मालिका पराभवाची भारतावर नामुष्की

मालिका पराभवाची भारतावर नामुष्की

नवी दिल्ली - पहिले दोन सामने जिंकून मालिका विजयाच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या भारतीय संघावर ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका गमावण्याची नामुष्की ओढावली. विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर अखेरच्या मालिकेतला सलग तिसरा आणि अखेरचा सामना भारताने ३६ धावांनी गमावला. ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-२ अशी जिंकली. शतकवीर उस्मान ख्वाजा त्यांच्या विजयाचा मुख्य शिल्पकार ठरला.

एरवी मायदेशात कमालीचे वर्चस्व राखणाऱ्या भारताच्या मायदेशातील साम्राज्याला धक्का दिला. २००९ नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची मायदेशातील एकदिवसीय मालिका प्रथमच गमावली. मोहालीतील सामन्यात दवाने घात केला, अशी कारणे देणाऱ्या भारतीय संघाच्या प्रमुख फलंदाजांनी दिल्लीत नांगी टाकली. अपवाद मात्र रोहित शर्माच्या अर्धशतकाचा, परंतु सर्व संघ आशेने पाहात असताना तोही अपेक्षा पूर्ण करू शकला नाही.

उस्मान ख्वाजाच्या शतकामुळे २७२ धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारताला २३७ धावांत गुंडाळले. कर्णधार विराट कोहली, शिखर धवन आणि रिषभ पंत यांनी घरच्या मैदानावर निराशा केली. मोहालीतील सामन्यात दणकेबाज शतक करणारा धवन आणि विराट यांना ऑस्ट्रेलियाच्या स्टोईनिस आणि कमिन्स या वेगवान गोलंदाजांनी बाद केले. त्यानंतर लियॉन आणि झॅम्पा या ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांनी मधल्या फळीलाही सावरू दिले नाही. 

भारताच्या एकवेळेसच्या ६ बाद १३२ अशा अवस्थेनंतर केदार जाधव आणि भुवनेश्‍वर यांनी ९१ धावांची भागीदारी करून आशा पल्लवित केल्या खऱ्या; परंतु २२३ या धावसंख्येवर दोघेही बाद झाले आणि भारताचा खेळ खल्लास झाला. 

उस्मान ख्वाजाचे शतक
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या ऑस्ट्रेलियाने मोहालीतील सामन्याचाच पुढचा डाव जणूकाही सुरू केला होता. उस्मान ख्वाजा आणि कर्णधार ॲरॉन फिन्च यांना चांगलीच लय सापडली होती. भारताने या सामन्यासाठी बुमरा-शमी-भुवनेश्‍वर कुमार या वेगवान गोलंदाज मैदानात उतरवले; परंतु विकेट काढण्याबरोबर धावा रोखतानाही त्यांची दमछाक झाली. 

ऑस्ट्रेलियाच्या डावाला १ बाद १७५ वरून ६ बाद २२५ अशी  वेसण घातली. पण तळाला रिचर्डस्‌न आणि कमिन्स यांनी शंभरपेक्षा अधिक स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. त्यामुळे कांगांरूंना २७२ पर्यंत मजल मारता आली. 

संक्षिप्त धावफलक 
ऑस्ट्रेलिया - ५० षटकांत ९ बाद २७२ (उस्मान ख्वाजा १०० -१०६ चेंडू, १० चौकार, २ षटकार, हॅंडस्‌कोम्ब ५२ -६० चेंडू, ४ चौकार, रिचर्डस्‌न २९, कमिन्स १५, भुवनेश्‍वर कुमार ३-४८, महंमद शमी २-५७, जडेजा २-४५) 

पराभूत वि. भारत - ५० षटकांत सर्व बाद २३७ (रोहित शर्मा ५६ -८९ चेंडू, ४ चौकार, केदार जाधव ४४ -५७ चेंडू, ४ चौकार, १ षटकार, भुवनेश्‍वर कुमार ४६ -५४ चेंडू, ३ चौकार, ३ षटकार, कमिन्स २-३८, रिचर्डस्‌न २-४८, स्टोइनिस २-३१, झॅम्पा ३-४६).

लक्षवेधी...
    २-० आघाडीनंतर मालिका दोनदा गमावणारा भारत हा एकमेव संघ, यापूर्वीही ही नामुष्की ऑस्ट्रेलियाविरुद्धच
    भारताने मायदेशात यापूर्वी सलग तीन वन-डे लढती ऑस्ट्रेलियाविरुद्ध २००९ मध्ये गमावल्या होत्या. 
    ऑस्ट्रेलियाने दोन वर्षांत प्रथमच सलग तीन वन-डे लढती जिंकल्या, 
    रोहित शर्माच्या २०० डावात वन-डेतील ८ हजार धावा पूर्ण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com