टिवटिवाट : न्यूज सायकल!

Madam-Secretary
Madam-Secretary

‘मॅडम सेक्रेटरी’ या गाजलेल्या अमेरिकी टीव्ही मालिकेच्या चौथ्या सीझनचा पहिला भाग आहे ‘न्यूज सायकल’ या नावाचा. या भागाच्या लेखिका आहेत मालिकेच्या निर्मात्या बार्बरा हॉल. पाच वर्षे चाललेल्या या मालिकेचा ‘न्यूज सायकल’चा भाग प्रसिद्ध अभिनेते मॉर्गन फ्रिमन यांनी दिग्दर्शित केलेला होता. या भागात अपमाहिती (misinformation) आणि फेकन्यूजच्या परिणामांवर भाष्य आहे. हा भाग २०१७-१८ मध्ये प्रसारित झालेला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या काळात अपमाहिती आणि फेकन्यूजचा भडिमार सरकारी पातळीवरूनही होत असल्याचे आरोप होत होते. या पार्श्वभूमीवर मालिकेतली मॅडम सेक्रेटरी एलिझाबेथ मॅकॉर्ड म्हणते, ‘‘विश्वासार्ह्य माहिती विज्ञान, सरकार किंवा खासगी अशा कोणत्याही संस्थेचा पाया असते. नागरीकांना वास्तव आणि काल्पनिक यातला फरक सांगता आला नाही, तर मानवी संस्कृती धुळीस मिळेल.’

हे भाष्य अवघ्या तीन वर्षांत तुमच्या-आमच्या जगण्यातला रोजचा संघर्ष बनला आहे. अगदी रविवारचे उदाहरण घ्या. कोणत्या तरी न्यूज चॅनेलचा लोगो असलेला, तारीख-वार नसलेला जुना फोटो सोशल मीडियावर शेअर होतो. कोरोनामुळे धास्तावलेल्या समाजाला हा फोटो सांगतो, ‘सोमवारपासून लॉकडाउन आहे.’ कित्येक लोक प्रवासाचे नियोजन रद्द करतात. व्यवसायाचे निर्णय खोळंबतात. रुग्णालयांपासून ते शाळांपर्यंत प्रत्येक व्यवस्थेला मनस्ताप सहन करावा लागतो. जुना फोटो नव्या संदर्भासह भीती पसरवण्याच्या उद्देशानं शेअर करणं ही अपमाहिती आहेच; शिवाय अशा बनावटगिरीची ‘न्यूज’ म्हणून सोशल मीडियावर पसरवणं म्हणजे फेकन्यूज आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विश्वासार्ह्य माहिती लोकशाही व्यवस्थेचा गाभा आहे. लोकशाही व्यवस्थेत सरकारने घेतलेले प्रत्येक निर्णय लोककल्याणार्थच असले पाहिजेत आणि ते निर्णय लोकांपर्यंत नितळपणानं पोहोचले पाहिजेत, अशी अपेक्षा आहे. सरकारला एखादा निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी अपमाहिती आणि फेकन्यूजद्वारे दबाव निर्माण करणं आणि त्या दबावाला बळी पडून सरकारनं निर्णय घेणं, असा प्रकार घडण्याचा आजचा काळ आहे. यामध्ये केवळ राजकीय अहमहमिका किंवा संघर्ष गुंतलेला नाही. बहुतांशवेळा यात व्यावसायिक हितसंबंधही मोठ्या प्रमाणात गुंतलेले असतात. परिणामी, अपमाहिती किंवा फेकन्यूज हा गंमत म्हणून सोडून देण्यासारखा प्रकार नाही. 

अपमाहिती किंवा फेकन्यूज कोण पसरवतं, यावर लक्ष ठेवणं आणि त्यामध्ये सातत्य असेल, तर त्यातून हितसंबंधांपर्यंत पोहोचणं अवघड नसतं. ‘मॅडम सेक्रेटरी’ मालिकेतल्या एलिझाबेथ मॅकॉर्ड फेकन्यूजच्या तळाशी पोहोचल्या, तेव्हा ड्रग कार्टेल आणि राजकारणी यांचे हितसंबंध आणि फेकन्यूजमधून परस्परांचे होत असलेले संभाव्य लाभ समोर आले. टीव्ही मालिकेतच असं घडतं, असं नाही. रोजच्या जगण्यातही शक्य असतं. एखादा गुन्हा जाती-धर्माचा बुरखा घालून मांडला जातो, तेव्हा त्यातून निर्माण होणाऱ्या अस्वस्थतेचा राजकीय, सामाजिक आणि आर्थिक लाभ कोणाला होत आहे, हे लक्षात घेता येतं. एखाद्या राज्यातली घटना दुसऱ्या राज्यातल्या विशिष्ट समुदायाची म्हणून मांडण्याचे प्रकार दररोज ट्विटर आणि एकूणच सोशल मीडियावर चालले आहेत. ते कुणाचा लाभ करतात, याची छाननी बसल्या बसल्या मोबाईलवरही करता येते. 

गंमत आणि लाभासाठी जाणीवपूर्वक केलेली फसवणूक यामध्ये सीमारेषा आहे. सोशल मीडियात या सीमारेषा पुसल्या जात आहेत. त्यामुळं, गंमत म्हणून ‘लॉकडाउन’चा मेसेज फॉरवर्ड किंवा पोस्ट करण्यानं लाभवादी हितसंबंधांचं पोषण आपणही नकळत करतो. लोकशाही व्यवस्थेत माहितीत धुळफेक केली, तर मालिकेतल्या मॅकॉर्ड म्हणतात तसं, मानवी संस्कृतीच धुळीस मिळण्याचा धोका आहे. गंमत म्हणून मोबाईलवर केलेला चाळा इतका गंभीर आहे, इतकं भान आपल्याला हवंच. ‘न्यूज सायकल’ अपमाहिती आणि फेकन्यूजवर चालवणाऱ्यांना रोखण्याचा हा हातातलाच मार्ग आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com