सत्ता गेल्याचे दुःख नाही; अखेरच्या भाषणात कुमारस्वामी भावुक 

karnataka
karnataka

बंगळूर : मावळते मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सभागृहात निरोपाचे भाषण करताना भाजपच्या धोरणावर जोरदार हल्ला केला. या सगळ्या घडामोडींच्या माध्यमातून आपण लोकांना कोणता संदेश देऊ पाहत आहोत, असा सवाल करताना त्यांनी मी योगायोगाने राजकारणात आलो. मी राजकारणात येऊ नये, अशीच माझ्या पत्नीचीही इच्छा होती. सत्ता गेल्याचे दु:ख मला नाही, असेही त्यांनी सांगितले. या भाषणादरम्यान कुमारस्वामी भावुक झाले होते. 

सभापतींना उद्देशून ते म्हणाले, "माझा हेतू तुमच्या पदाचा अवमान करण्याचा नव्हता. मी कर्नाटकच्या 6.5 कोटी लोकांची माफी मागितली आहे. माझ्या पत्नीने, तिच्याशी लग्न केल्यावर राजकारणात सामील होऊ नये, अशी अट घातली होती. राजकारणात तिला रस नव्हता. पण, आज तीसुद्धा या सभागृहात बसली आहे. हा एक योगायोग आहे. माझे वडील राजकारणात होते. त्यांनी माझा भाऊ एच. डी. रेवण्णा यांना सतत राजकारणात येऊ नकोस, असाच आशीर्वाद दिला.''

त्यांच्याविरोधात सोशल मीडियावर भाजपने पोस्ट केल्याचा उल्लेख करून ते म्हणाले, "आमची संस्कृती आणि युवकांसाठी सोशल मीडिया एक मोठा धोका आहे. मी विश्वास मत जिंकण्यासाठी अंतिम क्षणापर्यंत प्रयत्न केला. बहुतेक वेळा आमदारांनी आता काय होईल, यावर चिंता व्यक्त केली. इलेक्‍ट्रॉनिक मीडिया बेजबाबदारपणे वागला. सत्ता गेल्याचे मला दुःख वाटत नाही. मी आनंदाने या पदाचा त्याग करीत आहे.'' 

भाजपला टोमणा 
भाजप आणि जेडीएस युती सरकारवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ""भाजप आणि जेडीएस यांच्यातील युती करार लक्षात घेता मी आजही सांगेन, की 20 महिन्यांनंतर भाजपला मी सत्ता देण्यास तयार होतो. जेव्हा आम्ही त्या सरकारची स्थापना केली तेव्हा कोणत्याही केंद्रीय नेत्यांचा सहभाग नव्हता. पण, सत्ता हस्तगत करताना केंद्रीय नेत्यांनी हस्तक्षेप केला. ते देवेगौडा यांना भेटले आणि त्यांनी एक करार केला. मी भाजपला सत्ता दिली आणि येडियुरप्पा मुख्यमंत्री बनले. लालकृष्ण अडवानीही त्या वेळी उपस्थित होते. येडियुरप्पा यांनी हे लक्षात ठेवावे, की ते करारावर स्वाक्षरी घेण्यासाठी माझ्याकडे आले होते.'' 

बंडखोरांवर टीका 
मुख्यमंत्री म्हणून जे काही केले, त्याचे श्रेय माझ्या अधिकाऱ्यांना आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी आपल्या कामाचा अहवाल दिला. शेती कर्जाच्या रकमेसाठी आम्ही 25,000 कोटी रुपये बाजूला ठेवले आहेत. मी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्याने केला आहे. मी माझ्या शेतकऱ्यांना कधीच फसवत नाही. असंतुष्ट आमदारांवर त्यांनी रोष व्यक्त केला. त्यांच्या मतदारसंघांच्या विकासासाठी मंजूर केलेल्या अनुदानाची आकडेवारीच दिली. 

कर्नाटकात सत्ताहरण 
कर्नाटकातील सत्तानाट्य मंगळवारी अखेर संपले. विधानसौधमध्ये विश्‍वासदर्शक ठरावावरील मतदानात कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचा सत्तासूर्य अस्ताला गेला. आघाडीच्या पंधरा आमदारांनी बंडाचे निशाण फडकावल्याने कुमारस्वामी यांचे सरकार अल्पमतात आले होते, पण विश्‍वासदर्शक ठरावाची परीक्षा लांबणीवर टाकत कुमारस्वामींनीही सत्तासिंहासन आपल्याच ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला होता. सत्तेचा हा पेच सर्वोच्च न्यायपीठासमोर गेला खरा, पण तेथेही आघाडीच्या नेत्यांना दिलासा मिळू शकला नाही. मागच्या दाराने बंडखोरांशी तोडपाणी करू पाहणाऱ्या आघाडी सरकारचे विधिमंडळात मात्र पानिपत झाले. आता येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

विश्‍वासदर्शक ठरावाच्या बाजूने 99 
विश्‍वासदर्शक ठरावाच्या विरोधात 105 

आतापर्यंतचे औटघटकेचे मुख्यमंत्री 
मुख्यमंत्री--------------------दिवस--------- कालावधी 
- बी. एस. येडियुरप्पा (भाजप) ः 06 17 मे 2018 ते 23 मे 2018 
- बी. एस. येडियुरप्पा (भाजप) ः 07 12 नोव्हेंबर 2007 ते 19 नोव्हेंबर 2007 
- कडिडाळ मंजाप्पा (कॉंग्रेस) ः 73 19 ऑगस्ट 1956 ते 31 ऑक्‍टोबर 1956 
- एस. आर. कंठी (कॉंग्रेस) ः 98 14 मार्च 1962 ते 20 जून 1962 

एक वर्षाच्या आतील मुख्यमंत्र्यांची कारकीर्द 
मुख्यमंत्री-------------------दिवस--------कालावधी 
- रामकृष्ण हेगडे (जनता पक्ष) ः 342 8 मार्च 1985 ते 13 फेब्रुवारी 1986 
- एस. आर. बोम्मई (जनता पक्ष) ः 281 13 ऑगस्ट 1988 ते 21 एप्रिल 1989 
- वीरेंद्र पाटील (कॉंग्रेस) ः 314 30 नोव्हेंबर 1989 ते 10 ऑक्‍टोबर 1990 
- डी. व्ही. सदानंदगौडा (भाजप) ः 341 5 ऑगस्ट 2011 ते 11 जुलै 2012 
- जगदीश शेट्टर (भाजप) ः 304 12 जुलै 2012 ते 12 मे 2013 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com