, बांगडी नाही, हेच का हिंदुत्व...’ हा सवाल खोचक असला; तरी लिंगभेद करणारा आहे, याची जाणीव हवी. अमृता यांच्यावर सोशल मीडियात हल्ला चढवणारा गट राजकीय विचारांनी काँग्रेसी उदारमतवादी किंवा उजव्यांच्या विरोधातला म्हणावा असा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डी. रूपा यांनी दिवाळीतल्या फटाकेबंदीचं समर्थन करणारी पोस्ट लिहिली. त्यांनी युरोपातून फटाके भारतात आल्याचं आणि त्याचा हिंदू सणांशी काही संबंध नसल्याचं म्हटलं. यानंतर पुढचे चार दिवस देशभरातून ट्रोलधाड त्यांच्यावर तुटून पडली. ट्रोल करणारे एक ट्विटर अकाउंट काही काळातच निलंबित झाले. रूपा यांनीच ती कारवाई केल्याचा आरोप होऊन त्यांना आणखी ट्रोल केलं गेलं. मात्र, फटाकेबंदीच्या समर्थनापासून रूपा मागं हटल्या नाहीत. त्यांना ट्रोल करणारा गट भाजपमार्गी किंवा उजव्या विचारसरणीचा होता. दोन्ही उदाहरणं ताजी. ती अशासाठी महत्त्वाची, की ‘आम्हाला मान्य, तेच तुम्ही बोला-करा’ हा दुराग्रह उदारमतवादी म्हणवल्या जाणाऱ्या आणि उजव्या अशा दोन्ही विचारसरणींत आहे. प्रत्येकाच्या मतांमध्ये राजकीय विचार शोधायचे आणि मानहानिकारक पद्धतीनं त्या विचारांना विरोध करायचा, हा ट्रोलधाडीचा फंडा. तो दीर्घकालीन लाभ देत नाही, हे समजून येईल, तेव्हा अमृता आणि डी. रूपा यांना त्यांची मतं मांडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य येईल. तोपर्यंत दोन्ही विचारांच्या ट्रोलधाडी एकाच मानसिकतेच्या आहेत, हेच सिद्ध होत राहील.

अमृता फडणवीस आणि डी. रूपा यांच्यात काय साम्य आहे?

  • दोघी उच्चशिक्षित महिला. 
  • सेलिब्रिटी स्टेटसला पोचलेल्या. 
  • स्वतःची मतं असलेल्या. 
  • आणि म्हणून ट्रोलधाडीचं लक्ष्य बनलेल्या.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article write samrat phadnis on amruta fadnavis and d rupa