लग्नाची गोष्ट : ‘टॉम ॲण्ड जेरी’ची बुलेट ट्रेन!

आपल्या उत्स्फूर्त अभिनयानं आणि विनोदाच्या टाइमिंगने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारी एक लोकप्रिय सेलिब्रिटी जोडी म्हणजे निखिल रत्नपारखी आणि भक्ती रत्नपारखी.
लग्नाची गोष्ट : ‘टॉम ॲण्ड जेरी’ची बुलेट ट्रेन!

आपल्या उत्स्फूर्त अभिनयानं आणि विनोदाच्या टाइमिंगने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारी एक लोकप्रिय सेलिब्रिटी जोडी म्हणजे निखिल रत्नपारखी आणि भक्ती रत्नपारखी.

भक्ती आणि निखिल हे दोघंही पुण्याचे. त्यांची मैत्रीण गार्गी फुलेनं मध्यस्थी करीत भक्ती आणि निखिलची एकमेकांशी ओळख करून दिली. कालांतरानं त्यांची ओळख वाढत गेली आणि त्यांची छान मैत्री झाली. दीड-दोन वर्षं एकमेकांशी चांगली ओळख झाल्यावर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांचं लग्न होऊन दहा वर्षं झाली आहेत. भक्ती आणि निखिल यांचा स्वभाव जवळजवळ सारखाच आहे. दोघंही कायम आनंदी, उत्साही आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले असतात. भक्ती म्हणाली, ‘‘निखिलचा स्वभाव इतर नवऱ्यांसारखाच आहे. आमचं नातं अत्यंत हसरं खेळतं आहे. आमच्यात अनेक असे प्रसंग घडत असतात, ज्यानं आम्हा दोघांनाही हसू येतं. निखिल हा नेहमी हसतमुख असतो. तितकाच त्याला रागही लवकर येतो, पण तो राग पटकन निवळतोही.

आमच्यात कोणाचं काही चुकलं किंवा एखादी गोष्ट पटली नाही, तर ते आम्ही एकमेकांना स्पष्टपणे सांगतो. निखिलचं डेडिकेशन मला आत्मसात करायला फार आवडंल. एखादी गोष्ट मनासारखी न झाल्यास तो तेवढ्यापुरता नाराज होतो, पण दुसऱ्या दिवशी लगेच तो नव्या जोमानं कामाला लागतो. ही गोष्ट मी त्याच्याकडून गेली अनेक वर्षं शिकण्याचा प्रयत्न करत आहे.’’ निखिलनं सांगितलं, ‘‘भक्तीच्या रूपानं मला अत्यंत गोड स्वभावाची बायको मिळाली आहे. आमच्यात कोणत्याही नवरा बायकोत होत असतील तसे बारीकसे रुसवे-फुगवे होत असतात. पण ते फार काळ टिकत नाहीत. दोघंही मनोरंजन क्षेत्रात काम करत असल्यानं आम्हाला एकमेकांबरोबर घालवायला तसा कमी वेळ मिळतो. पण आम्ही एकत्र असताना प्रत्येक क्षण एन्जॉय करतो. आमचं सगळं गमतीशीर चाललेलं असतं. भक्तीला एखाद्या गोष्टीचा पटकन राग येतो, पण तिची दुसरी बाजू म्हणजे ती खूप समजूतदार आहे. सगळी परिस्थिती तिला नीट समजावून सांगितल्यावर ती लगेच समजून घेते.’’

भक्ती आणि निखिल यांनी ‘बेगम मेमरी आठवण गुलाम’ या नाटकात एकत्र काम केलं होतं. त्याबद्दल बोलताना भक्तीनं सांगितलं, ‘‘निखिलचा कामाचा अनुभव माझ्यापेक्षा खूप मोठा आहे. त्यामुळं मला सुरुवातीला त्याच्याबरोबर काम करताना भीती वाटायची. या नाटकाचं दिग्दर्शन निखिलनं केलं होतं. त्याच्याकडून मला टायमिंग, नाटकातील गिव्ह अँड टेक असं बरंच शिकायला मिळालं.’’ त्यावर निखिल म्हणाला, ‘‘तेव्हाची भक्ती आणि आताची भक्ती यात जमीन आस्मानाचा फरक आहे. इतक्या वर्षांत निरीक्षणातून आणि अनुभव घेत तिनं लक्षणीय प्रगती केली आहे.’’ निखिलनं साकारलेल्या सगळ्याच भूमिका भक्तीला आवडल्या, पण ‘व्हेंटिलेटर’, ‘सुपरस्टार’ आणि ‘घो मला असला हवा’ या चित्रपटांत निखिलनं केलेलं काम भक्तीला आवडलं. तसंच ‘टॉम ॲण्ड जेरी’ हे निखिलनं लिहिलेलं पहिलं नाटक भक्तीसाठी खास आहे.

निखिलला भक्तीचं ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कार्यक्रमातील काम आवडलंच, पण आता झी मराठीवरील ‘अग्गंबाई सुनबाई’ मालिकेत ती साकारात असलेलं मॅडी हे पात्र निखिलला विशेष भावतं. ‘माझा होशील ना’ या मालिकेत निखिल साकारत असलेल्या पिंट्या मामालाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय. याबद्दल निखिल म्हणाला, ‘‘हे पात्र थोडंसं माझ्यासारखंच आहे. थोडासा वेंधळा, थोडा निरागस, पटकन एखादी गोष्ट बोलून जाणारा हे त्याचे गुण माझ्यात असल्यानं मला ही भूमिका साकारणं चांगलं जमतं.’’ अशाप्रकारे प्रेक्षकांप्रामाणंच एकमेकांच्याही चेहऱ्यावर हसू आणत ही जोडी अत्यंत आनंदाने संसार करत आहे.

- निखिल रत्नपारखी, भक्ती रत्नपारखी

(शब्दांकन : राजसी वैद्य)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com