esakal | प्रचलित शिक्षण व्यवस्था अन् भारताचं उज्वल भविष्य
sakal

बोलून बातमी शोधा

student

प्रचलित शिक्षण व्यवस्था अन् भारताचं उज्वल भविष्य

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

-- आदित्य देशमुख

काल सहज दहावीच्या परिक्षेपूर्वी होणाऱ्या कलचाचणी चा निकाल हातात आला अर्थात हा घरातल्या सगळ्यांनी पहिला होता यात माझा कल हा कला व वाणिज्य क्षेत्राकडे 95 टक्के असल्याचं सांगितलं होतं तरीही आज मी विज्ञान शाखेत शिकतोय !

सहज म्हणून काही वेगवेगळ्या शाळेतल्या मित्रांना फोन लावले त्यांच्या बाबतीतही हेच सगळं घडलं होतं पण तरीही शाखा मात्र विज्ञानच बरं गंमत म्हणजे त्यातल्या 70 टक्के मुलांना विज्ञान शाखा निवडण्याच कारण विचारल्यावर आई वडिलांची इच्छा नावच शस्त्र त्यांनी वापरल, 10% मुलांनी स्वतःला आवडत म्हणून निवडलं अस सांगितलं तर उर्वरित 20 टक्के मुलांना शाखा निवडण्याच कारण सुद्धा सांगता आलं नाही !

आता यातले किती जण प्रत्यक्ष lecture करतात हा वेगळाच मुद्दा, बरं याहून भयंकर म्हणजे ज्यांच्या दहावी च्या निकालात विज्ञानाचे गुण कोणतेही पाच म्हणजे बेस्ट ऑफ फाईव्ह मध्ये गणलेच नाहीत त्यांनी सुद्धा विज्ञान शाखा निवडलीये! यावर कारण विचारल्यावर टक्केवारी वरच्यासारखीच, मग हा कलचाचणीचा अट्टाहास ठेवायचाच कशाला ?

पालक या कलचाचणी ला भाव देत नाहीत, कॉलेजही प्रवेशावेळी याचा काडीचाही विचार न करता अन् जर थोडी फीस जास्त दिली तर टक्केवारी सुद्धा न बघता प्रवेश देतं तर कशाला उगाच शासनाचा अन् विद्यार्थ्यांचा वेळ वाया घालवायचा आता त्यांना विद्यार्थी म्हणायचं का परीक्षार्थी हा तर अजून भयंकर मुद्दा.

एकंदरीतच काय तर राष्ट्राच भविष्य घडवणाऱ्या तरुणाईच करियर आता आवड, क्षमता, संधी यावर अवलंबून न राहता पालकांची इच्छा, मान, मिळणारा पैसा, अन् लोक काय म्हणतील यावर अवलंबून राहिलेलं दिसतंय.

पण, यामुळे विद्यार्थ्यांचं मजुरांमध्ये होणारं रूपांतर वाढत चाललंय. इच्छा नसताना नको वाटणाऱ्या क्षेत्रात मुलांना ढकलणे, त्यातही तुझं डोकं चालवू नको सांगितलंय तेवढं कर, कॉलेजला गेला नाहीस तरी चालेल पण खासगी ट्युशन मध्ये जाऊन त्यांची घरदार व्यवस्थित भर, अन् त्यानंतर कागदी शिक्षण घेऊन त्याच कागदाचे घोडे नाचवून एखाद्या ठिकाणी कायमची नौकरी अर्थात पर्मनंट जॉब नावाच्या फांदीवर घट्ट बसून सुरक्षित आयुष्य जग. त्यातही फांदी जर सरकारी मिळाली तर होणाऱ्या बायकोच्या बापाला दोन तीन लाखाला जास्त लुटता येईल ही आमची मानसिकता!

कधी बदलणार ही मानसिकता ? बरं पुन्हा मराठी माणूस धंदा करत नाही, निर्णय घ्यायला घाबरतो, मराठी माणूस सगळीकडे कमी पडतो असं म्हणणाऱ्याची पोरं महाराष्ट्रात राहून कोटा पॅटर्न शिकता, म्हणजे ह्यांना महाराष्ट्रातल्या शिक्षकांवर सुद्धा विश्वास नाही मग महाराष्ट्राबद्दल बोलायचं अधिकार ह्यांना दिला कुणी? माझं तर स्पष्ट मत आहे की दर्जेदार शिक्षणाचा कोटा पॅटर्न आता आपल्या महाराष्ट्रात अशा जाहिराती करून पालकांना लुटणाऱ्यांना पोकळ बांबूंनी हाणला पाहिजे. महाराष्ट्रातलं शिक्षण अन् शिक्षक विद्यार्थी घडवूच शकत नाहीत का? आणी जर शिक्षण व्यवस्था कमी पडतेय तर ती बदलणार कोण? यासाठी तुम्ही बोलणार कधी? राष्ट्राचं भविष्य घडवणारे तरुण स्वतःच भविष्य वयाच्या 16 सोळाव्या वर्षी सुद्धा ठरवू शकत नाहीत या सारख दुसरं दुर्दैव काय असणार?

मुळात पालकांनी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या जास्त फीस अन भव्य इमारत म्हणजे चांगलं शिक्षण ही संकल्पना आधी डोक्यातून काढून टाका. तुमच्या मुलाला जगण्यासाठी व्यावहारिक ज्ञान हवंय, दूध कोण देतं हा प्रश्न विचारल्यानंतर दूधवाला भैय्या दूध देतो असं उत्तर देणाऱ्या आपल्या मुलांना पावशेर अन् पाऊण किलो मधला फरक कळत नाही, मराठीतले 75 म्हणजे नेमके किती हा यक्ष प्रश्न उभा राहतो त्यांच्यासमोर, चुकून एखाद्यानं मराठीत मोबाईल नं सांगितला तर हीच स्मार्ट मुलं भूत बघीतल्यासारखी बघतात. इंग्रजी हे तुम्हाला जगाशी जोडणार माध्यम आहे फक्त तुमचं सर्वस्व त्याला का देतायत? अन् महाराष्ट्रात राहून मराठी शाळा बंद करणाऱ्यांना तर हाणलाच पाहिजे.

पोरांना ढोरं बनवून कोंडवाड्यात टाकू नका त्यांना करिअर निवडताना फक्त मार्गदर्शन करा तुमची मतं त्यांच्यावर लादू नका. शासनाने सुद्धा घेण्यात येणाऱ्या कलचाचणीच स्वरूप बदलावं, दहावीची परीक्षा जेवढी कडक घेता तेवढीच ही चाचणी सुद्धा कडक घ्या, कलचाचणी च्या माध्यमातून आवड लक्षात आल्यावर आवडत्या क्षेत्रात काम करण्यासाठी लागणारी शारीरिक व मानसिक चाचणी घ्या नसेल तर त्यासाठी अभ्यासक्रम ठरवा त्याला प्रशिक्षण देऊन खऱ्या अर्थाने आदर्श नागरिक म्हणून तयार करा, तीन महिन्यांच्या समर vacation क्लास नावाच्या पिंजऱ्यात कोंडण्यापेक्षा हे जास्त उपयोगी ठरेल, अन महत्वाचं म्हणजे कलचाचणी चे 60 टक्के अन् लेखी परीक्षा चे 40 टक्के गुण यावर कॉलेजने प्रवेश द्यायचे आदेश काढा, तिथून पुढची तीन वर्षे कौशल्यभिमुख शिक्षण द्या रोजगाराच्या संधी निर्माण करा, यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करा, वेगळा असा आत्मनिर्भर महाराष्ट्र घडवण्याची गरजच भासणार नाही, अन् भारताला खरी खुरी महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही!!!

शेवटी क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे

loading image