esakal | टेक्नोहंट : ऑग्मेन्टेड रिॲलिटीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

robotics and augmented surgery

टेक्नोहंट : ऑग्मेन्टेड रिॲलिटीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया

sakal_logo
By
ऋषिराज तायडे

सामान्यतः कोणतीही शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांना अनेक काम करावे लागते. शिवाय डॉक्टरांना त्याचे सूक्ष्मपातळीवर नियोजन करावे लागते. मात्र, तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक किचकट शस्त्रक्रिया विनासायास केल्या जात आहेत. अशाच प्रकारे ऑग्मेन्टेड रिॲलिटीचा वापर करून डॉक्टरांनी सात ते आठ तासांची शस्त्रक्रिया अवघ्या दोन तासांत पूर्ण केली.

पाठीचा कणा मोडला किंवा मज्जासंस्थेत बिघाड झाल्यास त्यावर शस्त्रक्रिया करायची म्हटल्यास डॉक्टरांपुढे अनेक आव्हाने उभे राहतात. या प्रकारच्या शस्त्रक्रियांमध्ये फार काळजीपूर्वक काम करावे लागते. कारण पाठीच्या कण्याच्या शस्त्रक्रियांमध्ये किंचितही हलगर्जी झाली, तर रुग्णांच्या जिवावर बेतू शकते. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून किचकट शस्त्रक्रिया सोप्या पद्धतीने करण्याचा संशोधकांनी प्रयत्न केला आहे.

अशी झाली मणक्यावरील शस्त्रक्रिया

नवतंत्रज्ञानाचा वापर करत लॉस वेगास येथील रोबोटिक स्पाईन इन्स्टिट्यूटच्या डॉ. कॉर्नेलिस पोलस्ट्रा यांनी ऑग्मेन्टेड रिॲलिटीचा वापर करून मणक्यावरील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. रोबोटिक्स आणि ऑग्मेन्टेड रिॲलिटीचा यामध्ये वापर करण्यात आला. प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करण्यापूर्वी संशोधकांनी अस्थिरोगतज्ज्ञ आणि मेंदूविकारतज्ज्ञांच्या मदतीने शस्त्रक्रियेदरम्यानचे विविध टप्पे, प्रत्यारोपणाची नेमकी जागा, जोडणी आदींचा संपूर्ण नियोजनबद्ध आराखडा ब्ल्यू-प्रिंटच्या स्वरूपात तयार केला. त्यानंतर प्रत्यक्ष शस्त्रक्रियेला सुरूवात करताना डॉक्टरांनी एक्स-व्हिजन हेडसेट डोळ्यावर लावला आणि त्यांनी थेट ऑग्मेन्टेड रिॲलिटीच्या विश्वात प्रवेश केला. ब्ल्यू-प्रिंटमध्ये ठरल्याप्रमाणे डॉक्टरांनी शस्त्रक्रियेला सुरुवात केली. यामध्ये डॉक्टरांना मणक्यामध्ये एका छोट्या हाडाचे प्रत्यारोपण करायचे होते. त्याशिवाय प्रत्यारोपणानंतर शरीराकडून त्याला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे होते. ऑग्मेन्टेड रिअॅलिटीसाठी लागणाऱ्या एक्सव्हिजन हेडसेटच्या मदतीने डॉक्टरांना अगदी सूक्ष्मपातळीवर शस्त्रक्रिया करता आली. त्याशिवाय अवघ्या ४.५ मिलिमीटरचा सूक्ष्म हाडाचे नेमक्या जागी यशस्वीपणे प्रत्यारोपण करण्यात आले. यामुळे रुग्णावर फारशी चिरफाड करावी न लागल्याने रक्तस्राव फार कमी झाला. त्याशिवाय शस्त्रक्रियेसाठी संपूर्ण शरीराला भूल देण्याची आवश्यकता पडली नाही. एरवी सात ते आठ तास लागणारी ही शस्त्रक्रिया अवघ्या दोन ते अडीच तासांमध्ये पूर्ण करण्यात आली. अशाप्रकारे तंत्रज्ञानाचा वापर इतर प्रकारच्या शस्त्रक्रियांमध्ये झाल्यास डॉक्टरांचा शस्त्रक्रियेचा वेळ वाचेल. आणि कमी वेळात अधिकाधिक शस्त्रक्रिया करता येईल.

नेमके फायदा काय?

  • रोबोटिक्स आणि ऑग्मेन्टेड रिॲलिटीच्या वापरामुळे किमान चिरफाड करण्यात आली.

  • तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शस्त्रक्रियेतील अचूकता वाढली.

  • शस्त्रक्रियेदरम्यान इतर अवयवांवर कमी दुष्परिणाम झाला.

  • रुग्णाला बरे होण्यास फार कमी वेळ लागला.

loading image