esakal | गप्पा ‘पोष्टी’ : ‘कोट भास्कर’माणसं!
sakal

बोलून बातमी शोधा

People Talking

गप्पा ‘पोष्टी’ : ‘कोट भास्कर’माणसं!

sakal_logo
By
प्रसाद शिरगावकर

‘एकाला एकानं गुणलं, भागलं, त्याचा वर्ग केला किंवा एकाचं घनमूळ काढलं तरी उत्तर शेवटी एकच येतं, हे तू सतत लक्षात ठेव,’ मित्रानं जीवनाचं सार सांगणारं एक वाक्य माझ्या तोंडावर धाडकन फेकलं आणि तो शांतपणे माझ्याकडं बघत राहिला. मी साधा प्रश्न विचारला होता की ‘बायकोचा वाढदिवस विसरलो, रुसवा काढण्यासाठी काय गिफ्ट देऊ?’ त्या प्रश्नाचा आणि त्यानं दिलेल्या उत्तराचा काय संबंध आहे हे मला समजत नव्हतं!

त्याचं असंय, की आपण काहीही प्रश्न विचारला तरी जीवनाचं सार सांगणारं एखादं वाक्य धाडकन आपल्या तोंडावर फेकायची या मित्राची सवय आहे! कोणत्याही प्रश्नाचं उत्तर म्हणून हा कोणतंही प्रसिद्ध किंवा अप्रसिद्ध असं एखादं ‘Quote’ आपल्या अंगावर फेकतो. या मित्राला मी ‘कोट-भास्कर’ म्हणतो! असे कोटभास्कर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असतात! ह्या कोटभास्करांच्या संग्रहात जगातले कोट्यवधी कोट्स असतात! ह्यांच्या संग्रहात ज्ञानोबांची ओवी, तुकोबांच्या अभंगापासून ते डार्वीन-आईनस्टाईनच्या बोलल्या - न बोललेल्या वाक्यांपर्यंत कोणतीही कोट्स असू शकतात! गीता-कुराण-बायबलपासून दास कॅपिटॉल आणि अगदी ‘बोलगाणी’मध्ये लिहिलेल्या सर्व ओळी ह्यांना तोंडपाठ असतात. ह्यातल्या कोणत्या ओळी, कोणते कोट्स कुठे फेकावेत याचं ह्यांना जन्मजात ज्ञान असतं! जीवनाचं सार का काय ते ह्या साऱ्या कोट्समध्येच सामावलेलं आहे, ही ह्या कोटभास्करांची समजूत! कोणीही त्यांच्याकडं कोणतीही समस्या घेऊन गेलं, की आपल्या संग्रहातल्या कोट्यवधी कोट्समधलं एखादं कोट त्याच्याकडं फेकल्यानं त्याच्या समस्येचं समाधान होईल असं ह्यांना ठामपणे वाटत असतं! मग हे करण्यासाठी कोणाचंही कोट कोणाच्याही तोंडी चिकटवायला हे मागं-पुढं बघत नाहीत! मग ज्ञानोबांची ओवी आइन्स्टाईन गाऊ शकतो किंवा हॉकिंगचा फॉर्मुला तुकोबांच्या अभंगात येऊ शकतो!

एखादं कोट निर्माण करण्याची क्षमताही यांच्यामध्ये असते! ‘एकाला एकानं गुणणं’ वगैरेचं ह्या लेखाचं ओपनिंगचं कोट हे याचं उदाहरण!! पण मित्राला चॅलेंज केल्यास हे कोट तो चाणक्याच्या फोटोला चिकटवून टाकू शकतो, म्हणून मी त्याला चॅलेंज करत नाही. आयुष्याचं सर्वच सत्य, कोणी ना कोणी सांगितलेल्या कोणत्या ना कोणत्या ‘कोट’मध्ये सामावलेलं असतं, असं त्याला खरोखर वाटतं. त्यालाच नाही, बहुसंख्य कोटभास्करांना वाटत असतं, म्हणून अशा कोटभास्करांना चॅलेंज करण्याऐवजी फक्त कोटी-कोटी प्रणाम करावेत!