esakal | ऑन स्क्रीन : फॅमिली मॅन 2 : उत्कंठावर्धक, मनोरंजक
sakal

बोलून बातमी शोधा

Family Man 2

ऑन स्क्रीन : फॅमिली मॅन 2 : उत्कंठावर्धक, मनोरंजक

sakal_logo
By
महेश बर्दापूरकर

मनोज वाजपेयीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘फॅमिली मॅन’ या वेब सिरीजचा दुसरा भाग पहिल्यापेक्षा अधिक उत्कंठावर्धक आणि मनोरंजक झाला आहे. सामंथा अक्किनेनी या तमीळ अभिनेत्रीच्या प्रवेशामुळं या भागातील संघर्ष अधिक तीव्र झाला असून, हा भाग प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे.

पहिल्या भागात पाकिस्तानी अतिरेक्यांचा डाव उधळून लावलेल्या व ते करताना अनेक सहकाऱ्यांना गमावलेल्या श्रीकांत तिवारीनं (मनोज वाजपेयी) आता नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची (एनआयए) नोकरी सोडून एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी स्वीकारली आहे. त्यांच्या संसाराचा गाडाही आता व्यवस्थित सुरू आहे. मात्र, चेन्नईमध्ये श्रीलंकेतील तमीळ बंडखोरांच्या कारवाया सुरू होतात. त्यांचा नेता भास्करन आपल्या जवळच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं मोठी दहशतवादी कारवाई घडवून आणण्याची तयारी सुरू करतो. इकडं श्रीकांतच्या घरातील स्थिती अचानक बिघडते व पत्नीपासून काही काळ दूर राहण्यासाठी तो पुन्हा ‘एनआयए’ जॉईन करीत चेन्नईत दाखल होतो. राजी (सामंथा अक्किनेनी) एक मोठा घातपात करण्याच्या अंतिम टप्प्यात येऊन पोचते आणि श्रीकांत व राजीमध्ये मोठा संघर्ष पेटतो.

या सिरीजच्या पहिल्या भागात श्रीकांत, त्याचे कुटुंबीय व सहकाऱ्यांची ओळख पक्की झाली असल्यानं कथा पहिल्या भागापासूनच वेग घेते. श्रीकांत त्याच्या पत्नीशी जुळवून घेण्याचा करीत असलेला प्रयत्न, सॉफ्टवेअर कंपनीतील त्याचा वावर या गोष्टी मनोरंजक झाल्या आहेत. तमीळ गटांची जुळवाजुळव होऊन त्याच्या कारवाया सुरू होईपर्यंत चौथा भाग सुरू होतो व त्यानंतर कथा तुफान वेग पकडते. राजीचा चेन्नईतील वावर, ती काम करीत असलेल्या कंपनीच्या मालकाशी तिचा संघर्ष आणि नंतर ती थेट हल्ल्याची योजना आखण्यासाठी बाहेर पडण्याचा समांतर भागही कथा मनोरंजक बनवतो. शेवटच्या दोन भागांतील चित्रण, संकलन व अभिनय या सर्वांवर कळस चढवतो व पुढील भागाची तयारी करत हा भाग संपतो. राजकीय लोकांचे निर्णय चुकतात व त्याची किंमत देशाला मोजावी लागते, मात्र गुप्तहेर संघटनांतील अधिकारी आपल्या जिवावर खेळत देशाचे रक्षण करीत राहतात. त्यांना सत्तेवर कोण आहे आणि त्यानं काय चुका केल्या यामध्ये कोणताही रस नसतो, हा संदेश कथा उत्तमप्रकारे देते.

मनोज वाजपेयीचा अभिनय पुन्हा एकदा या सिरीजचे प्रमुख आकर्षण ठरले आहे. कुटुंबात वावरताना त्याचं संस्कारी वागणं आणि सहकाऱ्यांमध्ये पोहचताच भाषा बदलणं छान जमून आलं आहे. कुटुंबातील संघर्ष आणि सहकाऱ्यांबरोबरच्या विनोदी प्रसंगांत तो भाव खाऊन जातो. सामंथा अक्किनेनीचा अभिनय ही मोठी जमेची बाजू ठरली आहे. तिची आपल्या लोकांसाठी लढण्याची तळमळ, त्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी हे सगळं तिनं भेदक डोळे आणि देहबोलीतून छान साकारलं आहे. इतर सर्वच कलाकार त्यांना चांगली साथ देतात.

loading image