esakal | टेक्नोहंट : ‘डिजिटल होर्डिंग’चा तुम्हालाही मनस्ताप?
sakal

बोलून बातमी शोधा

Digital Hording

टेक्नोहंट : ‘डिजिटल होर्डिंग’चा तुम्हालाही मनस्ताप?

sakal_logo
By
ऋषिराज तायडे

आपल्यापैकी अनेकांना पुढे कधीतरी काम पडेल म्हणून आपल्या डिव्हाईसमध्ये फोटोज्, व्हिडिओज् तसेच फाईल्स साठवून ठेवण्याची सवय असते. कधीतरी डिव्हाईस चाळत असताना लक्षात येते, की किती अनावश्यक डेटा आपण साठवून ठेवला आहे. त्यावेळी थोडा-थोडका डेटा आपण डिलीट करतो. महत्त्वाचा मुद्दा, आपण जितका जास्त डेटा साठवून ठेऊ, तेवढीच सायबर सुरक्षेचे धोके आणि सायबर गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता वाढते. बदलत्या तंत्रज्ञानामुळे डेटा स्टोरेजसाठी नवनवीन साधने उपलब्ध झाल्याने अनेकांना डेटा साठवून ठेवायची सवय झाली आहे. अशाप्रकारे डिजिटल डेटाचा ढीग जमा करण्याला डिजिटल होर्डिंग असेही म्हटले जाते. त्याचे सायबर गुन्हेगारीच्या दृष्टीनेच नव्हे, तर अनेक पातळीवर दुष्परिणाम संभवतात.

मग उपाय तरी काय?

  • तुम्ही कधी वाचत नसलेल्या न्यूजलेटर्सना लगेच अनसबस्क्राईब करा. ई-मेलमधील अनावश्यक पडून असलेले मेल्स सरसकट डिलीट करून टाका. प्रमोशन म्हणून आलेला मेल थेट डिलीटच करून टाका.

  • तुमच्या डेस्कटॉपला अगदी तुमच्या कामाच्या टेबलप्रमाणे वापरा. तिथे वस्तूंची गर्दी असली की कामावर लक्ष केंद्रित करणं कठीण होतं हे लक्षात घ्या. त्यामुळे डेक्सटॉपवर जास्त पसारा करू नका. नेहमीच कामात येणाऱ्या फाइलचे एकच फोल्डर तयार करा.

  • अनेकांना अनेक फाइल्स किंवा लिंक बुकमार्क करून ठेवायची सवय असते. बुकमार्क केलेल्या लिंकची मर्यादा ठरवा आणि दर महिन्याला त्याचे ऑडिट करून आता त्याची आवश्यकता आहे की नाही त्यावरून बुकमार्क डिलीट करा.

  • अनावश्यक मेसेज, अॅप्स, फोटोज्, व्हिडिओजमुळे मोबाईलचे निम्म्याहून अधिक स्टोरेज व्यापलेले असते. कधीतरी त्याकडे लक्ष देऊन साफसफाई मोहीम राबवा.

  • महिन्यातून एकदा क्लाऊडवर तुम्ही कोणता डेटा साठवून ठेवलाय, त्याचे कसे वर्गीकरण केले आहे, त्याबाबत आढावा घ्या. त्यावेळी नको असलेल्या फाइल्स डिलीट करून टाका. कॅचे फाइल्स, डिजिटल ट्रॅश, रिसायकल बिन्सही आठवड्यातून एकदा रिकामा करण्याची सवय लावा.

डिजिटल होर्डिंगचे दुष्परिणाम

  • डिव्हाईसचा वेग कमी होणे - तुमच्या डिव्हाईसमध्ये जितका जास्त डेटा साठवला जाईल, तितके त्याचे काम वाढेल. परिणामी डिव्हाईसचा वेग कमी होण्याची शक्यता असते. त्यासोबतच सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून तुमचा डेटा हॅक होण्याचा किंवा त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते.

  • कार्यक्षमतेत घट - तुमच्या डिव्हाईसमधील एखादी फोटो किंवा फाइल शोधण्यासाठी तुम्ही सहजपणे Control + F करतो. तुम्हाला वाटेल. की ही सहजसोपी प्रक्रिया आहे. मात्र, तुमच्या डिव्हाईसमधल्या डेटाच्या ढिगाऱ्यात ती फाइल शोधण्यास संगणकाला पडद्यामागे बरीच मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे तुमच्या डिव्हाईसची कार्यक्षमता घटण्याची शक्यता असते.

  • मानसिक त्रास - तुम्ही डेटा जितका अधिक साठवून ठेवाल, त्यानुसार त्याचे व्यवस्थापन करताना तुम्हाला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. डेटा साठवणुकीचे योग्य व्यवस्थापन न केल्यास प्रसंगी डेटा गमावून बसण्याची शक्यता असते.