सिंधुदुर्गात बीएसएनएलचे नेटवर्क ठप्प 

सिंधुदुर्गात बीएसएनएलचे नेटवर्क ठप्प 

सावंतवाडी - जिल्ह्यामध्ये बीएसएनएल सेवेचे पुन्हा एकदा तीन तेरा वाजले. आज सकाळपासून पूर्ण जिल्ह्यातील टेलिफोन व मोबाइल सेवा विस्कळीत झाल्यामुळे जिल्हावासीयांमध्ये बीएसएनएल सेवेविरोधात संतप्त भावना दिसली. कोल्हापूर आणि गोव्याहून येणाऱ्या मार्गावर झालेल्या खोदकांमात ओएफसी केबल तुटल्यामुळे ही समस्या निर्माण झाली असल्याचा निर्वाळा बीएसनलकडून देण्यात आला. 

वारंवार होणाऱ्या खंडित सेवेमुळे ग्राहकांमध्ये बीएसएनएलबाबत मोठी नाराजी आहे. जिल्ह्यामध्ये बीएसएनएल मोबाईलधारक व टेलिफोनधारक यांचा मोठा वर्ग आहे. एकीकडे बीएसएनएलचे नवीन टॉवर उभारले आहेत; मात्र दुसरीकडे बीएसएनएलची सेवा वारंवार खंडित होण्याचे प्रकार घडत आहे. यामुळे ग्राहकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ज्या ठिकाणी ब्रॉडबॅंड सेवा आहे अशा ठिकाणी कार्यालयीन कामकाजात अडचणी येत आहेत.

वारंवार इंटरनेटमधील येणाऱ्या अडथळ्यामुळे लोकांची कामे रखडत आहेत. बीएसएनएल अंडरग्राउंड केबल असलेल्या ठिकाणी अनेक जागी अचानक खोदकाम करण्यात येते. याबाबत बीएसएनएलच्या अधिकारी किंवा तेथील कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात येत नाही. जेसीबीच्या साह्याने अचानक खोदकाम झाल्यामुळे बीएसएनएलच्या केबल तुटतात. याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील असलेल्या लाखो ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. त्यानंतर हे केबल जोडण्याचे काम दिवसभरात चालते. यामध्ये ग्राहकांचे मोठे नुकसान होते.

खोदकाम कोणत्या ठिकाणी सुरू आहे, कोण करत आहे, यामुळे ओएफसी केबलला धोका आहे का या बाबींचा विचार करून बीएसएनएलकडून पूर्वनियोजित कार्यवाही करण्यात येत नाही. याचीच पुनरावृत्ती आज झाली. सकाळपासून पूर्ण जिल्ह्यातील बीएसएनएल सेवा बंद झाली. एकाचवेळी सगळीकडे सेवा बंद होण्याचा प्रकार घडल्याने प्रचंड संताप निर्माण झाला. दुपारी 3 च्या दरम्यान काही भागात सेवा सुरू झाली.

आज आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने शासकीय कामकाजावर याचा विशेष परिणाम झाला. इंटरनेट बंद असल्याने अनेक कामे रखडली. 

लाखोंच्या संख्येने ग्राहक असूनही बीएसएनएल मात्र चांगल्या सेवा देण्याबाबत कोणतीही हालचाल करताना दिसत नाही. त्यामुळे लोकांनी बीएसएनएल सिम कार्ड अन्य खासगी कंपन्यांच्या नेटवर्कमध्ये परिवर्तित केले आहेत. बीएसएनएल ब्रॉडबैंड सेवाही वारंवार ठप्प होत असल्यामुळे हा ग्राहकही खासगी कंपन्यांकडे वळत आहे. 

कोल्हापूर व गोव्याहून येणाऱ्या मार्गावर दोन ठिकाणी रात्री खोदकाम झाले. त्याचे लोकेशन नेमके कळू शकत नाही. हे खोदकाम आपल्या जिल्ह्यात झाले. नसून कोल्हापूर व गोवा परिसरातच झाले आहे. तुटलेली ओएफसी केबल दुपारी जोडण्याचे काम केले आहे. 
- एम. बी. टोंगळे,
जनसंपर्क अधिकारी, बीएसएनएल. 

नेटवर्क असून उपयोग काय 
जिल्ह्यामध्ये वर्षभर 25 च्या आसपास नवीन टॉवर कार्यान्वित केले आहेत. त्यातील काही सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक टॉवर बीएसएनएलचे आहेत. त्यामुळे बीएसएनएल गावागावात पोचले आहे. असे असतानाही सुरळीत सेवा देण्याकडे बीएसएनएलने लक्ष देणे गरजेचे आहे. 

दृष्टीक्षेप... 

  • बीएसएनएल ब्रॉडब्रॅण्ड ग्राहक : 19 हजार 913 
  • बीएसएनएल मोबाईल ग्राहक : 3 लाख 84 हजार 771 
  • टू जी टॉवर : 215 
  • थ्री जी टॉवर (कमबाईन) : 155 
  • नवीन मंजूर टॉवर : 104 
  • नवीन कार्यांन्वित टॉवर : 28 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com