प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

‘फॅमिली डॉक्‍टर’मध्ये विविध रोगांवर केलेल्या मार्गदर्शनाचा मला आजपर्यंत खूप उपयोग झालेला आहे. मला मधुमेह आहे, मात्र फार जास्त नाही. सध्या मला डोळ्यांसमोर कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे छोट्या छोट्या रेषा येत राहतात. नेत्र तज्ज्ञांकडून तपासणी करून घेतली असता त्यांनी डोळ्यांत-दृष्टीत कोणताही दोष नाही असे सांगितले. कृपया मार्गदर्शन करावे. मी सध्या संतुलनचे पांढरे काजळ वापरतो आहे.  .... खरे
उत्तर -
डोळ्यांना, दृष्टीला शक्‍ती मिळावी म्हणून रोज सकाळ-संध्याकाळ एक-एक चमचा संतुलनचे ‘सुनयन घृत’ घेण्याचा उपयोग होईल. अंजन नियमित वापरणे चांगले आहेच. आठवड्यातून दोन-तीन वेळा पादाभ्यंग करणे, रात्री झोपताना नाकात ‘नस्यसॅन घृता’चे किंवा साजूक तुपाचे दोन-तीन थेंब टाकणे, आठवड्यातून दोन वेळा बंद डोळ्यांवर ताज्या थंड दुधाच्या घड्या ठेवणे या उपायांचाही फायदा होईल. मधुमेह आहे, तपासण्यांमध्ये दोष नसला तरी त्रास  होतो आहे, तेव्हा तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली औषधी सिद्ध तुपाच्या नेत्रबस्ती घेणेही श्रेयस्कर.

माझा नातू दोन वर्षे सात महिन्यांचा आहे. त्याचे उच्चार स्पष्ट नाहीत. तो जे बोलतो ते कोणालाही कळत नाही. त्याच्या तब्येतीची अन्य कोणतीही तक्रार नाही. कृपया त्याचे बोलणे सुधारण्यासाठी मार्गदर्शन करावे. .... जयश्री
उत्तर -
स्पष्ट उच्चार हे बालकाच्या शक्‍तीशी निगडित असतात. त्यामुळे नातवाला दुधातून ‘संतुलन चैतन्य कल्प’, ‘संतुलन बालामृत’ नियमित देण्याचा उपयोग होईल. अंगाला ‘संतुलन बेबी मसाज तेला’चा अभ्यंग करण्याचाही फायदा होईल. काही दिवस सकाळ-संध्याकाळ अर्धा अर्धा चमचा ‘संतुलन ब्रह्मलीन सिरप’ देण्याचा उपयोग होईल. वैद्यांच्या सल्ल्याने जटामांसी, अक्कलकरा, पिंपळी वगैरे वनस्पतींचे मिश्रण जिभेवर चोळण्यानेही जीभ वळण्यास मदत मिळेल. मात्र आतून शक्‍ती वाढण्यासाठी वरील उपचार सुरू करणे चांगले. ज्या मुलांना सुरवातीपासून रामरक्षा ऐकवलेली  असते, त्यांचे उच्चार स्पष्ट असतात असा अनुभव आहे. अजूनही नातवाला रोज रामरक्षा ऐकवणे चांगले.

माझे वय ५८ वर्षे आहे. मला दारूचे व्यसन आहे. प्रत्येक महिन्यात मला उचकीचा त्रास होतो. एकदा उचकी लागली की ती दोन-तीन दिवस राहते. तरी कृपया आपण मार्गदर्शन करावे. .... मनोज
उत्तर -
दारूच्या व्यसनामुळे शरीरात कोरडेपणा व उष्णता वाढते, त्यातून उचकी लागण्याचा त्रास होतो आहे, दारूची सवय सोडणे हाच यावरचा मुख्य उपाय आहे. यामुळे उचकी लागणे तर बंद होईलच, पण इतरही अनेक रोगांना प्रतिबंध करता येईल. उचकी वरवर पाहता साधी वाटत असली तरी जेव्हा ती थांबत नाही तेव्हा फार कष्टदायक ठरू शकते, प्राणही धोक्‍यात आणू शकते. असे होऊ नये यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ‘सॅनकूल’ किंवा अविपत्तिकर चूर्ण घेता येईल, जेवताना किंवा एरवीही उकळलेले गरम पाणी पिण्याचा उपयोग होईल. उचकी लागेल तेव्हा मध किंवा दही-साखर चाटण्याचा उपयोग होईल. अहळीव पाण्यात भिजत घातले की ते काही वेळाने उलतात. ज्या पाण्यात अहळीव उललेले आहेत, त्या पाण्याचे  दोन-तीन थेंब या प्रमाणात नस्य करण्यानेही उचकी लागायची थांबेल.


मला ‘संतुलन’च्या शांती तेल व वातबल गोळ्यांचा खूप फायदा झाला आहे. सध्या माझ्या दोन्ही टाचा दुखतात. डॉक्‍टरांच्या गोळ्या घेतल्या की टाचा दुखायच्या कमी होतात, मात्र नंतर पुन्हा त्रास सुरू होतो. तरी कृपया मला यावर उपाय सुचवावा. ... सुनील
उत्तर -
टाचदुखीवरही ‘संतुलन वातबल गोळ्या’ घेण्याचा, त्याच्या बरोबरीने ‘कॅल्सिसॅन गोळ्या’ घेण्याचा उपयोग होईल. एक दिवसाआड पुढील उपाय योजण्याचा उपयोग होईल. अगोदर टाचेला थोडेसे ‘संतुलन शांती सिद्ध तेल’ लावावे. बांधकामासाठी वापरली जाते ती वाळू कढईमध्ये गरम करावी, जाडसर सुती कापडात या वाळूची पुरचुंडी बांधावी व पुरचुंडीने टाच शेकावी. पाच-पाच मिनिटांसाठी उजवी व डावी टाच शेकावी. एक दिवसाआड हा उपाय केला तरी काही दिवसांतच टाच दुखणे कमी होईल.

माझे वय २५ वर्षे आहे. लग्नाला दोन वर्षे झाली. माझी पाळी अगदी नियमित आहे. आम्ही चार महिन्यांपासून बाळासाठी प्रयत्न करत आहोत. तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्याने तपासण्या करून घेतल्या, त्यात बीजांड वेळेवर तयार होते असे समजले. तरीही गर्भधारणा झालेली नाही. मला सध्या योनीभागी खाज, जळजळ, अंगावरून पाणी जाणे असे त्रासही होत आहेत. ‘संतुलन’चे फेमिसॅन तेल वापरण्याचा उपयोग होईल का?  ... संजीवनी
उत्तर -
‘फेमिसॅन तेल’ वापरण्याचा फायदा होईल. सध्या होत असलेले त्रास पूर्ण बरे झाल्यावरच बाळासाठी प्रयत्न करणे चांगले. यासाठी ‘अशोक-ॲलो सॅन गोळ्या’, पुनर्नवाघनवटी, पुनर्नवासव घेण्याचा उपयोग होईल. रोज सकाळी एक चमचा अशोकादी घृत, ‘स्त्री संतुलन कल्प’ घालून दूध घेता येईल. उभयतांनी पंचामृत, बदाम घेणे चांगले. चार महिने हा तसा छोटा कालावधी होय. त्यामुळे निराश न होता इतर सर्व बाजूंनी शक्‍ती वाढविण्याचा प्रयत्न केला, तर योग्य वेळी गर्भधारणा होईल. स्त्री संतुलनाला हातभार लागण्यासाठी ‘स्त्री संतुलन’ (फेमिनाईन बॅलन्स) ही संगीत रचना रोज एकदा ऐकण्याचाही उपयोग होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com