esakal | गप्पा ‘पोष्टी’ : आपली ‘श्रीमंती’!
sakal

बोलून बातमी शोधा

Rich

गप्पा ‘पोष्टी’ : आपली ‘श्रीमंती’!

sakal_logo
By
प्रसाद शिरगावकर

‘तू तर गर्भश्रीमंत दिसतोस,’ असं आपल्याला कोणी म्हटलं की आपण जरा चपापतोच! चारचौघात आपल्याला श्रीमंत, पैसेवाला वगैरे म्हटलं, की उगाचच मनात एक अपराधगंड येतो. इतरांना आपण ‘श्रीमंत’ वाटतो म्हणजे काहीतरी चुकीचं आहे, असं पटकन वाटून जातं. आणि लगेच ‘नाही रे, मी काही श्रीमंत नाही,’ अशी आपण सारवासारव करायला लागतो!

हे का होतं मला कळत नाही! श्रीमंत असण्यात किंवा आहोत असं इतरांना वाटण्यात चुकीचं काय आहे मला समजत नाही!

कदाचित सत्तर-ऐंशीच्या दशकांमधल्या अमीर-गरीब टाईपच्या हिंदी सिनेमांचा आपल्यावरच्या पगड्याचा हा परिणाम असावा. त्यातला ‘अमीर’ म्हणजे कोणीतरी शेठ-सावकार, गल्ल्यावर बसून पैसे मोजणारा, वाईट्ट काळे धंदे करणारा, किसान-मजुरांची ब्येक्कार पिळवणूक करून पैसा कमावणारा, टॅक्स बुडवणारा वगैरे सॉलिड व्हिलन असायचा. आणि हिरो अत्यंत गरिबीत राहणारा, काबाडकष्ट करणारा, अत्यंत सद्गुणी, सदाचारी वगैरे असायचा. एकुणात, श्रीमंत माणसं वाईटच आणि गरीब माणसं चांगलीच असा सरधोपट बाळबोध संदेश देणारे सिनेमे असायचे तेव्हा! ह्या बाळबोध सिनेमांचा अफाट पगडा असावा आपल्यावर! म्हणूनच कोणीही चारचौघांत ‘तू श्रीमंत आहेस’ म्हटलं की उगाच अपराधीपणाची भावना मनात येते!

ह्याशिवाय, ‘पैशांनी सगळी सुखं विकत घेता येत नाहीत’, ‘पैशांच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती महत्त्वाची’ वगैरेंसारखी मध्यमवर्गीय मनांना दिलासा देणारे असंख्य वाक्प्रचार, म्हणी, गाणी वगैरे आपण लहानपणापासून ऐकत असतो. या सगळ्यातून ‘पैसा म्हणजे सर्वकाही नाही’ आणि ‘तो नसेल तरीही आनंदी राहाता येतं’ हे आपल्या मनावर बिंबलेलं असतं. प्रचंड पैसा जवळ नसला, तरी आनंदी राहाता येतं हे शिकणं, समजणं आणि तसं जगू शकणं हे चांगलंच आहे, गरजेचंही आहे. पण ह्याचा अर्थ, पैसा असला आणि आपण श्रीमंत झालो, तर लग्गेच दुःखी होतो असाही होत नाही! पैसा नसताना, गरिबीत-मध्यमवर्गात जसे आनंदी राहू शकतो, तसेच पैसा असताना श्रीमंतीत-गर्भश्रीमंतीतही आनंदात राहू शकतोच की!

अफाट मेहनत घेऊन, स्वतःची बुद्धिमत्ता वापरून, कोणालाही न लुबाडता, कोणालाही टोप्या न घालता, सर्व कर प्रामाणिकपणे भरूनही रग्गड पैसा कमावणं शक्य असतंच ना? मग अशी कमाई करून आपण ‘श्रीमंत’ झालो तर यात वाईट किंवा चुकीचं काय आहे? आणि ही कमाई लोकांना दिसल्यावर त्यांनी आपल्याला ‘श्रीमंत’ वगैरे म्हटलं तर अपराधी कशाला वाटून घ्यायचं?

आणि शेवटी असंय बघा, की आपला समाज प्रचंड मोठ्या आर्थिक उतरंडीवर आधारित आहे. ह्यात गरीबी-श्रीमंती ही खूपच रिलेटिव्ह कल्पना आहे. आपण कितीही कमावले तरी अंबानी-अदानीपेक्षा गरीबच राहणार आणि कितीही कमी कमावले तरी फुटपाथवर राहावं लागणाऱ्या दुर्दैवी जीवांपेक्षा आपण श्रीमंतच असणार. त्यामुळं इतर कोणी काय म्हणतंय यावरून उगाचच आपल्या आर्थिक स्थितीचा न्यूनगंड, अहंगंड किंवा अपराधगंड असा काहीच घ्यायचं नाही.

म्हणूनच, कोणी आपल्याला ‘तू श्रीमंत आहेस किंवा दिसतोस’ असं म्हटलं की अपराधी वाटून न घेता, त्याव्यक्तीचे मनापासून आभार मानावेत आणि म्हणावं,

‘तुला मी श्रीमंत वाटतो आहे, तर तसंच होवो. तथास्तु!!’

loading image