esakal | ऑन स्क्रीन : अजीब दास्तान्स : अस्वस्थ करणाऱ्या कथांची मालिका

बोलून बातमी शोधा

Ajib Dastans

ऑन स्क्रीन : अजीब दास्तान्स : अस्वस्थ करणाऱ्या कथांची मालिका

sakal_logo
By
महेश बर्दापूरकर barmahesh@gmail.com

‘अजीब दास्तान्स’ हा चार लघुपटांची मालिका असलेला करण जोहर निर्मित चित्रपट ताणलेल्या नात्यांतील अस्वस्थ भावभावनांची गोष्ट सांगतो. यातील प्रत्येक कथेतील पात्रांना नाते टिकवून ठेवण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते आहे. हे करताना त्यांची होणारी ससेहोलपट अस्वस्थ करून जाते व हा अनुभवच चित्रपटाचं यश ठरतो. कलाकारांच्या निवडीपासून दिग्दर्शनापर्यंतच्या सर्व गोष्टी जुळून आल्यानं एक अविस्मरणीय अनुभव मिळतो.

या चित्रपटात ‘मजनू’, ‘खिलौना’, ‘गिली पूछी व ‘अनकही’ या चार कथा सांगितल्या गेल्या आहेत.

‘मजनू’ या कथेचं दिग्दर्शन शशांक खैतान यांनी केलं आहे. बबलू (जयदीप अहलावत) आर्थिक फायद्यासाठी लिपाक्शीबरोबर (फतिमा साना शेख) लग्न करतो. त्याच्या ड्रायव्हरचा मुलगा राज (अरमान रेहान) अकाउंटंट म्हणू रुजू होतो आणि कथेत ट्विस्ट येतो. अस्वस्थ लिपाक्शीला राज आपल्या कह्यात घेतो आणि बबलू हतबल होऊन जातो. जयदीप अहलावत आणि फतिमा साना शेख यांचा अभिनय आणि कथेतील ट्विस्ट प्रेक्षकांना अस्वस्थ करण्यात यशस्वी ठरतात. दुसरी कथा ‘खिलौना’चं दिग्दर्शन राज मेहता यांनी केलं असून, त्यातील गरीब-श्रीमंतांतील दरीमुळं निर्माण होण्याऱ्या भयंकर स्थितीचं दर्शन हेलावून सोडतं. मीनल (नुसरत भरुचा) आपल्या छोट्या बहिणीबरोबर राहते व जवळच्या इमारतींमध्ये घरकामं करून पोट भरते. सुशील (अभिषेक बॅनर्जी) या इस्त्रीवाल्याबरोबर तिचे प्रेमसंबंध आहेत. पोटाची खळगी भरताना कराव्या लागणाऱ्या तडजोडीतून काय गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, याचा हादरवून सोडणारा शेवट कथा मांडते. बोल्ड आणि ग्लॅमरस भूमिकांत दिसणाऱ्या नुसरतनं साकारलेली वेगळी भूमिका व टोकदार कथेमुळं हा भागही लक्षात राहतो.

‘गिली पूछी’ कथाचं दिग्दर्शन नीरज घायवाननं केलं आहे. ‘मसान’च्या दिग्दर्शनांमुळं तो घराघरांत पोचला आहे. या कथेतही सवर्ण-दलित संघर्षाचे गहिरे पदर त्यानं हलकेच उलगडून दाखवले आहेत. भारती मंडल (कोंकणा सेन-शर्मा) व प्रिया शर्मा (आदिती राव) या दोघी एकाच कारखान्यात काम करतात. मॅनेजर भारतीला डावलून प्रियाला संगणकावरचं काम देतो आणि त्यामुळं भारती नाराज आहे. यातही त्यांची मैत्री कायम असली, तरी एक टप्प्यावर जातीय उतरंडणीचा भारतीला त्रास होतो आणि ती याचा बदला आपल्या पद्धतीनं घेतो. कोंकणाचा अभिनय या कथेचं मोठं बलस्थान ठरलं असून, विवेक घायवानचं नेटकं दिग्दर्शन कथेला मोठी उंची देतं. ‘अनकही’ ही कायझो इराणी दिग्दर्शित शेवटची कथा सर्वाधिक हळवं करणारी ठरली आहे. नताशाची (शेफाली छाया) मुलगी मूक-बधीर आहे व तिच्यासाठी तिनं खुणांची भाषा शिकून घेतली आहे. मात्र, तिचा पती मुलीसाठी काही करायला तयार नाही असं तिला वाटतं आणि त्यामुळं दोघांत खटके उडतात. कबीर (मानव कौल) हा मूक-बधीर चित्रकार नताशाच्या आयुष्यात येतो व खुणांची भाषा त्यांच्यातील समान दुवा बनते. मात्र, कबीरमध्ये गुंतणं नताशासाठी नात्यातील मोठी गुंतागुंत घेऊन येतं. शेफाली छाया आणि मानव कौल यांच्यातील केमिस्ट्री या कथेचं वैशिष्ट्य ठरावं.