खाद्यभ्रमंती : नृसिंहवाडीचे सोमण भोजनालय

काही वर्षांपूर्वी नृसिंहवाडीला जाणं झालं. कृष्णा आणि पंचगंगा यांच्या संगमावर वसलेलं तीर्थक्षेत्र म्हणजे नृसिंहवाडी. नरसोबाची वाडी, नरसोबावाडी किंवा नुसतं वाडी.
Soman Bhojnalaya
Soman BhojnalayaSakal

काही वर्षांपूर्वी नृसिंहवाडीला जाणं झालं. कृष्णा आणि पंचगंगा यांच्या संगमावर वसलेलं तीर्थक्षेत्र म्हणजे नृसिंहवाडी. नरसोबाची वाडी, नरसोबावाडी किंवा नुसतं वाडी. नृसिंह सरस्वतींचे स्थान ही नृसिंहवाडीची पहिली ओळख. दुसरी ओळख म्हणजे बासुंदी आणि तिसरी ओळख कवठाची बर्फी! इथं पोहोचल्यानंतर कदाचित या क्रमानंच प्रत्येकाचं दर्शन घेतलं जातं. प्रथम कृष्णेच्या पाण्यामध्ये हातपाय धुवून नृसिंह सरस्वतींचं दर्शन आणि मग प्रसाद.

वास्तविक पाहता, देवाच्या किंवा संतांच्या घरी जेवणं अधिक इष्ट. एखाद्या तीर्थक्षेत्री गेल्यानंतर हॉटेलात न जेवता तिथं मिळणारा भंडारा घेणं हाच खरा आशीर्वाद असतो. पण, आमचं दर्शन होईपर्यंत प्रसादाची वेळ संपली होती. मग आम्ही शोधाशोध सुरू केली. दोन-तीन ठिकाणी चौकशी करून मग नृसिंहवाडीतल्या विठ्ठल मंदिराजवळचं सोमण भोजनालय गाठलं. अगदी घरगुती चवीचं, मनापासून आदरातिथ्य करणारं नि एकदम माफक दरात पोटभर जेवण देणारं भोजनालय. तुम्हीही भविष्यात कधी वाडीला गेलात आणि प्रसाद उपलब्ध नसल्यास थेट सोमण भोजनालय गाठायला हरकत नाही. प्रसाद घेण्याऐवजी सोमणांकडे जेवलात तरी तितकंच पुण्य मिळणार, हे लिहून ठेवा.

श्रीकांत आणि ललिता सोमण यांनी साधारण १९८४-८५मध्ये हे भोजनालय सुरू केलं. आता त्यांचा मुलगा सचिन या भोजनालयाचं सर्व व्यवस्थापन पाहतो. नृसिंहवाडीत सोमण यांच्या नावानं आणखी एक-दोन खाणावळी सुरू झाल्या आहेत, पण सचिन सोमण यांच्या भोजनालयातील जेवण एकदम बिनतोड. वीस ते पंचवीस लोक एकावेळी जेवायला बसतील अशी व्यवस्था. लग्नातील पंक्तीप्रमाणे तिथं पंगत बसते. जेवणाच्या ताटात सोळा ते अठरा पदार्थ असतात. मीठ, लिंबापासून ते चटणी, कोशिंबीर, पापड किंवा मिरगुंड, आंबा, लिंबू आणि मिरची यापैकी दोन लोणची, दोन भाज्यांमध्ये एक कुर्मा किंवा मिक्स भाजी. वरणभात, वरून तुपाची धार, मसालेभात. कांदा, लसूण नि आलं यांचा वापर पूर्णपणे वर्ज्य. काहींना ॲसिडिटीचा त्रास होतो म्हणून तूरडाळही नाही. आमटी किंवा वरण होतं ते मुगाच्या डाळीचं. सुरुवात ताकानं आणि शेवट बासुंदीनं...

आम्ही गेलो तेव्हा मुळ्याचा चटका, लाल मिरचीचा ठेचा, फ्लॉवर-टोमॅटो-बटाटा रस्सा भाजी, वाल आणि वांगी यांची रस्सा भाजी, तर्रीबाज आमटी, साधा पांढरा भात, वरण, तुपाची धार, मसाले भात नि घरच्यासारख्या घडीच्या मऊसूत पोळ्या. वांगी आणि वाल हे कॉम्बिनेशन तर आयुष्यात पहिल्यांदाच खाण्यात आलेलं. दोन्ही भाज्यांचे मसाले अगदी एकाच पद्धतीचे. तरीही कोणती भाजी अधिक खावी, असा प्रश्न पडावा इतक्या भारी. सोबत नरसोबाच्या वाडीची मस्त बासुंदी असा झक्कास मेन्यू होता. (अर्थात, माझे काका करायचे नि आता चुलतभाऊ करतो त्या बासुंदीला तोड नाही.) जेवणाच्या सुरूवातीलाच आंबटगोड ताक वाढलं जातं. जेवण सुरू असताना अधून मधून वाढलं जात असल्यानं पाण्याऐवजी ताकावरच भर. कोल्हापुरी मसाल्यातील गरमागरम जेवण नि चवीप्रमाणेच घरगुती पाहुणचाराची जोड. जेवल्यानंतर प्रवास कराल तेव्हा कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी सोमण एकदम कमी मसाल्यातील साधं, पण स्वादिष्ट जेवण आपल्याला वाढतात. तुमच्याबरोबर लहान मुलं असल्यास सोमण त्यांच्या जेवणाचे पैसे घेत नाहीत, हे आणखी एक वैशिष्ट्य.

इथलं जेवण इतकं अप्रतिम आहे, की वाडीला येताना थोडंसं पोट रिकामं ठेवूनच या. चटणी-कोशिंबिरीपासून ते भाजी-आमटीपर्यंत प्रत्येक पदार्थ वारंवार वाढला जातो. सोमण यांचा आग्रह असतोच. कोणत्याही खाणावळीत वा भोजनालयात इतक्या आग्रहानं वाढलं गेलेलं मी पाहिलेलं नाही. त्यामुळंच अशा आग्रहाचं विशेष कौतुकं. साधारण दुपारी अकरा ते तीन या कालावधीत भोजनालय सुरू असतं. सध्या सुरू असलेले निर्बंध उठल्यानंतर नृसिंहवाडीस गेल्यावर सचिन सोमण यांच्या आग्रहाचा आणि स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद आवर्जून घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com