टेक्नोहंट : ‘डीआरडीओ’चे कोरोनासाठी ‘आत्मन’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

DRDO

टेक्नोहंट : ‘डीआरडीओ’चे कोरोनासाठी ‘आत्मन’

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर देखील मोठा ताण निर्माण झाला. कोरोनावरील उपाययोजनेसाठी वैद्यकीय संशोधक सातत्याने प्रयत्न करत आहे. कोरोनाचे अचूक निदान होण्यापासून ते नवनव्या उपचारपद्धती विकसित करण्यासाठी संशोधक रात्रंदिवस प्रयत्न करत असल्याचे आपण पाहात आहोत. आतापर्यंत कोरोनाचे निदान करण्यासाठी आरटी-पीसीआर आणि अॅंटिजन चाचणी हे दोन पर्याय आपल्याकडे उपलब्ध होते. मध्यंतरी इस्राईलच्या एका कंपनीने रुग्णाच्या आवाजावरून कोरोनाचे निदान करणारी पद्धत विकसित केली होती. त्यापाठोपाठ आता डीआरडीओ आणि सेंटर फॉर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्सने (सीएआयआर) नुकतेच छातीच्या ‘एक्स-रे’वरून कोरोनाचे अचूक निदान करणारी प्रणाली विकसित केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेल्या या टूलचे नाव ‘आत्मन एआय'' असे ठेवण्यात आले आहे.

मूळात कोरोना विषाणूने शरिरात प्रवेश केल्यावर लक्षणे दिसण्यापूर्वी फुफ्फुसावर परिणाम करणे सुरू होते. लक्षणे दिसत नसल्याने अनेकजण चाचणीही करत नाही. त्यामुळे लक्षणविरहित रुग्णांकडून संसर्ग वाढण्याचा धोका आहेच. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य यंत्रणेने कोरोना चाचण्यांची संख्या वाढवली आहे; मात्र आरटी-पीसीआर चाचण्यांसाठी लागणाऱ्या वेळेमुळे प्रयोगशाळांवरही प्रचंड ताण आहे. त्यावर उपाय म्हणून ‘आत्मन’च्या छातीचा एक्स-रे काढल्यानंतर मदतीने संबंधित रुग्ण हा कोरोनाचा आहे की न्यूमोनियाचा, याचे निदान अवघ्या काही सेकंदात केले जाते. त्यामुळे कमी वेळात निदान झाल्याने रुग्णावर तातडीने उपचार सुरू करता येतात. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात हातभार लावण्यासाठी डीआरडीओकडून वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले केले जात आहे. त्याचाच भाग म्हणून ‘आत्मन’ प्रणाली विकसित करण्यात आली. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असे डीआरडीओच्या वतीने सांगण्यात आले.

९६.७३ टक्के अचूकता

डीआरडीओ आणि सीएआयआरने विकसित केलेल्या ‘आत्मन’ प्रणालीची बंगळूरच्या ‘एचसीजी सेंटर फॉर अॅकॅडमिक्स अॅण्ड रिसर्च’ आणि ‘अंख लाइफ केअर’ येथे चाचणी घेण्यात आली. त्यात या प्रणालीची अचूकता ९६.७३ टक्के असल्याचे डीआरडीओने म्हटले आहे. त्यानंतर नुकतेच केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने याबाबतची घोषणा केली.

‘आत्मन’ची कार्यप्रणाली

  • आत्मन प्रणालीच्या बॅकएन्डला ‘डीप कन्व्होल्युशन न्यूरल नेटवर्क’ तयार केले आहे.

  • एक्स-रे काढल्यानंतर ही प्रणाली सदर प्रतिमा न्यूरल नेटवर्ककडे पाठवण्यापूर्वी स्वतःहून त्यावर प्रक्रिया करते.

  • त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने संसर्गाच्या प्रकारानुसार सदर रुग्ण हा कोरोनाचा आहे की न्यूमोनियाचा, याबाबत निदान केले जाते.

  • ही प्रणाली मोबाईल, लॅपटॉप, संगणकावरही वापरणे शक्य आहे.

टॅग्स :CoronavirusDRDO