गप्पा ‘पोष्टी’ : हापूस! 

Hapus-Mango
Hapus-Mango

गीतेच्या दहाव्या अध्यायामध्ये ‘आपण कशामधले कोण आहोत’ याची एक यादी आपले किसनबाप्पा देतात. यात ‘मासानां मार्गशीर्षोऽहम, ऋतूनां कुसुमाकरः’ वगैरे ते म्हणतात. म्हणजे महिन्यांमध्ये मार्गशीर्ष मी, ऋतुंमध्ये वसंत मी, मुनींमध्ये व्यासमुनी मी वगैरे बरीच मोठी यादी भगवंतानं दिली आहे; पण त्यात ‘फळांमध्ये मी आंबा आहे’ असं भगवंत कुठे म्हणल्याचं दिसलं नाही! पण हे अगदी स्वाभाविक आहे. आपले भगवंत द्वारकेचे. तिकडे केशर नावाचं एक आंबासदृश फळ आंबा म्हणून प्रसिद्ध आहे. किसनबाप्पानं तेच फळ आंबा म्हणून खाल्लं असण्याची शक्यता असल्याने त्याचं फार कौतुक करावं असं त्यांना वाटलं नसावं. भगवान तेव्हा कोकणाकडे फिरकले असते आणि एकदा तरी त्यांनी हापूस चाखला असता तर ‘फळांमध्ये मी आंबा आहे’ ही ओळ त्यांनी गीतेत नक्की टाकली असती! कारण, आंबा हा जर फळांचा राजा असेल तर ‘हापूस’ हा आंब्यांचा अनभिषिक्त सम्राट आहे!

हापूसमध्येही दोन घराणी आहेत. देवगड आणि रत्नागिरी. हिरवटसर केशरी रंगाचा देवगड आणि पिवळटसर केशरी रत्नागिरी. देवगड आंब्याची त्वचा नितळ, तर रत्नागिरी आंब्याची त्वचा सुरकुतलेली. पण दोन्हींच्या त्वचा ओलांडून एक मिलिमीटरभर आत निव्वळ स्वर्गसुखाचा गाभा.

हापूसचा आंबा ही पंचेद्रियानं ग्रहण करण्याची गोष्ट आहे! नैसर्गिकरित्या पिकलेला केशरी होत चाललेल्या आंब्याचा रंग आणि त्याचा कोयरीसारखा आकार आधी डोळ्यांनी मनसोक्त बघून घ्यावा. आंबा उचलून घेऊन देठाशी वास घ्यावा आणि त्याचा स्वर्गीय दर्वळ श्वासांमध्ये साठवून घ्यावा. त्याच्या सालीचा मऊशार, उबदार स्पर्शही अनुभवावा. तो कापताना होणारा चर्र असा नाजूकसा आवाजही ऐकावा. खाताना ओठांना आणि जिभेला होणारा अद्‍भुत स्पर्श आणि स्वर्गीय चव डोळे मिटूनच अनुभवावी.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हा स्वर्ग दरवर्षी मर्यादित काळासाठीच अनुभवायला मिळतो. अगदी एखाद-दुसरा महिना. खऱ्याखुऱ्या हापूसच्या किंमती हल्ली हल्ली फारच आवाक्याबाहेर जायला लागल्या आहेत हे कितीही खरं असलं, तरी बजेटमध्ये बसेल इतपतच खावा, कमी खावा; पण हापूसच खावा. आख्ख्या वर्षात एकच आंबा खाणं जमत असेल तरी चालेल; पण खायचा तो हापूसच.

अर्थात, मीच नव्हे, तर हापूसवर जीवापाड प्रेम करणारे कोट्यवधी आहेत! म्हणूनच वाटतं, की भगवंतानं त्याकाळी हापूस एकदातरी चाखून बघितला असता तर गीतेमध्ये ‘फळाची अपेक्षा धरू नकोस’ हे सांगितलं असतंच; पण ते फळ ‘हापूसचा आंबा’ असेल तर त्याला किसनबाप्पानं सूट दिली असती, शिवाय पुढे दहाव्या अध्यायात, ‘फळांमध्ये मी हापूसचा आंबा आहे’ हे सांगण्यासाठी तो नक्की म्हणाला असता, की ‘फलानां हापूसोहं!’

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com