आत्महत्या : सेलिब्रिटी अन् सामान्यांची... 

सम्राट फडणीस
Wednesday, 16 September 2020

गेल्या दशकभरात सोशल मीडिया आणि आत्महत्यांमधील परस्परसंबंधांवर अनेक संशोधनं प्रसिद्ध झालीयत.भारतातल्या अनुषंगाने युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम या संस्थेने गेल्यावर्षी महत्त्वपूर्ण संशोधन प्रकाशित केलं.

सुसाइड शब्द ट्विटरवर टाइप केल्यावर ‘Help is available’ असा संदेश सर्वांत आधी येतो. ट्विटरनं ही पद्धत दहा सप्टेंबरपासून सुरू केलीय. त्या आधी आत्महत्या रोखण्यासाठी फेसबुकने मदतीचा हात पुढं केला. सुसाइड सर्च केल्यावर Can we help? असं फेसबुक विचारतं. मित्र, हेल्पलाइन नंबर्स आणि काही टिप्स फेसबुक देतं. गुगलवर सर्च केलं, तर याच पद्धतीनं रिझल्ट्‌स येतात.

डिजिटल मीडियाची ही उत्क्रांती आहे, असं मानता येतं. उत्क्रांती एक प्रक्रिया असते. ती दीर्घकालीन आणि सातत्याची असते. आधीच्या अवस्थेतल्या उणिवा दूर करत नव्या अधिक सुधारित अवस्थेकडं उत्क्रांती नेते. उत्क्रांती कुठल्याच टप्प्यावर थांबत नाही. म्हणजे उत्क्रांतीला शेवटही नसतो. ट्विटर, फेसबुक, गुगलसारख्या रोजच्या वापरातल्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर पाच-दहा वर्षांपूर्वी आत्महत्यांबद्दल इतकी जागृती होती का?... तर नव्हती... याच प्लॅटफॉर्मवरून ‘माहिती’ घेऊन आत्महत्येच्या कित्येक घटना घडल्यानंतर झालेली ही उत्क्रांती आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या दशकभरात सोशल मीडिया आणि आत्महत्यांमधील परस्परसंबंधांवर अनेक संशोधनं प्रसिद्ध झालीयत. भारतातल्या अनुषंगाने युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (यूएनडीपी) या संस्थेने गेल्यावर्षी महत्त्वपूर्ण संशोधन प्रकाशित केलं. त्यामध्ये सोशल मीडियातून होणाऱ्या सायबरबुलिंगकडं प्राधान्यानं लक्ष वेधण्यात आलं. विशेषतः तरुणाईसमोर सायबरबुलिंगचा मोठा धोका असल्याचं संशोधनात मांडलेलं. यूएनडीपीच्या सर्वेक्षणात ४१ टक्के तरुण-तरुणींना सोशल मीडियावर आक्षेपार्ह आशयाला सामोरं जावं लागल्याकडे संशोधनानं लक्ष वेधलं होतं. या सायबरबुलिंगच्या त्रासाचा शेवट आत्महत्यांमध्ये होण्याची शक्यता सर्वाधिक असते. या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्वतःहून काही पावलं उचलत असल्याचं स्वागत केलं पाहिजे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जवळच्या व्यक्तीची आत्महत्या हा उर्वरित कुटुंब आणि मित्र परिवाराच्यादृष्टीनं वेदनादायी प्रसंग असतो. अशा प्रसंगाचं भांडवल करण्याचा प्रकार रोखण्यासाठीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनं आता पुढं आलं पाहिजे, असं गेल्या तीन महिन्यांतल्या अनुभवावरून प्रकर्षानं जाणवतं. महाराष्ट्रात जानेवारी ते जून या काळात १,०७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्याबद्दल रोज चर्चा घडवून आणावी, असं कोणा सेलिब्रिटींना कधी वाटलं नाही आणि एका चित्रपट कलाकाराच्या आत्महत्येवरून गेले तीन महिने महाराष्ट्र ढवळून काढला जातो आहे. आत्महत्यांवरच चर्चा करायचीय, तर प्लॅटफॉर्मनी शेतकऱ्यांसाठीही पुढाकार घ्यायला काय हरकत आहे? की सेलिब्रिटी आत्महत्या महत्त्वाच्या आणि हजारो सामान्यांच्या किरकोळ, असं या प्लॅटफॉर्मना भासवायचंय?

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोट्यवधी सामान्यांच्या बोटांवर पोचलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनी अशी क्रांतिकारक पावलं उचलली, तर Help is available ला अर्थ आहे; अन्यथा ट्विटर, फेसबुकवरचं नवं टूल यापलीकडं त्याचं महत्त्व जाणार नाही.

सम्राट फडणीस (samrat.phadnis@esakal.com


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: samrat phadnis writes article about Celebrities and common people Suicide