ट्विटरची लपवाछपवी... 

सम्राट फडणीस (samrat.phadnis@esakal.com)
Wednesday, 11 November 2020

ट्रम्प यांची मतं अमेरिकी समाजाच्या दृष्टीनं आणि अमेरिकी निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीनं अयोग्य असल्याची नोटीस ट्विटरनं चिकटवली. कंपनीनं उचललेलं हे पाऊल स्वागतार्ह्य; मात्र वरातीमागून घोडा आणण्यासारखं आहे. 

जगातल्या कालपर्यंतच्या सर्वशक्तिमान, तब्बल साडे आठ कोटी फॉलोअर्स असलेल्या माणसाची उथळ मतं जागतिक सत्य म्हणून स्वीकारण्यास ट्विटरनं शेवटी नकार दिला. ट्विटर कंपनीनं डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट चक्क लपवलं. ट्रम्प यांची मतं अमेरिकी समाजाच्या दृष्टीनं आणि अमेरिकी निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीनं अयोग्य असल्याची नोटीस ट्विटरनं चिकटवली. कंपनीनं उचललेलं हे पाऊल स्वागतार्ह्य; मात्र वरातीमागून घोडा आणण्यासारखं आहे. 

गेल्या वर्षीपर्यंत ट्रम्प आणि ट्विटर यांचं बरं चाललेलं. ट्विटरचे संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्सी यांच्याशी ट्रम्प यांनी एप्रिल २०१९मध्ये चर्चाही केल्याच्या बातम्या होत्या. तोपर्यंत ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला दिलेली हल्ल्याची धमकी असो, अनेक राष्ट्रप्रमुखांबद्दल वापरलेली असभ्य भाषा असो किंवा अमेरिकेतच पसरवलेला वांशिक वणवा असो, या प्रत्येक बाबतीत ट्विटरनं बघ्याची भूमिका घेतली. ट्रम्प यांचे फॉलोअर्स वाढणं म्हणजे एकूण ट्विटरचा वापर वाढणं, म्हणजे ट्विटरचा एकूण नफा वाढणं हे साधं गणित. गेल्या सहा महिन्यांत हे गणित कुठंतरी विस्कटत गेलं आणि ट्विटरनं ट्रम्प यांच्यापासून फारकत घेण्यास सुरुवात केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोशल मीडिया कंपन्या हे नावीन्यपूर्ण, अजब तंत्रज्ञान आहे. तुमचे कायदे, तरतुदी, जीवनशैली आदींशी सोशल मीडियाला काही देणं-घेणं नाही. जे सर्वाधिक; ते चालणार, असा बहुमतप्रधान अल्गॉरिदम बहुतांश कंपन्यांनी स्वीकारला आहे. याचे परिणाम समाजात दिसताहेत. बहुमत म्हणजे सर्वकाही आणि अल्पमत म्हणजे गळचेपी, असा या अल्गॉरिदमचा दुसरा अर्थ निघतो. ट्रम्प यांची एकूण लोकप्रियता कुठल्या पातळीला आहे, याचा अंदाज ट्विटरसारख्या बलाढ्य सोशल मीडिया कंपनीला जरूर असतो. परिणामी, ट्रम्प यांचा वापर करून कंपनी लोकप्रिय करण्यातही ट्विटर धन्यता मानते आणि ते पराभवाच्या वाटेवर असताना त्यांचं ट्विट लपविण्याचं धाडसही दाखवते. सामाजिक हित वगैरे लिहून ट्विटरनं पळवाट शोधली असली, तरी ट्रम्प ट्विटवरून अराजकतेला प्रोत्साहन देत असताना सामाजिक भान कुठं होतं, या प्रश्नाचं उत्तरही ट्विटरला द्यावं लागेल. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ट्रम्प यांचे टॉप ३ ट्विटर वाद 
१. लंडनचे महापौर सादिक खान यांच्यावर लंडन बॉम्बस्फोटानंतर केलेली टिका. 

- लंडनच्या साऱ्या रस्त्यांवर पोलिस असले, तरी नागरिकांनी घाबरण्याचं कारण नसल्याचं सादिक खान यांनी म्हटलेलं. त्यातलं सोयीचं वाक्य उचलून बॉम्बस्फोटानंतरही ‘घाबरण्याचं कारण नाही’, असं लंडनचे महापौर म्हणत असल्याचं ट्विट केलं, जे खान यांच्यावर धार्मिक निशाणा साधणारं होतं. 

२. निवडक देशांना अमेरिकेत बंदी घालण्याचा प्रयत्न रोखणाऱ्या अमेरिकी न्यायालयांवर टिका. 
- ‘(तुम्हाला) काही झालं, तर दोष यांचा (न्यायाधीश जेम्स रॉबर्टस्) आणि न्याय व्यवस्थेचा आहे. लोकं आत घुसताहेत,’ असं स्थलांतरित अमेरिकी नागरिकांबद्दल आणि न्यायव्यवस्थेबद्दल संशय निर्माण करणारं ट्विट केलं. 

३. मेक्सिकोच्या सीमेवर न बांधली गेलेली भिंत. 
- ट्रम्प यांनी घोषणा केलेली मेक्सिको सीमेवरची भिंत काही झाली नाही; मात्र त्यानिमित्तानं डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांना ट्रम्प यांनी सातत्यानं ‘तुमच्या देशात परत जा’ अशा भाषेत हिणवलं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: samrat.phadnis write article about Trump Top 3 Twitter Controversy