मिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून

pata-varvanta.
pata-varvanta.

पाली - मिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून आहे. प्रचंड मेहनत, शारीरिक त्रास, मागणीत घट आणि शिक्षणाचा प्रसार यामुळे या पारंपारिक कारागिरांची पुढची पिढी मात्र आता या व्यवसायापासून दूर होऊ लागली आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा व्यवसाय करणारे गुंडप्पा धोत्रे (वय 70) यांच्या सोबत गप्पा मारून सकाळने या पारंपरिक व्यवसायची सद्यपरिस्थिती जाणून घेतली.

गुंडप्पा मूळ कर्नाटक मधील बेळगाव येथील रहिवासी आहेत. लहानपणापासून हातात छिन्नी व हातोडा घेऊन गावोगाव भटकंती करत ते दगडाला आकार देत आहेत. सध्या त्यांचा मुक्काम पालीमध्ये पंचायत समिती कार्यालयाजवळील रस्त्याच्या कडेला आहे. पत्नी यल्लमा आणि एका मुलासोबत ते येथे पाटा-वरवंटा व जाते बनविण्याचे काम करत आहेत. सोबत ओझे वाहायला 5 गाढव देखील आहेत. याआधी ते माणगाव मध्ये 4 महिने होते. गुंडप्पा यांना 6 मुलगे आणि 3 मुली आहेत. सर्वांची लग्ने झाली आहेत. 2 मुलगे सोडले तर दुसरे कोणीही त्यांचा हा पारंपारिक व्यवसाय करत नाहीत. इतर मुले मुंबईत रिक्षा चालवतात तर काही नोकरी करतात. एक मुलगा मुंबई महानगर पालिकेत नोकरीला आहे. आणि सर्व नातवंडे शाळा शिकतात. मुलांची मूल शिकतायत ते या धंद्यात नाय येणार! आम्ही शिकलो नाय ना म्हणून आम्हाला हे करावे लागते असे यल्लमा यांनी सकाळला सांगितले. त्यामुळे अजून काही काळानंतर केवळ व्यवसाय करणारे कारागीर नसल्याने हा व्यवसाय नामशेष होण्याच्या दाट शक्यता आहे.

दगडाच्या किंमती वाढल्या
गुंडप्पा यांनी सांगितले की पाटा वरवंटा बनवायला करुंग (काळा) दगड लागतो. त्यांनी हा दगड उल्हासनगर वरून आणला आहे. 400 दगडांना तब्बल 57 हजार रुपये मोजले. तर जाते बनवायला खुर्दी (पांढरट-चॉकलेटी) रंगाचा दगड लागतो. तो देखील कमी प्रमाणात मिळतो व महाग असतो.

प्रचंड मेहनत व शारीरिक त्रास
गुंडप्पा यांनी सांगितले एक जाते बनवायला संपूर्ण दिवस जातो. तर पाटा-वरवंटा दिवसाला 2 ते 3 होतात. एक जाते आकारानुसार साधारण 1 हजार ते पंधराशे रुपयांना विकले जाते. कधीकधी दिवसाला 5 ते 6 जाते विकली जातात तर कधी काहीच नाही. दिवाळी नंतर पाटे-वरवंटा आणि जात्याला खूप मागणी असते. मेहनतीचे चांगले पैसे मिळतात असे गुंडप्पांनी सांगितले. मात्र वर्षानुवर्षे छिन्नी आणि हातोड्याचे घाव मारल्याने पाठीचा कणा, छाती व खांदे असे अनेक अवयव उत्तर देतात. तर दगडाची भुकटी छातीत व फुफ्फुसात जाऊन श्वसनाचे विकार जडतात. यल्लमांनी सांगितले की गुंडप्पाना दर आठवड्याला डॉक्टरकडे हजार रूपये उपचारासाठी घालवावे लागतात. 

महाराष्ट्रात विशेषतः कोकणात अधिक मागणी व वापर पाटा-वरवंटा व जात्याला महाराष्ट्रात विशेषतः कोकणात अधिक मागणी असल्याचे गुंडप्पांनी सांगितले. यलम्मा म्हणाल्या की येथे दळणासाठी, डाळ, तांदूळ आदी भरडण्यासाठी जात्याचा तर वाटण्यासाठी पाटा-वरवंट्याचा अधिक वापर केला जातो. लग्न, पाचवी व नवीन घरात प्रवेश करतांना अशा अनेक विधी व सोहळ्यात देखील पाटा-वरवंटा व जात्याला मागणी असते. परंतु कर्नाटक मध्ये एकदा जाते, पाटा-वरवंटा कोणी खरेदी केला की ते वर्षभर त्याच्याकडे बघत नाहीत असे यल्लमा म्हणाल्या. त्यामूळे धोत्रे कुटूंबीय कर्नाटक पेक्षा महाराष्ट्रातच अधिक भटकंती करते. महाराष्ट्रातील प्रामुख्याने कोकणातील लोक खूप चांगले आहेत. राहायला मोफत जागा पण देतात, कोणी काय त्रास देत नाय असे यलम्मा यांनी सांगितले. 

हात-पाय चांगले असे पर्यंत हे काम करायलाच पाहिजे. आम्ही आहोत तोपर्यंत चाललय, पुढच्या पिढीकड व्यवसाय नाही. पुढं कोणी बघत नाय. 
- गुंडप्पा धोत्रे, पाटा-वरवंटा आणि जाते बनविणारे कारागीर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com