लग्नाची गोष्ट : ‘क्लास’ कला आणि इंजिनिअरिंगचा!

कलर्स मराठीवर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका सरू झाली आणि अभिनेता समीर परांजपेचं नाव सर्वांच्या परिचयाचं झालं. त्याच्या या संपूर्ण प्रवासात त्याला पावलोपावली साथ मिळाली पत्नी अनुजा परांजपेची.
Samir Paranjape and Anuja Paranjape
Samir Paranjape and Anuja ParanjapeSakal

कलर्स मराठीवर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका सरू झाली आणि अभिनेता समीर परांजपेचं नाव सर्वांच्या परिचयाचं झालं. त्याच्या या संपूर्ण प्रवासात त्याला पावलोपावली साथ मिळाली पत्नी अनुजा परांजपेची. अनुजा आणि समीर दोघे बॅचमेट. पुणे विद्यार्थीगृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये २००८ मध्ये शिक्षण घेत असताना त्यांची ओळख झाली. कॉलेजमध्ये त्यांचा मित्रपरिवार एकच होता, आवडीनिवडी सारख्या होत्या. त्यामुळं त्यांची छान मैत्री झाली आणि पुढं त्याचं रूपांतर प्रेमात झालं. बरीच वर्षं रिलेशनमध्ये राहिल्यावर ४ वर्षांपूर्वी ते ‘मिस्टर आणि मिसेस परांजपे’ झाले.

समीरनं सांगितलं, ‘‘अनुजाचा स्वभाव खूप गोड आहे. ती खूप समजूतदार आहे, मॅच्युअर आहे. इंजिनिअरिंग फिल्डमध्ये तिची मास्टरी आहे. कामाच्या बाबतीत ती फार मेहनती आणि प्रामाणिक आहे. लग्न झाल्यावर मी इंजिनिअरिंग सोडून अभिनय क्षेत्रात काम करण्याचं ठरवल्यावर संपूर्ण सेट असलेली पुण्यातली नोकरी सोडून फक्त माझं काम आता मुंबईला असेल, म्हणून तिनं माझ्याबरोबर मुंबईमध्ये येऊन नव्या नोकरीला सुरुवात केली. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि याबद्दल मला तिचं खूप कौतुक वाटतं. माझ्या करिअरच्या सुरुवातीपासूनच तिनं मला वेळोवेळी पाठिंबा दिला आहे. माझ्या प्रत्येक कामाबद्दल ती खरी खरी प्रतिक्रिया देते. मनोरंजन क्षेत्रात काम करत असल्यानं माझ्या वेळा कधीही ठरलेल्या नसतात. अशा सगळ्यात माझी कधीकधी चिडचिड होते, परंतु अनुजा शांतपणे माझं सगळं म्हणणं ऐकून घेते, ती घाईत रिअॅक्ट करत नाही. आमच्या नात्यातला समातोल ती उत्तमप्रकारे सांभाळून आहे.’’

अनुजाच्या मते, कोणत्याही मुलीच्या कल्पनेत आदर्श नवऱ्याची जशी प्रतिमा असते, तसाच समीर आहे. अनुजा म्हणाली, ‘‘समीर काळजी करणारा आहे. तो प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट करतो. कोणतीही गोष्ट मला करायची असली तरी, ‘बाकी सगळं सांभाळता येईल. तुला करायचंय ना हे? मग तू ते कर,’ अशा शब्दांत तो मला ती गोष्ट करायला प्रोत्साहन देतो आणि माझा आत्मविश्वास वाढवतो. समीर सगळ्यांच्या मदतीला धावून जातो. मित्र असोत किंवा भाऊ बहीण; त्याच्याकडं प्रत्येकाच्या प्रश्नावर, अडचणींवर त्या क्षणी उत्तर असतं. मलाही कधी काही अडलं तर मी लगेच समीरकडं धाव घेते, त्यातून तो चांगला मार्ग दाखवतो. त्याची ही उत्स्फूर्तता मला प्रचंड आवडते. समीरला पटकन राग येतो. पण तितक्याच पटकन तो निवळतोही. मुख्य गोष्ट म्हणजे त्याला त्याची चूक लक्षात आल्यावर लगेच तो समोरच्याची माफी मागतो. कामानिमित्त तो बऱ्याचदा बाहेर गावी असला, तरी घरच्या सगळ्यांकडंही त्याचं तितकंच लक्ष असतं. शक्य होईल तेव्हा घरी फोन करणं, सगळ्यांची चौकशी करणं; हे एका आदर्श नवऱ्याचे सगळे गुण समीरमध्ये आहेत.’’

समीरनं केलेली सगळी कामं अनुजानं पाहिली असून ‘क्लास ऑफ ८३’ या चित्रपटात समीरनं साकारलेली भूमिका अनुजाला विशेष आवडली, तर समीर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत तो साकारत असलेल्या अभिमन्यूसारखाच आहे, असंही अनुजानं सांगितलं. समीरनंही अनुजाच्या या म्हणण्याला दुजोरा दिला. ‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील त्याच्या भूमिकेबद्दल तो म्हणाला, ‘‘या मालिकेत मी साकारात असलेला अभिमन्यू आणि माझ्यात खूप साम्य आहे. अभिमन्यू आजच्या पिढीतल्या मुलांचं प्रतिनिधित्व करणारा मुलगा आहे, जो स्वतःची नोकरी बाजूला ठेऊन नवं काहीतरी करू पाहतोय. खऱ्या आयुष्यातही माझ्यासह सगळेच जण अशा प्रसंगांना सामोरे गेले आहेत. त्यामुळं अभिमन्यू प्रत्येकाला आपलासा वाटतो.’

समीर आणि अनुजा यांचे स्वभाव एकसारखे आहेत, तशाच त्यांच्या आवडीनिवडीही एकसारख्याच आहेत. दोघांनाही कलेची आवड आहे. फिरायला जाणं, बिझी शेड्युलमधून वेळ काढून रात्री एकत्र चित्रपट बघणं दोघं एन्जॉय करतात. अशी कला आणि इंजिनिअरिंग यांचा मेळ घालत संसार करणारी ही जोडी कोणाच्याही मनात भरेल अशीच आहे.

(शब्दांकन : राजसी वैद्य)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com