टिवटिवाट : ‘बर्नी’ आजोबा !

सम्राट फडणीस samrat.phadnis@esakal.com
Thursday, 28 January 2021

बर्नी सँडर्स यांचं वय ७९ वर्षे. ते अमेरिकी काँग्रेसचे सिनेटर. २०१६ला डेमॉक्रॅटिक पक्षातर्फे त्यांना अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक लढवायची होती. हिलरी क्लिंटन यांनी बाजी मारली आणि सँडर्स यांची संधी हुकली. गेल्या आठवड्यात सँडर्स अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले.

बर्नी सँडर्स यांचं वय ७९ वर्षे. ते अमेरिकी काँग्रेसचे सिनेटर. २०१६ला डेमॉक्रॅटिक पक्षातर्फे त्यांना अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक लढवायची होती. हिलरी क्लिंटन यांनी बाजी मारली आणि सँडर्स यांची संधी हुकली. गेल्या आठवड्यात सँडर्स अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले. बायडेन यांचं वय ७८. या सोहळ्याचा फोटो तुमच्या मोबाईलवर आला नसेलही कदाचित; पण हातमोजे आणि उबदार कपडे घालून उठून जायच्या तयारीनं खुर्चीवर बसलेले सँडर्स आजोबा तुमच्यापर्यंत कुठून ना कुठून तरी जरूर पोहोचले असतील.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शपथविधी सोहळ्यातलं सँडर्स यांचं छायाचित्र रातोरात इंटरनेटवरचा चमत्कार बनलं आणि जगभरात कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचलं. कोणत्याही छायाचित्रात सँडर्स दिसू लागले. हा प्रकार म्हणजे ‘मीम्स’. छायाचित्र किंवा काही सेकंदांच्या व्हिडिओतून साधलेली गंमत. सोशल मीडियाच्या विस्तारात गेल्या पाच वर्षांत ‘मीम्स’चा मोठा वाटा आहे. ‘टीकटॉक’सारखा उद्योग ‘मीम्स’च्या बळावर उभा राहिला, इतकी ताकद छोटीशी गंमत करण्यात आहे. ‘मीम्स’ ठरवून बनवले जातात; मात्र लोकप्रियता ठरवून मिळवता येत नाही. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सँडर्स यांचे छायाचित्र काढणारा एएफपी वृत्तसंस्थेचा ब्रेंडन स्मियालोवस्की किंवा पहिले ट्विट करणारी अॅशली यापैकी कोणालाही सँडर्स यांचं ‘मीम्स’ चमत्कार घडवेल, असं वाटलं नव्हतं. नंतर सँडर्स यांचे हातमोजे बनविणारी शिक्षिका जेन इलिस, त्यांच्या हातातले पाकिट वगैरेंचीही चर्चा झाली. हातमोज्यांना जगभरातून आलेली मागणी पूर्ण करणं अशक्य असल्याचं जेननं सांगून टाकलं; मात्र तोपर्यंत ‘मीम्स’चे स्टिकर्स, टी-शर्ट, जॅकेटस्, स्वेटशर्टस् आणि अगदी खेळणीही तयार झाली. सँडर्स यांच्या टीमनं ‘मीम’च्या वस्तू बनवून विकायला ठेवल्या आणि त्यातून ज्येष्ठ नागरीकांना मदतीसाठी निधी जमवायला सुरुवात केली. एखादं ‘मीम’ व्यवहारात किती उलाढाल करू शकते, हेही यानिमित्तानं नव्यानं सिद्ध झालं. 

सँडर्स यांचं ‘मीम’ निरुपद्रवी हेतूनं निर्माण झालं असलं, तरी प्रत्येकवेळी निरागसपणा असतोच; असं नाही. खासगी कंपन्या, राजकीय व्यक्ती, चित्रपट, वेबसिरिज, टीव्हीवरील कार्यक्रम यांच्या ‘मीम्स’मागं बहुतांशवेळा मार्केटिंगची टीम काम करते. आपला ब्रँड अधिकाधिक मोबाईलच्या स्क्रिनवर दिसावा, यासाठी जाणीवपूर्वक विडंबनाची निर्मिती होते. स्वतःवरच विनोदनिर्मितीची ही प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या आधारावर आताशी कुठं उभी राहते आहे. सध्याच्या आणि येणाऱ्या काळातही ही प्रक्रिया प्रभावी ठरेल. ‘मीम्स’ कशावर बनवावे, याला काही बंधन नाही. व्हिडिओ-फोटो एडिट करणाऱ्या कुठलंही अॅप आणि खूपसारी विनोदबुद्धी वापरून तुम्हीही मीम बनवू शकता; न जाणो एखादा ‘बर्नी’ तुमच्या क्रिएटीव्हीटीतूनही निर्माण होऊ शकेल!

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samrat Phadnis Writes about Bernie Sanders