दिल तो बच्चा है :  आता पाहिजेत हसणारे मास्क! 

दिल तो बच्चा है :  आता पाहिजेत हसणारे मास्क! 

‘पप्पा मी माझ्या फ्रेंडंससोबत आपल्या घरी खेळू? हो का, हा बंटीहेना ह्याला खोकला नाही. बंटी खोकून दाखव रे.’ 

सहा वर्षाच्या बंटीनं खोकून दाखवलं. 

‘पप्पा, होका ह्या पिंकीला सर्दीपण नाही. पिंकी नाक ओढ गं.’ 

बारक्‍या पिंकीनं इवलसं नाक ओढून दाखवलं. 

‘आणि होका ह्या बबलूला तापपण नाही. बबलू पप्पांच्या जवळ जा रे.’ 

साडेपाच वर्षांचा बबलू डुलत डुलत माझ्याजवळ आला आणि मी त्याच्या कपाळाला हात लावला. 

मुलगा आणि त्याचे तीन फ्रेंडस माझ्याकडं निरागस चेहऱ्यानं पाहत होते. मी होकार देतोय की नकार, हा प्रश्‍न चौघांच्याही चेहऱ्यावर रुतलेला दिसत होता. 

‘बरं ठिकहे. खेळा तुम्ही हॉलमध्ये.’ 

मी असं म्हणताच चौघांचे चेहरे लख्खकन उजळले. इवल्याशा त्या निरागस चेहऱ्यावर निखळ हसू उमललं. सगळ्यांनी पटापट आपापल्या खिशात ठेवलेले मास्क काढले आणि नाकाला लावले. ते पाहून काळजात चर्रर्र झालं. अवाक होत मी त्या लहान जीवांना पाहू लागलो. मास्कला त्यांनी आपल्या जीवनाचं अविभाज्य भाग बनवून टाकलं होतं... 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लहानपणी शाळेत जाताना आई माझ्या शर्टाला रुमाल बांधून द्यायची. त्या रुमालाचं ओझं वाटायचं. तो रुमाल नाक पुसण्यासाठी असायचा म्हणून लाजही वाटायची. थंडीत वडील मला माकडटोपी घालायचे. त्या टोपीनं गळा आवळल्यासारखं व्हायचं. आज्जीसोबत रानात जायचो, तेव्हा आज्जी माझ्या डोक्‍याला रुमाल बांधायची. कधी एकदा तो रुमाल काढून फेकेल, असं व्हायचं. चप्पल नकोशी वाटायची की सॉक्‍स आणि बुटानी पाय बांधल्यासारखे वाटायचे. आजही कंबरेचा बेल्ट नकोसा वाटतो, तर हेल्मेट घालायची इच्छा होत नाही. अंगावरच्या कोणत्या ना कोणत्या कपड्यांचा वेळेनुसार तिटकारा वाटतोच. पण, ह्या नव्या पिढीच्या नशीबात मास्कने उडी टाकली. 

जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलयं की, आपल्याला आता कोरोनासोबत जगण्याची सवय लावून घ्यावी लागेल. याचा अर्थ भविष्यात शाळेच्या गणवेशात मास्कही समाविष्ट होईल. शर्ट, पॅण्ट, टाय, बेल्ट, शूज, सॉक्‍स होताच आणि मॅचिंग मास्कही येईल. ज्या लेकरांना नाक पुसता येत नाही त्यांना मास्क लावून शाळेत जावं लागेल. थोडं पळालं तरी धापा लागणाऱ्या लेकरांचा मास्कमुळं जीव गुदमरेल. पण, मास्क हटणार नाही. दुर्देवानं लहान लेकरांचं निरागस स्मित पाहणं दुर्मीळ होईल. शाळा कधी सुरू होतील माहिती नाही. पण, जेव्हा सुरू होतील तेव्हा प्रत्येक पालक आपल्या लेकराला मास्क लावून शाळेत पाठवेल. लेकरं आपल्या मित्रांना, मैत्रिणींना शोधतील. त्याच्यासोबत बोलतील. पण, चेहऱ्यावरचे भाव हरवलेले असतील. खोड्या काढून हसणारी, तोंड वाकडं करणारी, दातओठ खात एकमेकांवर चिडणारी, जीभ दाखवणारी, नाक वाकडं करणारी चिमणी पाखरं चेहऱ्यावरच्या हावभावासारख्या सहजसुंदर गोष्टीला मुकत जातील, असा विचार करत असतानाच साडेपाच वर्षाचा बबलू माझ्याजवळ आला आणि म्हणाला, 

‘काका, ती पिंकी दिदी मला हसतीये.’ 

तसं पिंकीनं चेहऱ्यावरचा मास्क काढला आणि म्हणाली, 
‘अरे बाबा बघ. मी हसत नव्हते रे, हे बघ.’ 

बबलूनं माझ्याकडं पाहिलं आणि पुन्हा त्या सगळ्यांसोबत खेळायला गेला. पिंकी हसत होती की नव्हती हे त्याला मास्कमुळं समजलच नव्हतं. मास्कनं लहान लेकरांच्या चेहऱ्यावरच हसूच पुसून टाकलं होतं. कोरोनानं डोळ्यातलं पाणी जसं वाढवलं, तसं हसूही हिरावून नेलं... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com