गप्पा ‘पोष्टी’ : ‘च’ची डेंजर बाधा!

‘च’ची बाधा ही फार डेंजर गोष्ट असते! तुम्ही ‘ग’च्या बाधेबद्दल ऐकलं असेल, पण ‘च’च्या बाधेबद्दल कधीही ऐकलं नसेल!
Characters
CharactersSakal

‘च’ची बाधा ही फार डेंजर गोष्ट असते! तुम्ही ‘ग’च्या बाधेबद्दल ऐकलं असेल, पण ‘च’च्या बाधेबद्दल कधीही ऐकलं नसेल!

‘च'’च्या बाधेची पहिली पायरी म्हणजे स्वतःच्या एखाद्या गुणाला ‘च’ लावणे. मी शहाणा‘च’ आहे, मी हुषार''च’ आहे, मी गुणी‘च’ आहे, मी अमुक''च’ आहे, मला सगळ्यांतलं सगळं कळतं‘च’. ही ‘च’च्या बाधेची पहिली पायरी! खरंतर ह्यात काही तथ्य नसतं. आपण सर्वच क्षेत्रांत, सर्वच बाबतीत सदा सर्वकाळ शहाणे, हुषार, गुणी, अमुक-ढमुक असे काही नसतो. पण ‘च’ची बाधा झाली, की आपण आपल्या असल्या-नसलेल्या गुणांचं असं सरसकटीकरण करतो!

‘च’च्या बाधेची दुसरी पायरी म्हणजे आपल्या जवळच्या लोकांच्या वागण्या-बोलण्याला ‘च’ लावणं! ‘तू नेहमी असा‘च’ वागतोस’, ‘तू माझ्याशी रागानं‘च’ बोलतेस’, ‘तू माझ्याकडं दुर्लक्ष''च'' करतोस’, असे अनंत ‘च’ आपण आपल्या जिवलगांच्या वागण्या-बोलण्याला लावायला लागतो. ही देखील ‘च’ची बाधा असते. ह्यामुळं आपल्या जवळच्या लोकांच्या काहीवेळच्या वागण्या-बोलण्याचं आपण सरसकटीकरण करायला लागतो.

सरसकटीकरणाचा ‘च’

‘च’च्या बाधेचा पुढचा टप्पा म्हणजे आपल्याला भेटणाऱ्या लोकांचं वर्गीकरण करून, त्यांचे गट करून, त्यांचं सरसकटीकरण करणं हा असतो. म्हणजे उदाहरणार्थ, एखाद्या दुकानदारानं आपल्याला दहा-वीस रुपयांना टोपी घातली की, ‘सगळे दुकानदार चोर''च’ असतात,’ असं म्हणणं किंवा एखाद्या माणसानं आपल्याशी भांडण केलं तर त्याची जात शोधून ‘अमुक जातीची माणसं भांडकुदळ''च’ असतात’ असं म्हणणं किंवा एखाद्या माणसानं कुठेकाही अतिरेकी कारवाई केली तर त्याचा धर्म पाहून, ‘तमुक धर्माची माणसं अतिरेकी‘च’ असतात,’ असा समज करून घेणं! ही सारी सारी सरसकटीकरणाची, ‘च’ची बाधा झाल्याची लक्षणं आहेत...

कर्माऐवजी कर्त्यालाच ‘च’

‘च’च्या बाधेची सगळ्यांत शेवटची अन् अत्यंत डेंजरस पायरी म्हणजे कर्माला किंवा गुणवैशिष्ट्याला ‘च’ लावण्याऐवजी, कर्त्याला ‘च’ लावणं! म्हणजे, मी शहाणा‘च’ आहे म्हणण्याऐवजी, मीच शहाणा आहे असं मानणं. आपली जिवलग व्यक्ती आपल्याशी वाईटच वागते. असं मानण्याऐवजी आपली जिवलग व्यक्तीच आपल्याशी वाईट वागत आहे, असं मानणं. आणि अर्थातच, व्यापारी‘च’ चोर असतात, अमुक जातीची‘च’ माणसं भांडकुदळ असतात, तमुक धर्माची‘च’ माणसं अतिरेकी असतात असं सारं सारं मनापासून मानायला लागणं.

'च'' हा कर्माऐवजी कर्त्याला जाऊन चिकटतो तेव्हा ‘च’च्या बाधेची, आपल्या डोक्यातल्या सरसकटीकरणाची शेवटची पायरी आपण गाठलेली असते!! ही इतकी डेंजर असली, तरी ‘च’च्या बाधेची एक गंमत आहे,

इतर सगळ्यांना‘च’ होत असलेली ही ‘च’ची बाधा आपल्याला कधी‘च’ होत नाही हे प्रत्येकाला‘’' वाटत असतं!!

मला ही कधी‘च’ होत नाही, तुम्हालाही होत नसेल''च’ ना?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com