esakal | लग्नाची गोष्ट : ‘तमन्ना’ लाडक्या ‘बेगम’ची!

बोलून बातमी शोधा

Saurabh Gokhale and Anuja Sathe
लग्नाची गोष्ट : ‘तमन्ना’ लाडक्या ‘बेगम’ची!
sakal_logo
By
सौरभ गोखले

मराठी कलाकारांनी हिंदी मनोरंजनसृष्टीमध्येही आपला ठसा उमटवला आहे. अशीच एक तरुण, लोकप्रिय कलाकारांची जोडी म्हणजे अभिनेता सौरभ गोखले आणि अभिनेत्री अनुजा साठे. ‘मांडला दोन घडीचा डाव’ या मालिकेत सौरभ आणि अनुजा २०११मध्ये एकत्र काम करत होते. त्या मालिकेच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली होती. पुढं दोन वर्षांनी अनुजा ही ऑफिशिअली सौरभची ‘बेगम’ झाली. पहिल्या भेटीत अनुजाला सौरभ उद्धट आणि आगाऊ स्वभावाचा मुलगा वाटला होता, परंतु सौरभनं आपल्या गोड आणि प्रेमळ वागण्यातून अनुजाचं त्याच्याबद्दल झालेलं ते मत अगदी पटकन खोडून काढलं.

अनुजानं सौरभच्या स्वभावाबद्दल सांगितलं, ‘‘सौरभ हा फणसासारखा आहे. सुरुवातीला त्याचं ॲटिट्यूड असलेला किंवा विशेष काही भावना नसलेला मुलगा असं समोरच्यावर इम्प्रेशन निर्माण होऊ शकतं, पण तो तसा अजिबात नाही. सौरभचा स्वभाव खूप प्रेमळ, समंजस आणि भावनिक आहे. तो खूप कमी व्यक्तींसमोर त्याच्या भावना व्यक्त करतो. शिवाय तो अत्यंत फिटनेस फ्रिक आहे. स्वतःच्या फिटनेसबद्दल तो खूप दक्ष असतो आणि त्यावर तो रोज मेहनत घेतो. बिझी शूटिंग शेड्यूलमधूनही वेळात वेळ काढून दिवसातून तासभर का होईना तो व्यायाम करतोच करतो. स्वतःच्या आहाराकडं लक्ष देतो. त्याच्या याच सवयीचा प्रभाव माझ्यावर पडला आहे आणि त्याला पाहून गेल्या काही वर्षांत मीही नित्यनियमानं व्यायाम करू लागले आहे.’’

सौरभ अनुजाबद्दल म्हणाला, ‘‘अनुजा ही अतिशय स्पष्टवक्ती आहे. एखादी गोष्ट आवडली किंवा नाही आवडली, तर ती समोरच्याला तसं स्पष्ट सांगून मोकळी होते. तिच्या मनात एक तर ओठांवर दुसरंच काहीतरी असं अजिबात नसतं. कोणत्याही गोष्टीचा सारासार विचार करून ती पुढचा निर्णय घेते किंवा एखादी कृती करते; हा तिच्यातला आणखीन एक गुण मला खूप आवडतो. यासोबतच ती प्रत्येक गोष्टीचा प्रॅक्टिकली विचार करते, तर मी कधी कधी इमोशनली विचार करतो आणि हेच आमच्या स्वभावातलं वेगळेपण आहे. एक अभिनेत्री म्हणून अनुजा प्रचंड पॅशनेट आहे. एखादी भूमिका साकारताना ती त्या भूमिकेचा, त्याच्या पार्श्वभूमीचा सखोल अभ्यास करते, त्यावर खूप मेहनत घेते. तिची काम करण्याची पद्धत मी तिच्याकडं बघून शिकलो आणि मीही ती माझ्या कामात वापरू लागलो, ज्याचा मला बराच फायदा झाला.’’

सौरभ आणि अनुजानं एकमेकांची जवळजवळ सगळीच कामं पाहिली आहेत. त्यातून अनुजानं ‘तमन्ना’ या मालिकेत आणि ‘एक थी बेगम’ या मालिकेमध्ये साकारलेली भूमिका सौरभला विशेष आवडली. तर सौरभने ‘गांधी हत्या आणि मी’ या नाटकात आणि रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ या चित्रपटात साकारलेली भूमिका अनुजाला अतिशय भावली. सौरभ आणि अनुजा यांच्या बऱ्याच आवडीनिवडी सारख्याच आहेत. मुख्य म्हणजे, ते दोघेही ‘पेट लव्हर’ आहेत, दोघांनाही फिरायला जायला, शॉपिंग करायला आणि वेगवेगळे पदार्थ खायला भरपूर आवडतं.

गेली अनेक वर्षं एकमेकांना ओळख असल्यानं आणि एकाच क्षेत्रात काम करत असल्यानं एकमेकांच्या मनातल्या सगळ्याच गोष्टी या दोघांना न बोलताच कळतात. काम उत्तम होण्यासाठी दोघंही कायम एकमेकांना सपोर्ट करत आणि प्रोत्साहन देत आले आहेत.

(शब्दांकन : राजसी वैद्य)