कथा हिटलरच्या क्रौर्याच्या... 

कथा हिटलरच्या क्रौर्याच्या... 

जर्मनीचा हुकुमशहा हिटलरचा ज्यू द्वेष सर्वांनाच माहीत आहे. समाजामध्ये असणाऱ्या ज्यू द्वेषाचा हिटलरने आपल्या लोकप्रियतेसाठी फायदा घेतला. येत्या ३० एप्रिलला हिटलरच्या मृत्यूला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच्या जाण्यामुळे फक्त ज्यू लोकांनीच नव्हे, तर अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. अनेक निष्पाप बळी घेणाऱ्या हिटलरविषयी जगाला तिरस्कारच जास्त वाटत होता. ऑश्विझ हा नाझींचा ज्यू कत्तलखाना होता. इथे जवळपास ६० लाख लोकांना एकत्र आणून मारण्यात आले होते. यामध्ये लहान, वृद्ध असा कोणताही भेदभाव करण्यात आला नव्हता. यामध्येच असंख्य चिमुकले जीव बळी गेले, त्यापैकीच अन फ्रॅंक आणि दुसरी हॅना ब्रॅडी. हिटलरविषयी इतिहासातून आपण वाचले असेलच. अनेक लेखकांनीही हिटलरविषयी लिहून ठेवले आहे. या हिटलरशाहीचा किशोरवयीन मुलांवर नेमका काय परिणाम झाला, त्यांच्या दृष्टीने हिटलर कसा होता या प्रश्‍नांची उत्तरे देणारी पुस्तके म्हणजे डायरी ऑफ ॲन फ्रॅंक आणि हॅनाज् सुटकेस! 

‘हॅनाज् सुटकेस’ हे पुस्तक १३ वर्षाच्या हॅना ब्रॅडीवर आधारित आहे. जपानमधई टोकियो येथील एका वस्तुसंग्रहालयात एक सुटकेस ठेवण्यात आली होती. त्यावर लिहिले होते, ‘हॅना ब्रॅडी. जन्म १६ मे १९३१, अनाथ.’ हाच विषय तिथे येणाऱ्या मुलांच्या आणि त्या संग्रहालयाच्या समन्वयक फ्युमिको इशिओकाच्या उत्सुकतेचा भाग बनला. त्यासाठी फ्युमिकोने जग पालथे घालते. अखेर तिला कळते, हॅना सध्या जिवंत नाही, मात्र तिचा भाऊ अद्याप जिवंत आहे. या भावाकडून तिची कहाणी कळते, ती या पुस्तकात मांडली आहे. हिटलरने लाखो ज्यूंना गॅसचेंबरमध्ये कोंडून मारले. या नरसंहाराला हॉलोकास्ट म्हणतात. २३ ऑक्टोबर १९४४ ला तेरा वर्षीय हॅनालाही याच हॉलोकास्टमध्ये मारण्यात आले. 

दुसरे पुस्तक ‘डायरी ऑफ ॲन फ्रॅंक’. जगात सर्वाधिक गाजलेल्या रोजनिशींपैकी एक नाव येते ते या पुस्तकाचे. ॲन ही ज्यू मुलगी. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरशाहीपासून वाचण्यासाठी तिचे कुटुंब वडील ऑटो फ्रॅंक यांच्या ऑफिसच्या तळघरात आणखी एका कुटुंबासह लपूनछपून राहत होते. मात्र, काही दिवसांतच घरावर छापा पडल्याने सर्वांनाच ताब्यात घेतले जाते. ॲनाला तिच्या तेराव्या वाढदिवशी एक कोरी वही गिफ्ट मिळाल्याने ती त्या वहीत दैनंदिनी लिहू लागते. १२ जून १९४२ ते १ ऑगस्ट १९४४, म्हणजेच पकडल्याच्या आदल्या दिवसापर्यंत ही डायरी ॲनाने लिहिली आहे. त्यानंतर छळछावणीत पकडून नेल्यानंतर तिची मोठी बहीण मार्गो व ॲन १९४५च्या मार्च महिन्यात मुदतीच्या तापाने मरण पावल्या. तिच्या मृत्यूनंतर तिची ही डायरी तिच्या वडिलांच्या हाती लागली. ही डायरी नंतर पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आली. साहित्याचा उत्तम नमुना म्हणूनही या डायरीकडे पाहिले जाते. 

ही दोन्ही पुस्तके वाचल्यानंतर किशोर अवस्थेत पदार्पण करताना हिटलरच्या राजवटीने दोघींचा कसा क्रूर बळी घेतला, हे सांगतात. 

पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com