esakal | गप्पा ‘पोष्टी’ : माझं काही चुकतंय का?
sakal

बोलून बातमी शोधा

Eyes

गप्पा ‘पोष्टी’ : माझं काही चुकतंय का?

sakal_logo
By
प्रसाद शिरगावकर

एखाद्या व्यक्तीच्या समोर शांतपणे बसून, नजरेस नजर भिडवून, ‘माझं काही चुकतंय का?’ असं विचारणं ही जगातली सगळ्यांत जास्त अवघड गोष्ट! हे करण्यासाठी मुळात आपलं काहीतरी चुकत असू शकतं याचा स्वीकार असायला लागतो, ते दुसऱ्या व्यक्तीसमोर उघड करायचं धैर्य असावं लागतं आणि त्याविषयी दुसऱ्याला काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपला इगो बाजूला ठेवून कान आणि मन खुलं ठेवता यायला लागतं. 

‘माझं काही चुकतंय का?’ हे विचारणं हे अत्यंत अवघड असलं, तरी हे करावंच. आपल्या आयुष्यातल्या अत्यंत जिवलग व्यक्तींसोबत करावं. दर काही ठराविक काळानं करावं. आयुष्यात महत्त्वाचे प्रसंग किंवा घडामोडी घडत असताना किंवा घडून गेल्यावर करावं. आपण प्रचंड ताणातून जात असताना करावं. प्रचंड दुःख भोगत असताना करावं. महत्त्वाचे निर्णय घेत असताना करावं. महत्त्वाचे निर्णय

फसल्यावर करावं. आणि अगदी खरंतर सगळं छान छान सुरू असताना, अफाट यश वगैरे मिळत असतानाही करावं! 

जिवलग असणंही महत्त्वाचं!

आपल्या वागण्या-बोलण्या-वावरण्याची संपूर्ण जाणीव आपल्याला असतेच असं नाही. आपल्या जगण्याचा स्फटिकासारखा स्वच्छ अवेअरनेस आपल्याला असतोच असंही नाही. आपलं बोलणं-वागणं, आपल्या भूमिका, निर्णय आपल्याला आपल्या बाजूनं सतत योग्यच वाटत असतात. अन् स्वतःच्या खरेपणाच्या, चांगलेपणाच्या आणि योग्यपणाच्या धुंदीत राहूनच आपण आपलं आयुष्य जगत असतो. अधूनमधून या ‘स्व’केंद्रित कोषातून बाहेर येऊन आरसा बघणं गरजेचं असतं. आपल्या एखाद्या जिवलग व्यक्तीसमोर बसून ‘माझं काही चुकतंय का?’ विचारणं हाच तो आरसा!  आपली स्वतःविषयीची कल्पना आणि आरशात दिसणारी आपली प्रतिमा पूर्णपणे भिन्न असू शकतात. म्हणूनच,  ह्या आरशात बघण्यासाठी इगो पूर्णपणे गुंडाळून बाजूला ठेवावा लागतो. आपल्या स्वतःविषयीच्या कल्पनेइतकंच जिवलगांच्या मनातल्या प्रतिमेलाही महत्त्व द्यावं लागतं.  अर्थात, ज्यांना हा प्रश्न विश्वासानं विचारू शकू अन् जे प्रामाणिक उत्तर देऊ शकतील, असे जिवलग आपल्या आयुष्यात असणंही महत्त्वाचं असतं! तशी माणसं जोडावीत, असलेली ओळखावीत अन् त्यांना नक्की विचारावं हे. हे जरा अवघडच असतं. पण तरी हे करावं, कारण हे जमलं तर ते विलक्षण सुंदर असतं! आपलं आयुष्य हे फक्त आपल्या एकट्याचं नसून आपल्या जवळच्या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींचंही असतं. त्यामुळं आनंदी आयुष्यासाठी फक्त आपली कल्पनाच नाहीस तर जिवलगांच्या मनातली त्याची प्रतिमाही महत्त्वाची असते. त्यामुळं वेळोवेळी हा आरसा बघत राहावा प्रत्येकानं. 

लेखाच्या सुरुवातीला म्हटलं तसं, एखाद्या व्यक्तीच्या समोर शांतपणे बसून, नजरेस नजर भिडवून, ‘माझं काही चुकतंय का?’ असं विचारणं ही जगातली सगळ्यांत जास्त अवघड गोष्ट आहे. मात्र अवघड असली तरी आयुष्य समृद्ध करू शकणारी गोष्ट आहे. ही नक्की करत राहावी, दर काही काळानं!

loading image