esakal | झूम : इलेक्ट्रिक वाहने इंजिनशिवायही वेगवान

बोलून बातमी शोधा

Electric Vehicle

झूम : इलेक्ट्रिक वाहने इंजिनशिवायही वेगवान

sakal_logo
By
प्रणीत पवार

सध्या इंधनाच्या वाढत्या किमती पाहता भारतामध्ये भविष्यात प्रवास खर्चाच्या दृष्टीने इलेक्ट्रिक वाहने हाच एकमेव परवडणारा पर्याय राहण्याचे चित्र आहे. या तंत्रामध्ये वर्षागणिक सुधारणा होत आहे, परंतु इंजिनाशिवाय ही वाहने कशी धावू शकतात, विद्युत वाहनांमध्ये असे काय तंत्रज्ञान असते, याचाच आढावा आपण घेणार आहोत.

बॅटरी पॅक

बॅटरी हे इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमुख ऊर्जास्रोत आहे. वाहनाची चाके फिरण्यासाठी या बॅटरी विद्युत ऊर्जा साठवण्याचे काम करतात. बॅटरी हा या वाहनांतील सर्वांत महागडा घटक आहेत. इलेक्ट्रिक वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या बॅटरी ‘लिथियम-आयन’च्या बनलेल्या असतात. यात ऊर्जा साठवण क्षमता सर्वाधिक असते.

इलेक्ट्रिक मोटर

वाहनामध्ये ताकद निर्माण करण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर महत्त्वपूर्ण ठरते. एकूण ऊर्जा उत्पादन आणि विद्युत वहनाची कार्यक्षमता इलेक्ट्रिक मोटरद्वारे निश्चित केली जाते. ही मोटर विद्युत वाहनाच्या दोन चाकांमध्ये फिट केलेली असते. या मोटरची संख्या आणि त्यांचे स्थान या आधारे विद्युत वाहने फ्रंट व्हिल ड्राईव्ह (FWD), रिअर व्हील ड्राईव्ह ( RWD) आणि ऑल व्हील ड्राईव्ह (AWD) आहेत की नाही, हे ठरते.

इन्व्हर्टर

कारमधील इन्व्हर्टर हे बॅटरीमधून येणारा ‘डीसी’ प्रकारातील विद्युत प्रवाह ‘एसी’ प्रवाहात रुपांतरीत करण्याचे काम करते. त्यानंतर हा विद्युत प्रवाह मोटरमध्ये जातो. मोटरमधील ही ताकद चाकांमध्ये जाते आणि ते वेगात फिरतात. याशिवाय काही विद्युत वाहनांमध्ये ब्रेक दाबल्यानंतर गतिज ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा बॅटरी चार्ज करण्यासाठी उपयोगी ठरते. यात इन्व्हर्टर हे गतिशील ऊर्जेला वापरायोग्य ऊर्जेत रुपांतरीत करण्याचे महत्त्वाचे कार्य करते.

बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम

विद्युत वाहनांमधील ‘बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम’ ही विद्युत प्रणाली असून, त्याद्वारे बॅटरीची देखभाल केली जाते. ही प्रणाली बॅटरीचा विद्युत दाब, तापमान, विद्युत प्रवाह आदींचे निरीक्षण करते, ज्याद्वारे एखादी हानी टळून बॅटरीचे आयुर्मान वाढवण्यास मदत होते.

इलेक्ट्रिक व्हेईकल ट्रान्स्मिशन

एखादी कार म्हटली की त्यात इंजिन आणि गिअर आलेच. परंतु विद्युत वाहनांना इंजिनच नसल्याने त्यांना गिअर असतात का, याबाबत अनेकांच्या मनात शंका असते. तर इलेक्ट्रिक कारमध्ये गिअरचा पर्यायही असतो. परंतु तो नेहमीपेक्षा वेगळा असते. या वाहनांना केवळ ‘सिंगल स्पीड ट्रान्स्मिशन सिस्टीम’ असते. ज्याद्वारे ही वाहने अधिक वेगाने धावू शकतात.

चार्जर

इलेक्ट्रिक उपकरणांप्रमाणेच इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करण्यासाठी चार्जरची आवश्यकता असते. या वाहनांमध्ये पोर्टेबल चार्जर असतो ज्याद्वारे आपण इलेक्ट्रिक वाहन घर किंवा ‘डीसी’ विद्युत प्रवाह असलेल्या ठिकाणी चार्ज करू शकतो.

इलेक्ट्रिक वाहनाचे फायदे

 • पर्यावरण संवर्धनासाठी इलेक्ट्रिक वाहने फायदेशीर आहेत. प्रदूषण करत नाहीत.

 • देखभाल खर्चही स्वस्त आणि कमी असतो.

 • कारमध्ये अधिक मोकळी जागा मिळते.

 • प्रतिकिलोमीटर प्रवास खर्च कमी असतो.

 • खरेदीवर कर सवलतही मिळू शकते.

 • इंधन वाहनांपेक्षा वेगवान असतात.

इलेक्ट्रिक वाहनांमधील उणिवा

 • चार्ज करण्यासाठी अधिक वेळ लागतो. पूर्ण चार्ज केल्यानंतरही कमी अंतर धावतात.

 • बाजारात ठराविक वाहन कंपन्यांनीच विद्युत वाहने आहेत.

 • पेट्रोल-डिझेल पंपाप्रमाणे चार्जिंग स्टेशन नाहीत.

 • किमती सध्या खूपच जास्त.

 • बॅटरीमधील रसायने ठराविक परिस्थितीत पर्यावरणासाठी हानिकारक ठरू शकतात.