अपमाहितीचं ओझं वाहणारं गाढव बनणं टाळूया 

forward--message
forward--message

स्वातंत्र्यदिन होऊन गेलाय. स्वातंत्र्याच्या परिभाषेबद्दल चर्चा झडलीय. चर्चेतून बाहेर पडून सोशल मीडियावर डोकावलं, तर काय दिसतं...? प्रख्यात शायर राहत इंदौरी यांच्या निधनानंतर व्यक्त झालेला धार्मिक सूर, राजकीय नेत्यांच्या आजारपणाबद्दल उथळपणे व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया, सामाजिक विषयांवर ध्रुवीकरणाचे उघड प्रयत्न ट्‌विटरवर ट्रेंड होताना दिसतात. 

विचार मांडण्याचं स्वातंत्र्य पाहिजे. मात्र, पराकोटीच्या द्वेषाचं किळसवाणं प्रदर्शन म्हणजे विचार स्वातंत्र्य, या भ्रमातून दूरही व्हावं लागेल. द्वेष निर्माण करणं, सोशल मीडियातून तो पसरवणं आणि राजकीय अथवा व्यावहारिक स्वार्थ साधणं ही व्यवस्था गेल्या पाच-सात वर्षांत तयार झालीय. कळत-नकळत सोशल मीडिया वापरकर्ता या व्यवस्थेला बळी पडतोय. 

अमेरिकेतल्या मिशिगन विद्यापीठातील स्कूल ऑफ इन्फर्मेशनमध्ये भारतातल्या सोशल मीडियावरच्या अपमाहितीचा अभ्यास चाललाय. जॉयोजित पाल या अभ्यासाचे प्रमुख. कोरोनाच्या काळात सोशल मीडियावर भारतात सुरू असलेल्या अपमाहितीच्या भडिमाराचे अभ्यासासाठी त्यांनी सात भाग पाडलेयत. सांस्कृतिक, बरं होणं-प्रतिबंधक-उपचार, निसर्ग-पर्यावरण, मृत्यू, व्यवसाय-अर्थव्यवस्था, सरकार आणि आकडेवारी अशा विभागात हा अभ्यास आहे. सांस्कृतिक अपमाहिती धार्मिक-वांशिकतेशी संबंधित आहे. ही अपमाहिती व्हिडिओद्वारे सर्वाधिक, त्याखालोखाल फोटोंद्वारे सोशल मीडियावरून पसरवली गेल्याचं अभ्यासातून समोर आलं. कोरोनाबळींच्या आकड्याबद्दलची अपमाहिती सोशल मीडियाद्वारे झपाट्यानं पसरल्याचंही अभ्यासात लक्षात आलं. 

अमेरिकेतल्याच हार्वर्ड केनेडी स्कूलनं भारतात व्हॉटस्ॲपवर भटकणाऱ्या फोटोंचा अभ्यास केला, तेव्हा सर्वाधिक अपमाहिती ऐतिहासिक-धार्मिक मिथकं, राष्ट्रीयत्व आणि राजकीय मीम्सद्वारे पसरवली गेल्याचं दिसलं. हे फोटो पाहिल्यावर तत्काळ कृती करावी अशी भावना वापरकर्त्याच्या मनात तयार होतेय आणि त्यातून झपाट्यानं अपमाहिती पसरतेय, असं संशोधन सांगतं. जुन्या फोटोंचा अर्थहीन संदर्भ जोडणं, फोटो एडिट करणं, फोटोंसोबत चुकीची आकडेवारी, अपमाहिती जोडून मीम्स बनवणं, बनावट फोटोंद्वारे भीती-अंधश्रद्धा पसरवणं असा प्रकार सुरू असल्याचं अभ्यासानं दाखवलं. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अपमाहितीचा धबधबा जगभरात सुरूच आहे; आपण त्यात किती भिजायचं हे जबाबदार वापरकर्ता म्हणून आपल्यालाच ठरवावं लागणार आहे. सोशल मीडिया वापराची स्वतःची तत्वं ठरवून घ्यावी लागणारायत. त्यासाठी फेसबूक, ट्‌विटर किंवा व्हॉटस्ॲपच्या 'अटी आणि शर्तीं'मध्ये घुसण्याची गरजच नाहीय. मोबाईलच्या स्क्रिनवर दिसणारी माहिती आहे की अपमाहिती, याची खात्री स्वतःच करून घेणं आणि माहितीची खात्री होत नसेल, तर त्या क्षणी सोशल मीडियावर, व्हॉटस्ऍपवर प्रश्न विचारणं महत्त्वाचं आहे. ज्यानं अपमाहितीची सुरुवात केलीय, त्याच्यापर्यंत पोचायची शीडी प्रश्नातून हाती लागते. खातरजमा व्हायला सुरुवात होते. इतकं साधं तत्त्व पाळलं, तरी कुणाच्या तरी स्वार्थासाठी पाठीवर द्वेषाचं ओझं लादलेला गाढव बनण्याची आपल्याला आवश्‍यकता राहणार नाही. 

काय फॉरवर्ड ‘करनेका नई...’? 
१. कोरोनावर आजअखेर लस नाही. त्यामुळं, लस निघाली अशी खात्रीलायक माध्यमे, संस्थांशिवायची माहिती फॉरवर्ड करायची नाही. 

२. हिंसा दाखविणारा कोणताही व्हिडिओ, फोटो फॉरवर्ड करायचा नाही. व्हिडिओ-फोटो कुठला आहे, कधीचा आहे, आधी कुठे आलाय ही माहिती आधी घ्यायची. 

३. खात्रीलायक संस्था, माध्यमांच्या लिंक नसलेली आकडेवारी थेट फॉरवर्ड करायची नाही. त्या लिंकवर क्‍लिक करून माहिती आधी तपासायची. 

४. धार्मिक, वांशिक द्वेष वाढवणारी कोणत्याही स्वरूपातली माहिती फॉरवर्ड करायची नाही. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com