ते पाप होतं की पुण्य?

ते पाप होतं की पुण्य?

भल्या पहाटे धुकं पडलेलं. कधी नव्हे ते लवकर उठलो आणि कॅनॉलच्या दिशेनं चालायला निघालो. कॅनॉलच्या शेजारी एका भंगारवाल्याचं घर आहे. लांबूनच त्याच्या घराशेजारी शेकोटी पेटलेली दिसली. तिथं थोडं शेकावं अन्‌ मग पुन्हा पुढं जावं, असा विचार करत निघालो. शेकोटीपाशी दोन लेकरं बसलेली. दोघांनीही स्मित केलं. 

त्यांच्याशेजारी बसलो. म्हणालो, ‘तुमचं नावं काय रे?’ ‘माझं नावं बंटी अन्‌ ही आमची तायडीये.’ दोघंही पोरं हसत होती. थोडावेळ शेकोटीसमोर बसलो अन्‌ चालायला निघालो. 

अर्धा तासानं माघारी आलो तर दोन्ही पोरं डांबरी रस्त्यावर बसून काहीतरी निरखत होती. मी त्यांच्याजवळ गेलो तर तायडीच्या डोळ्यात पाणी. म्हणालो, ‘काय झालं रे?’ बंटी म्हणाला, ‘बघा ना काका, बेडकाच्या पिल्लाच्या अंगावरून गाडीचं चाक गेलं.’ दोघंही पोरं निष्पाप होती. त्यांच्या आवाजातूनच त्यांच्या मनातली व्याकुळता पाझरत होती. तायडीच्या खांद्यावर हात ठेवला, तर ती हुमसत रडायलाच लागली. म्हणाली, ‘काका ते पिल्लू थोडसं जीवंतहे. तुम्ही त्याला दवाखान्यात नेता का?’ आवंढा गिळत मी बेडकाच्या पिल्लाकडं पाहिलं. त्याच्या शरीराचा चेंदामेंदा झालता. परंतु, एक पाय थोडा हालत होता. तो हालणारा पाय पाहून या लेकरांना ते पिल्लू जिवंत असल्याची भाबडी आशा  लागली होती. 

मी म्हणालो, ‘हे बघा बाळांनो, हे पिल्लू आता जगणार नाही. त्याला दवाखान्यात नेणंही शक्‍य नाही. उलट मला वाटतं आपण त्याला असं तडफडत ठेवण्यापेक्षा मारायला हवं.’ 

माझं वाक्‍य संपलं तशी तायडी डोळे पुसत म्हणाली, ‘नाय नाय काका, ते तर मग पाप होईल ना? आपण ते पाप नाही करायचं.’ मी म्हणालो, ‘अगं तायडे, मग त्याला असं तडफडत ठेवणं योग्य आहे का? त्याला किती दुखत असेल. 

ते पिल्लू म्हणत असेल मी आता जगणार नाही. प्लीज मला मारून टाका. मग आपण त्या पिल्लाला मारून टाकणं पुण्यच  होईल ना?’

तायडीनं इवल्याशा नाजूक गळ्यातून आवंढा गिळत बंटीकडं पाहिलं. बंटीला माझं म्हणणं पटलं असावं. त्यानं होकारार्थी मान डुलवली अन्‌ म्हणाला, ‘तायडे, काका आपल्यापेक्षा मोठेहेत. ते म्हणताहेत मग बरोबरच असेल. पण, काका त्या पिल्लाला कोण मारणार? तुम्ही की आम्ही?’

मी म्हणालो, ‘हे बघा या पिल्लाला आपण मारत नाही. मुळात जी गाडी या पिल्लाच्या अंगावरून गेली त्या गाडीवाल्यानंही मुद्दाम या पिल्लाच्या अंगावर गाडी घातलेली नाही. आपण फक्त त्याचं दुखणं कमी करतोय. आपण त्याच्या अंगावर हळूच दगड ठेऊ आणि मग तो दगड हलक्‍या हाताने दाबू. पिल्लू मरून जाईल आणि दुखण्यातून मुक्त होईल.’

तशी तायडी घाबरली. म्हणाली, ‘मी नाय त्या पिल्लाच्या अंगावर दगड ठेवणार. चल बंटी तू पण नको हे काम करू.’ असं म्हणत तायडी घराकडं पळत गेली. मी बंटीकडं पाहिलं. बंटी जरा धीट होता. त्यानं मोठा दगड आणला. मी तो दगडं घेतला अन्‌ पिल्लाच्या अंगावर ठेवला. बंटीनंही दगडावर हात ठेवला अन्‌ हलकासा दाब दिला. पिल्लाचा पाय हालायचा थांबला होता. दोन काड्यांनी मी पिल्लू उचललं अन् रस्त्याशेजारच्या मातीत पुरलं. 

तायडी डोळे पुसत ते बघतच होती. मी म्हणालो, ‘तायडे, एवढं मनाला लावून नाय घ्यायचं. डोळे पूस बरं. अगं त्या पिल्लाला त्रास नको व्हायला म्हणून आपण त्याला मारून टाकलं ना? म्हणजे आपण चांगलंच काम केलंय.’ तायडीनं पुन्हा आवंढा गिळत माझ्याकडं पाहिलं अन्‌ म्हणाली, ‘माझी आज्जी दोन महिने झाले आजारीहे. तिला कालपासून रक्ताच्या उलट्या व्हायला लागल्यात. मग तिचं काय करायचं?’

पुढं काय बोलावं तेच उमजलं नाही. गुपचूप उठलो अन्‌ घराकडं निघालो. माझ्या त्या कृत्यानं पोरांच्या मनावर काय परिणाम झाला असेल याचा विचार आला तरी अंगावर काटा येतोय.

पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com