
गप्पा ‘पोष्टी’ : ‘ॲप्प’लपोटा समाज!
व्यासपीठावर आपापल्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेल्या मान्यवरांना मनापासून लाइक करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. आज ह्या इथे, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी संयोजकांनी मला एसएमएस करून बोलावलं म्हणून त्यांचे आभार आणि त्यांनी पाठवलेल्या व्हॉट्सॲप निमंत्रणाचा स्वीकार करून आपण सगळे इथे जमलात म्हणून आपलेही आभार.
आज ह्या इथे, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर उहापोह करण्याआधी, हे विशेष सांगावंसं वाटतं की, आज ह्या ठिकाणी आपला समाज पूर्णपणे मोबाईलवेडा झालेला दिसत आहे. आता यावर चर्चा, विश्लेषणं, वाद वगैरे होत राहतीलच. पण आज तो विषय नाही. आजचा विषय आहे की बाईलवेडापासून मोबाईलवेडापर्यंत झालेल्या प्रवासामुळे समाजात ‘ॲप्प’लपोटेपणा का निर्माण झाला असावा असा.
आता गंमत बघा, भाषण देण्यासाठी इथं उभं राहिल्यावर समोर माईक बघून, ‘OK Google’ असा संदेश माझ्या नेत्रपटलांवर तरळला. मोठ्या निग्रहानं हा ‘गूगल नाऊ’चा माईक नसून खराखुरा माईक आहे, असं मी मनाला पटवून देत असतानाच त्या माईकच्या खाली, ‘Hold to record, release to send’ असा व्हॉट्सॲपीय संदेश मला दिसायला लागला. हे दोन्ही टाळून मी बोलायला सुरुवात करणार इतक्यात सवयीनं हात खिशात जाऊन मी माझा मोबाईल काढला आणि माईक सोबतचा व्यासपीठावरचा एक सेल्फी काढूनच मी बोलायला सुरुवात करतो आहे.
त्याचं असंय बघा, मी कितीही, कुठंही लाख बोललो, तरी त्याचा सेल्फी काढून मी पोस्ट करत नाही; तोवर मी कुठंतरी कायतरी बोललो यावर इतरांचा सोडा, माझाही विश्वास बसणार नाही. आणि हां, तुम्हीही आता खिशातून मोबाईल काढून आपापले सेल्फी काढा, नाहीतर हे ऐतिहासिक भाषण ऐकण्यासाठी तुम्ही ‘याची मोबाईल-याची सिमकार्ड’ उपस्थित होतात यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही!
पण ते असो. तर आज ह्या इथं, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण जमलो आहोत. मी इथं यायचं ठरवलं ते कुठल्याशा ॲपवर संयोजकांचं रॅंकिंग बघून आणि तुम्ही इथं आलात ते कुठल्याशा ॲपवर वक्त्यांचं रॅंकिंग बघून. आपण सगळ्यांनीच येताना कुठल्याशा ॲप्सवरून कॅब्ज बुक केल्या होत्या. जातानाही तेच करणार आहोत. घरी गेल्यावरही एखादं ॲप वापरून घरी अन्न मागवून जेवू. आणि या भाषणापासून ते घेतलेल्या कॅब्ज आणि खाल्लेल्या अन्नापर्यंत सर्व गोष्टींची रेटिंग्ज वेगवेगळ्या ॲप्सना देत आपण झोपी जाऊ.
अर्थात, सुखानं निवांत झोप लागावी यासाठीचं ॲप अजूनतरी कुठंही उपलब्ध नाही. पण तेही ॲपस्टोअरवर आलं तर तेही आपण घेऊ आणि ते ॲप वापरून सुखानं झोपायचाही प्रयत्न करू. पण ते सारं सारं असो!
तर मी माझं भाषण संपवताना मी स्टेजवर आपापल्या मोबाईल्समध्ये गर्क असलेल्या मान्यवरांसोबत एक सेल्फी काढतो आणि माझे हे दोन शब्द संपवतो!
(एका काल्पनिक सभेतलं काल्पनिक भाषण!)
Web Title: Prasad Shirgavkar Writes About
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..