
ऑन स्क्रीन : डिसायपल : हेचि फल काय मम तपाला...
चैतन्य ताम्हाणे हा काय कमाल दिग्दर्शक आहे, हे ‘डिसायपल’ हा सिनेमा पाहिल्यावर समजतं. या चित्रपटाचं लौकिक अर्थानं परीक्षण लिहिणं ही अशक्यकोटीतील गोष्ट आहे. याचं कारण, दिग्दर्शक प्रत्येकालाच विचार करण्यासाठी अनेक जागा रिकाम्या ठेवतो व प्रत्येक जण त्याच्या पद्धतीनं त्या भरतो. त्यामुळं एकानं भरलेली जागा दुसऱ्याला पटेलच असंही नाही. (चित्रपटाचं लेखन, छायाचित्रण, संगीत, संकलन आणि अभिनय हा प्रत्येकी किमान एका लेखाचा विषय आहे, हीसुद्धा अडचण!) एका मध्यमवर्गीय घरातील मुलाची त्याच्या गुरूच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली संगीत क्षेत्रातील वाटचाल, अशी वनलायनर कथा कशी फुलवता येते आणि त्यातून किती गोष्टींवर भाष्य करता येऊ शकतं, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे ‘डिसायपल’...
संघर्ष हा प्रत्येकच क्षेत्रात असतो, मात्र परफॉर्मिंग आर्ट्समध्ये संघर्षाच्या जोडीला नशीब आणि त्यानं योग्य वेळी साथ देणं यालाही मोठं महत्त्व आहे. सामान्य घरातील एक मुलगा जेव्हा गुरूचा शब्द शिरसावंद्य मानून त्याच क्षेत्रात करिअर करीत राहतो, त्यासाठी नोकरी, संसार या गोष्टी दुय्यम मानतो, अशावेळी आलेल्या अपयशातून आलेली घुसमट खूपच तीव्र ठरते. ‘रागाच्या माध्यमातून परमेश्वरापर्यंत पोचण्याची वाट दाखवली आहे आणि तो मार्ग प्राप्त करण्यासाठी त्याग हा करावाच लागणार...’ हा या क्षेत्रातील पूर्वसुरींचा संदेश कानात घोळवत मार्गक्रमण करणारा शिष्य सर्व प्रकारचे त्याग करण्यास एका पायावर तयार असणार, यात शंकाच नाही. मात्र, एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर आणि पैशांच्या राशीत लोळण्याची संधी देणारे ‘रिॲलिटी शो’ पाहिल्यावर त्याच्या मनात चलबिचल तर होणारच ना? ‘या वाटेवर चालायचं असेल तर एकटं आणि उपाशी राहायला शिका,’ हा संदेश त्याला मान्य आहे, मात्र घरच्यांनी ठेवलेल्या अपेक्षांना पूर्ण करण्याच्या जबाबदारीचं काय, हा प्रश्नही उरतोच. नेमकी हीच घुसमट चैतन्य कथेच्या ओघात दाखवतो.
रियाज आणि साधनेच्या माध्यमातून प्रत्येक शिष्य गुरूनं साध्य केलेल्या दर्जापर्यंत पोचेल, असंही नाही. त्यात पुन्हा संपूर्ण तारुण्य एकाच ध्यासानं व्यतीत केल्यानंतर गुरूनं शिष्याच्या वकुबाबद्दल शंका व्यक्त केल्यानंतर निर्माण झालेली पोकळी हा तर मोठा धक्का देणारा प्रसंग. साधना कमी पडत नाही, मुळात टॅलेंटच थोडं कमी पडतं, हे लक्षात आल्यानंतर गायक, संगीतकार, अभिनेते, चित्रकार आदी कोणत्याही क्षेत्रातील कलाकाराची काय घुसमट होत असेल, याची कल्पना आपल्याला या चित्रपटातील एकाच प्रसंगातून येते. मग यातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधले जातात व ते याच क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करीत निवडले जातात. कोणी या विषयाचे क्लासेस घेतो, कुणी पुस्तकं लिहितो किंवा कुणी डिजिटल मीडियाचा वापर करीत याच क्षेत्रातील सर्वंकष माहिती लोकापर्यंत पोचवून उदरनिर्वाह सुरू ठेवतो. कलेच्या क्षेत्रांतील बहुतांश ‘शिष्यां’ची व्यथा अशीच असते आणि नेमका हाच धागा दिग्दर्शकाला सापडला आहे.
‘डिसायपल’चा शेवट करताना दिग्दर्शक शिष्यांच्या समस्येवरचं व्यावहारिक पातळीवरचं, भौतिक जगातलं उत्तर दाखवतो. मात्र, ‘संगीत परमेश्वरापर्यंत पोचण्याची वाट आहे आणि त्यासाठी त्याग करावाच लागतो,’ हे सांगणारी अनेक उदाहरण शेवटच्या एकाच फ्रेममध्ये दाखवत राहतो.
कुँए रे किनारे अवधू इमली सी बोई रे
जारो पेड़ मछलियां छायो हे लो
या पार्श्वभूमीवर वाजणाऱ्या गाण्यातील ‘काय पेरलं होतं आणि काय उगवलं,’ या नायकच्या मनातील खंत व्यक्त करणाऱ्या ओळी कानात घुमत राहतात आणि या दोन तासांच्या चित्रपटानं दिलेला विचार दोन दिवस झाले तरी मेंदूतून बाहेर पडत नाही...
Web Title: Mahesh Badrapurkar Writes About Disciple
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..