esakal | लग्नाची गोष्ट : कॉम्ल्पिमेंटमधून ‘पवित्र रिश्‍ता’

बोलून बातमी शोधा

Priya Marathe Shantanu Moghe
लग्नाची गोष्ट : कॉम्ल्पिमेंटमधून ‘पवित्र रिश्‍ता’
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मराठी चित्रपट सृष्टीत अनेक सेलिब्रिटी जोड्या या ‘आयडियल कपल’ म्हणून ओळखल्या जातात. अशीच सर्वांची आवडती आणि अनेकांसाठी आदर्श असलेली जोडी म्हणजे अभिनेत्री प्रिया मराठे आणि अभिनेता शंतनू मोघे. प्रिया आणि शंतनू यांची ओळख झाली ती त्यांच्या दोघांच्याही एका जवळच्या मैत्रिणीमुळे. पहिल्यांदा भेटल्यावर एकमेकांशी गप्पा मारतानाच त्या दोघांनाही जाणवलं, की त्यांचे विचार जुळतायंत आणि आपल्याला जे म्हणायचंय ते एकमेकांना खूप छान समजतंय. पुढं त्यांच्यात खूप छान मैत्री झाली आणि दीड वर्ष एकमेकांना डेट केल्यावर ते बोहल्यावर चढले. आता लवकरच त्यांच्या लग्नाला नऊ वर्षं पूर्ण होतील. त्यांच्यातलं हे मैत्रीचं नातं आजही तसंच आहे किंबहुना ते आणखीन खुललं आहे.

प्रियानं आतापर्यंत अनेक निगेटिव्ह भूमिका साकारल्या; पण खऱ्या आयुष्यात मात्र ती नायिका आहे. शंतनूनं सांगितले, ‘‘प्रिया ही अत्यंत सुस्वभावी आणि मनमिळाऊ मुलगी आहे. आमचं लग्न ठरल्यापासून तिने माझ्या आई-बाबांना, नातेवाईकांना, मित्र-मंडळींना इतकं आपलंस केलं आहे, की आता प्रियाच त्यांच्यासाठी जास्त जवळची झाली आहे. ती गप्पिष्ट आहे, खेळकर आणि सतत हसतमुख असणारी मुलगी आहे. एखाद्या व्यक्तीशी आपली फार ओळख नसताना त्याला सांभाळून घेऊन त्याच्यासोबत एक छान नातं तयार करणं हा तिचा स्वभाव फार आवडतो. तिची चित्रकालाही चांगली आहे. तो तिच्या जिवाभावाचा विषय आहे. घरी आवर्जून वेळ काढून ती आपली कला कागदावर उमटवत असते.’’

शंतनूबद्दल बोलताना प्रिया म्हणाली, ‘‘शंतनू खूप प्रेमळ, मॅच्युअर, समजूतदार, समंजस असा मुलगा आहे. त्याला कशाचीच भीती नसते. कधी एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली, तर तो त्याचं दुःख करत बसत नाही. त्याउलट सगळ्याकडं तो सकारात्मक दृष्टिकोनातून बघतो. पुन्हा नव्या जोमानं सुरुवात करू, परत लढू, परत उभे राहू असा त्याचा अप्रोच असतो आणि त्याच्या स्वभावातली हीच गोष्ट मला विशेष आवडते. यामुळं मलाही सकारात्मक ऊर्जा मिळत आली आहे. ‘‘शंतनूला ‘तू तिथे मी’, ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘जयोस्तुते’ या मालिकांमध्ये प्रियानं साकारलेल्या भूमिका विशेष आवडल्या. तर शंतनूनं स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रिया अतिशय भावली. शंतनूचं या भूमिकेसाठी सर्वत्र कौतुकही झालं आहे. याच मालिकेत प्रियानंही एक छोटीशी भूमिका साकारली होती. यानिमित्तानं त्या दोघांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली. प्रिया म्हणाली, ‘‘स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत आमचे एकत्र फार कमी सिन्स होते, पण आम्ही सेटवर एकत्र असताना मला ओळखूही यायचं नाही, की हा माझा नवरा आहे. त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांची वेषभूषा केल्यानंतर तो पूर्णपणे त्या भूमिकेत शिरायचा आणि त्याचा एक प्रभाव निर्माण व्हायचा. ‘‘प्रियाचा मूळ स्वभावच मनमिळाऊ आहे. तिचं समोरच्या व्यक्तीशी बॉण्डिंग तयार व्हायला फार वेळ लागत नाही. कामाच्या वेळेला ती तिचं १००% देऊन काम करते. बाकी सिन्सच्या मध्ये फावल्या वेळात तिची मस्ती सुरू असते. माझं थोडं उलट आहे. मला एखाद्याशी जवळीक साधायला थोडासा वेळ लागतो. पण एकदा का समोरच्याशी माझी गट्टी जमली की ती जन्मभरासाठी असते,’’ असं शंतनूनं सांगितलं.

प्रिया आणि शंतनू यांच्या आवडीनिवडीही सारख्या आहेत. ते दोघंही खवैये आहेत. गाडीवरच्या पाणीपुरीपासून ते फाइव्ह स्टार हॉटेलमधल्या जेवणापर्यंत ते सगळेच पदार्थ आवडीनं खातात. लग्नाआधी प्रिया पूर्णपणे शाकाहारी होती, पण शंतनूसोबत राहून तिला आता नॉनव्हेजही आवडू लागलं आहे. शंतनूला प्रियाच्या हातचं जेवण अतिशय आवडतं. तो म्हणाला, ‘‘प्रियाच्या हाताला छान चव आहे. पोळीभाजीपासून उकडीचे मोदक, पुरणपोळ्या, माशाच्या कालवणापर्यंत सगळेच पदार्थ ती कुणाचीही मदत न घेता बनवते.’’

प्रिया आणि शंतनू कोणत्याही गोष्टीत तुझं माझं करत नाहीत. आनंदाचा प्रसंग असो किंवा एखादा कठीण प्रसंग असो, त्याला आपलं म्हणून बघतात. अशाप्रकारे एकमेकांना ‘कॉम्प्लिमेंट’ करत ते त्यांच संसार करत आले आहेत असं या दोघांनी बोलताना सांगितलं आणि हेच त्यांचं नातं इतकं छान राहण्यामागचं एक खास कारण आहे.

(शब्दांकन - राजसी वैद्य)