esakal | गप्पा ‘पोष्टी’ : जगातलं भारी आइस्क्रीम

बोलून बातमी शोधा

Ice Cream
गप्पा ‘पोष्टी’ : जगातलं भारी आइस्क्रीम
sakal_logo
By
प्रसाद शिरगावकर

लहानपणी उन्हाळ्याची सुट्टी लागली, की आइस्क्रीम पार्टीचे वेध लागायचे. माझ्यासारखं ऐंशी दशकात ज्यांचं लहानपण गेलं त्यांना, आइस्क्रीम हा किती मौल्यवान पदार्थ होता हे नक्कीच आठवत असेल! एकतर तो अत्यंत कमी ठिकाणी मिळायचा आणि अत्यंत महाग असायचा. त्याचे कुल्फीसारखे गरीब भाऊबंद ‘त्याने पोट बिघडेल’ म्हणूण खायला बंदी असायची. कदाचित महाग असल्याने असेल, पण आइस्क्रीम खाल्लं की घसा धरेल, खोकला होईल, आजारी पडशील वगैरे धमक्या दिल्या जायच्या. कोणाचं लग्न किंवा मुंज यात मिळणारी व्हॅनिला आइस्क्रीमची सपक चकती वगळता आइस्क्रीम तसं दुर्मिळच असायचं.

मात्र उन्हाळ्याच्या सुट्टीत घरगुती आइस्क्रीम पार्टीचे वेध लागायचे. शेजारीपाजारी मित्र-मैत्रिणी, शाळेतले भिडू किंवा चुलत-मावसभावंडांच्या गँगचा आइस्क्रीम पार्टीचा प्रोग्रॅम ठरायचा. त्यासाठी एखादा दिवस मुकर्रर करून आइस्क्रीम पॉट’ नावाचं एक यंत्र भाड्यानं आणलं जायचं. कोणीतरी धावपळ करून बर्फाची लादी विकणारा माणूस शोधून बर्फ विकत आणायचं. कोणी खडेमीठ आणायचं अन् ज्याच्या घरी पार्टी तो दूध आटवून त्यात साखर अन् काही इसेन्स वगैरे घालून आइस्क्रीमच बेसिक मटेरिअल तयार करून ठेवायचं. मग संध्याकाळी या यंत्राच्या पॉटमध्ये आइस्क्रीमचं बेसिक मटेरिअल टाकायचं. बाजूच्या कप्प्यात बर्फ-मीठ टाकायचं अन याचं हँडल गोल गोल फिरवायला लागायचं. गप्पा-गोष्टी-गाणी-भेंड्या वगैरे वगैरे धमाल करत करत हँडल आळीपाळीनं फिरवत बसायचं.

‘अरे घट्ट लागतंय, घट्ट लागतंय,’ असं कोणी ओरडलं, की थांबून सगळे उत्साहानं पॉटचं झाकण उघडून आइस्क्रीम झालं का बघायचं. नसेल झालं की ओरडणाऱ्याला दोन शिव्या देवून आणखी जोर लावून फिरवायला सांगायचं! फायनली खरोखर ते हँडल जड लागायला लागायचं. फिरवणं जवळपास अशक्य व्हायला लागायचं. मग पॉटचं झाकण उघडून आत तयार झालेलं आइस्क्रीम बघणं हा देखील अशक्य भारी अनुभव असायचा!! मग ते डावानं आपापल्या बशीत घेऊन मनमुराद चापणं केवळ स्वर्गसुख!!

लहानपण सरल्यावर, पुढं कामानिमित्त जगभर हिंडलो, जगभर असंख्य प्रकारची उत्तमातली उत्तम आईस्क्रीम्स खाल्ली. हल्ली भारतात घराच्या कोपऱ्यावर महागातली महाग आईस्क्रीम्स वर्षभर मिळत असतात. तीही मन होईल तेव्हा जाऊन खातो, मात्र लहानपणीचं उन्हाळ्याच्या सुट्टीत मित्र-मैत्रिणी किंवा भावंडांसोबत पॉटमध्ये केलेलं आइस्क्रीम अजूनही जगातलं एक नंबरचं आईस्क्रीमच आहे माझ्यासाठी!! अन् जगातली भारीतली भारी आईस्क्रीम्स आजूबाजूला उपलब्ध असलेल्या जमान्यातल्या आपल्या पुढच्या पिढीनं, हे पॉटमधलं आपण स्वतः केलेलं आइस्क्रीम कधीच अनुभवलं नाही याची रुखरुख वाटते अनेकदा. असा पॉट मिळवून त्यात आइस्क्रीम केलं पाहिजे पुन्हा एकदा! जगातलं सगळ्यांत भारी आइस्क्रीम काय असतं ते आपल्या मुलांनाही करून दाखवलं पाहिजे!