बुकीश : स्मरणरंजन

बुकीश : स्मरणरंजन

लंडनमध्ये जाऊन भेट न देता परतता येत नाही अशा ज्या जागा आहेत, त्यातली महत्त्वाची एक म्हणजे २२१बी, बेकर स्ट्रीट. आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर किचकट वाटणाऱ्या गुन्ह्यांची, ‘इट्स एलिमेंटरी डॉ. वॅटसन’, असं म्हणत लिलया उकल करणाऱ्या शेरलॉक होम्सचा हा पत्ता. होम्स हा सर आर्थर कॉनन डॉईल यांचा मानसपुत्र. ‘फॅन मेल’चा अविरत ओघ लाभलेली जगभरातल्या साहित्यातली ही एकमेव काल्पनिक व्यक्तिरेखा असावी. ‘शेरलॉक होम्स, २२१बी, बेकर स्ट्रीट, लंडन’ या पत्त्यावर येणाऱ्या चाहत्यांच्या पत्राचा ओघ एकेकाळी इतका होता की, कधीच अस्तित्वात नसलेल्या या गुप्तहेराचा पत्रव्यवहार ‘सांभाळण्यासाठी’ एक सेक्रेटरी नेमावी लागली होती.

वाचकांनी भुरळ घालणारी शेरलॉक होम्स ही काही एकमेव व्यक्तिरेखा नाही. ‘चांदोबा’मध्ये सत्तरीच्या दशकात ‘शिलारथ’ नावाची एक साहस कथा प्रसिद्ध व्हायची. त्यातल्या खड्गवर्मा आणि जीवदत्त या दोन पात्रांची मला जबरदस्त मोहिनी पडली होती. आपण जसं वाचत जातो तशा अनेक व्यक्तिरेखा भेटत राहतात. पण सिंदबाद, सिंड्रेला, टारझन, टॉम सॉयर, रोमियो आणि ज्युलिएट, जेम्स बॉन्डपासून अगदी बार्बीपर्यंत वेगवेगळ्या काळातल्या पात्रांच्या प्रेमात न पडलेले आणि ‘किंचित काळ’ का असेना, पण त्या पात्रांच्या असण्याच्या प्रभावाखाली असणारे पुस्तकवेडे सापडणे कठीणच. या पात्रांचं एक वैशिष्ट्य म्हणजे कळत्या वयात या व्यक्तिमत्त्वांचं काल्पनिक असणं उमगलं तरी त्यांचा प्रभाव मनाच्या कोणत्यातरी कोपऱ्यावर रेंगाळत राहतोच.

वाचनवेड्यांची हीच भावना पकडणारं एक पुस्तक वाचण्यात आलं, ‘द १०१ मोस्ट इन्फ्ल्युएन्शियल पिपल हू नेव्हर लिव्हड’.अॅलन लाझर, डॅन कार्लन आणि जेरेमी साल्टर या लेखक त्रयीचं हे पुस्तक लक्षात राहिलं ते त्या अस्तित्वात नसूनही अमरत्व लाभलेल्या व्यक्तिरेखांच्या स्मरणरंजनाच्या संधीमुळं. ‘हाऊ कॅरॅक्टर्स ऑफ फिक्शन, मिथ, लिजन्ड्स, टेलिव्हिजन अॅन्ड मुव्हीज हॅव शेप्ड अवर सोसायटी, चेन्ज्ड अवर बिहेव्हयर अॅन्ड सेट्स द कोर्स ऑफ हिस्ट्री’ या लांबलचक उपशीर्षकातून पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना स्पष्ट होते. यातली काही पात्रांची आणि आपली पुरेशी ओळख नसली तरी या एकशे एकमधल्या अनेक व्यक्तिरेखा आपल्याला वाचन प्रवासात कुठे ना कुठे भेटलेल्या असतात. सिंदबादसारख्या नाविकाच्या सुरस आणि चमत्कारिक कथांची कधीतरी भुरळ पडलेली असते, कुणी पांढऱ्या घोड्यावरून येणाऱ्या राजकुमाराची स्वप्नं ंपाहिलेली असतात तर कुणी संकटात सापडलेल्या राजकन्येच्या सुटकेसाठी साहसाची परिसीमा करण्याची. कुणावर बार्बीची मोहिनी असते, आणखी कुणाला जेम्स बॉंड व्हायचं असतं, कुणी बिग ब्रदरचा किंवा फ्रॅंकेस्टाईनचा धसका घेतलेला असतो तर आणखी कुणीतरी हॅम्लेटच्या भावविश्वात गुरफटून गेलेलं असतं. काल्पनिक असली तरी वाचनप्रवासाच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर आपल्याला अमाप आनंद देऊन गेलेल्या कथा-कादंबऱ्यांमधल्या पात्रांचं हे स्मरणरंजन म्हणूनच भावतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com