
उथळ देशप्रेमानं ‘आत्मनिर्भर’ होता होणार नाही, याबद्दल स्वच्छ माहिती हवी.चिनी अॅप अनइन्स्टॉल करून तात्कालिक देशप्रेम दाखवता येईल; पर्यायी आणि तितकंच दमदार देशी अॅप नसेल, तर ते व्हर्च्युअलच राहील.
उथळ देशप्रेमी गटाची सोशल मीडियावर झुंबड उडालेली असते. अगदी चोवीस तास. कोणत्याही वेळी ट्विटवर उघडा, फेसबूक पाहा, युट्यूब क्लिक करा...तुम्हाला उथळ देशप्रेमींच्या झुंडीच्या झुंडी गोंधळ घालताना दिसतील. हे देशप्रेमी व्हिडिओ, मीम्स आणि टेक्सच्या माध्यमातून सतत कुणाशी ना कुणाशी व्हर्चुअल लढाई करीत असतात. मोदी आणि राहुल, काश्मीर, धार्मिक श्रद्धास्थाने, विशिष्ट कलाकार हे त्यांचे आवडीचे फ्लॅश पॉइंट्स. तसा त्यांना जगातला कुठलाही विषय पुरतो. कोरोना व्हायरस मानवनिर्मिती नाही, असा कंठशोष जागतिक आरोग्य संघटना, संशोधक, शास्त्रज्ञ एकीकडे करत असताना देशप्रेमी गट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर आळवत राहतो.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
लॉकडाउनच्या काळात या उथळ देशप्रेमी झुंडीला मोबाईलवर ‘आत्मनिर्भर’ होण्याचा ध्यास लागला आणि चिनी बनावटीच्या मोबाईल अॅप्सवर झुंडी तुटून पडल्या. टिकटॉक नावाच्या व्हर्चुअल चिनी ‘शत्रू’ला कमी रेटिंग देऊन नामोहरम करण्याचा प्रयत्न झाला. कुणाला तरी साक्षात्कार झाला, की देशी बनावटीचे ‘मित्रो’ हा ‘टिकटॉक’ला पर्याय आहे. झालं, पाहता पाहता लाखोंनी मित्रो डाऊनलोड केलं. नवी बातमी आली की ‘मित्रो’ हे पाकिस्तानी टिकटिक अॅपवर आधारीत आहे! आता आली का पंचाईत. आधी ‘टिकटॉक’ची कॉपी ‘टिकटिक’ आणि त्या ‘टिकटिक’ची कॉपी ‘मित्रो’ म्हणजे कमालच झाली...! तुमच्या मोबाईलवरचे चिनी बनावटीचे अॅप शोधून देतो आणि अनइन्स्टॉल करतो, अशी टूम एका अॅपनं दिली. चिनी बनावटीचे मोबाईल वापरताना चिनी अॅपच काढून टाकायचा चंग बांधला आणि अनेकदा तो अंगलट आला. म्हणजे सिस्टीम अॅप्स काही डिलीट करता आले नाहीत आणि रोजच्या वापरातले अॅप्स गमावून बसावं लागलं.
उथळ देशप्रेमानं ‘आत्मनिर्भर’ होता होणार नाही, याबद्दल स्वच्छ माहिती हवी. व्यापार-उद्योगावर चिनी अतिक्रमण नकोच; त्यात शंकाही नाही. चिनी अॅप अनइन्स्टॉल करून तात्कालिक देशप्रेम दाखवता येईल; पर्यायी आणि तितकंच दमदार देशी अॅप नसेल, तर ते व्हर्च्युअलच राहील. एका रात्रीत चिनी अॅप्स गायब करून चिनी कंपन्यांना अस्मान दाखविण्याचं भाबडं स्वप्न विकण्यामागं राजकीय विचारसरणीची गडद छाया आहे. या छायेऐवजी उद्योग जगताची भक्कम साथ असती, तर सोशल मीडियातल्या ‘आत्मनिर्भर’ मोहिमेला बळ मिळालं असतं. प्रत्यक्षात उद्योग जगतातल्या श्रेष्ठ, ज्येष्ठ संघटना चिनी बनावटीच्या उत्पादनांबद्दल भूमिका घेत नाहीत. कारण, शंभर टक्के चिनी उत्पादने बंद करणं आजच्याघडीला स्वतःलाच संकटात ढकलण्यासारखं आहे आणि ‘आत्मनिर्भर’ ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे, याची जाणीव त्यांनाच आहे.