किसान क्रांतीचे १९ फेब्रुवारीपासून ‘देता की जाता’ आंदोलन

किसान क्रांतीचे १९ फेब्रुवारीपासून ‘देता की जाता’ आंदोलन

मालवण - शेतकर्‍यांच्या ३४ हजार कोटीची कर्जमाफी, हमीभाव, स्वामीनाथन अहवालाची अंमलबजावणी केली जाईल यासह अन्य मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या. मात्र गेल्या दिड वर्षात याची कार्यवाही न करता शेतकर्‍यांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम केले, असा आरोप किसान क्रांती जनआंदोलनचे प्रणेते जयाजी सूर्यवंशी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.  

राज्यातील शेतकर्‍यांच्या आंदोलनासह अन्य आंदोलने दडपण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. हे शासन शेतकर्‍यांच्या विरोधातील असल्याने येत्या १९ फेब्रुवारीपर्यंत या शासनाला डेडलाईन देण्यात आली आहे. त्यानंतर ‘देता की जाता’ असे राज्यभरात भाजप विरोधात तीव्र आंदोलन उभारले जाईल

- जयाजी सूर्यवंशी  

येथील हॉटेल शिरगावकर येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी किसान क्रांती जनआंदोलनाचे समन्यवयक लक्ष्मण वंगे, अनंत कान्होरे, शंकर दरेकर, प्रदीप बिल्होरे, योगेश रायते, दत्ता सुराळकर उपस्थित होते.

श्री. सूर्यवंशी म्हणाले, जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा येथून २६ जानेवारीला या आंदोलनाची सुरवात झाली आहे. १९ फेब्रुवारीला शिवजयंती दिनी शिवनेरी किल्ल्यावर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. राज्यातील भाजप सरकारने गेल्या साडे चार वर्षात शेतकर्‍यांसह जी विविध आंदोलने झाली ती दडपण्याचे काम केले आहे. नुकतेच झालेले अण्णा हजारेंचे आंदोलनही या सरकारने चिरडले.

राज्यात १७ हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकर्‍यांनी पुकारलेल्या संपावेळी कर्जमाफी, स्वामीनाथन अहवालाची अंमलबजावणी, हमीभाव, वीजमाफी यासह अन्य सतरा मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या. मात्र दिड वर्षात त्याची कार्यवाही न केल्याने या भाजप सरकारला शेतकर्‍यांच्या समस्यांचे सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.

- जयाजी सूर्यवंशी  

किसान क्रांती जनआंदोलनच्यावतीने आम्ही निवडणूक लढविणार नाही. मात्र २०१९ च्या निवडणूकीची दिशा ठरविण्याची ताकद ही राज्यातील शेतकर्‍यांमध्ये आहे. त्यामुळे या सरकारकडून शेतकर्‍यांच्या मागण्यांवरील कार्यवाही न झाल्यास भाजपला हादरा देऊ, असा इशाराही सूर्यवंशी यांनी दिला. 

कृषीमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलन

कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी कर्जमाफीची जबाबदारी आपण घेत असल्याचे जाहीर केले मात्र त्यावरील कार्यवाही न झाल्याने २४ फेब्रुवारीला त्यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी श्री. सूर्यवंशी यांनी दिला. 

कोकणातील शेतकर्‍यांसह, मच्छीमारांचे प्रश्‍नही गंभीर आहेत. त्यामुळे पुढील महिन्यात कोकणात व्यापक मोहिम राबवून या चळवळीत कोकणातील शेतकरी, मच्छीमारांचे प्रश्‍नही घेतले जाणार आहेत. कोकणात सहकार वाढलेला नाही. येथील शेतकरी संघटित नाहीत. त्यामुळे त्यांच्या समस्यांकडे शासनाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. नाणारसारखे प्रकल्प आणून कोकणला डंपिग गाऊंड बनविण्याचे षडयंत्र शासनाचे आहे. त्यामुळे याविरोधात कोकणातील शेतकरी, मच्छीमारांनी एकत्रित येत लढा उभारण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com