गप्पा ‘पोष्टी’ : शत्रुबुद्धिविनाशाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गप्पा ‘पोष्टी’ : शत्रुबुद्धिविनाशाय

गप्पा ‘पोष्टी’ : शत्रुबुद्धिविनाशाय

sakal_logo
By
प्रसाद शिरगावकर

तुम्ही कधी कोणाशी कडकडून भांडला आहात का? म्हणजे लहानपणीच्या खेळातल्या भांडणापासून ते मोठेपणीच्या रस्त्यावरच्या भांडणापर्यंत कुठंही, कधीही, कोणत्याही कारणानं? अर्थातच भांडला असालच. कारण कधीच कोणाशीच न भांडलेली माणसं एकतर अत्यंत लेचिपेची असतात किंवा संतपदी पोचलेली. ही दोन्ही टोकाची माणसं सोडली तर, नॉर्मल माणसं भांडतात! कोणत्याही कारणानं आणि कारण नसतानाही भांडतात. जिवलगांशी, नात्यातल्यांशी, शेजाऱ्या-पाजाऱ्यांशी, ओळख असलेल्यांशी, अनोखळी माणसांशी, खऱ्या मित्रांशी, ऑनलाइन कनेक्शन्सशी, सगळ्या-सगळ्यांशी भांडतात.

आपल्या मनाविरुद्ध काहीही घडलं, की ते घडवणाऱ्या माणसाशी आपण कडाकडा भांडतो. खऱ्या आणि ऑनलाइन आयुष्यात, सगळीकडंच भांडतो. अन् बऱ्याचदा बहुसंख्य भांडणं तिथल्यातिथं मिटवतोही. मात्र कधी असं होतं की कोणतं एखादं भांडण तिथल्यातिथं मिटत नाही. भांडणातल्या दोन्ही पक्षांना अफाट हरल्याचं फीलिंग येतं. समोरच्याचा आपण सूड घेतला पाहिजे किंवा वचपा काढला पाहिजे, असं वाटतं. आणि मग भांडणातल्या दोन्ही पक्षांपैकी कोणी एक किंवा दोघंही मनात डूख धरून ठेवतात. आपल्या (तथाकथित) अपमानाचा बदला घेण्याची वाट बघत तयारी करत राहातात. दुसऱ्या पक्षातल्या व्यक्तीला आपला शत्रू मानायला लागतात.एका साध्याशा नॉर्मल भांडणातून, ‘आपला कोणीतरी कट्टर शत्रू आहे’ असं वाटण्याचा आपल्या मनातला प्रवास हीच ती ‘शत्रुबुद्धी’! कोणीतरी आपला शत्रू आहे असं वाटायला लागलं की आपण ‘शत्रुबुद्धीनं’ वागायला लागतो. आपला शहाणपणा, सारासारबुद्धी, सद्सदविवेक सारं मागे पडतं. आपल्या शत्रूला आपण पाण्यात पाहायला लागतो. दिसेल तेव्हा, दिसेल तिथं त्याला ठेचायचा प्रयत्न करायला लागतो किंवा त्याला ठेचण्याच्या संधी शोधायला लागतो. आपल्या शत्रूचं अशुभ आणि अकल्याणच व्हावं म्हणून आपण आपलं स्वतःचं आरोग्य आणि धनसंपदाही स्टेकला लावतो. आपली बुद्धी आपल्या शत्रुबुद्धीकडं गहाण पडते. आपलं वागणं-बोलणं आपली शत्रुबुद्धीच ठरवायला लागते.

एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट पटत नसेल तर कडकडून भांडणं किंवा एखाद्या माणसाशी एखाद्या प्रसंगात जमलं नाही, तर तिथल्या तिथं भांडून विषय संपवणं हे नॉर्मलच आहे. ते करतच राहिलं पाहिजे. पण अशा भांडणांतून आपल्या मनात शत्रुबुद्धी जागी होत असेल आणि ती आपल्या जगण्याचं मोठं अवकाश व्यापत असेल, तर मात्र आपण जागं झालं पाहिजे. कारण शत्रुबुद्धीनं आपला स्वतःच्या आणि इतरांच्याही शुभ, कल्याण, आरोग्य आणि धनसंपदेचा अफाट व्यय आणि नुकसान होऊ शकतं.

कोणाशीही कडकडून भांडण केल्यानंतर, तो विषय तिथेच संपला आहे की आपल्या मनात शत्रुबुद्धी निर्माण झाली आहे, याचा अवेअरनेस, जाणीव किंवा स्पष्टता ही एक दीपज्योत असते. आणि ही दीपज्योत प्रत्येक भांडणानंतर आपल्या आयुष्यात प्रकाशमान होणं खूप महत्त्वाचं असतं. अशी अवेअरनेस किंवा जाणीवेची दीपज्योत आपल्या आयुष्यात प्रकाशमान होत राहाणं ही खरी प्रकाशाची पूजा. ही खरी दिवाळी!

शुभम् करोति कल्याणं, आरोग्यम् धनसंपदा

शत्रुबुद्धि विनाशाय, दीपज्योति नमोस्तुते!

आमच्या सर्व वाचकांना

दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

loading image
go to top