Loksabha 2019 : ‘पुण्याचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास’

Mohan-Joshi
Mohan-Joshi

पुणे - पुणे हा काँग्रेस आघाडीचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या पाच वर्षांत शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. हे चित्र बदलण्यासाठी काँग्रेसचा एक निष्ठावंत सैनिक म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरलो असून, पुणेकरांचा आपल्याला मनापासून पाठिंबा मिळेल, असा विश्‍वास काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. 

पुण्यात आपली सामाजिक आणि राजकीय जडणघडण कशी झाली? 
-
मी सर्वसाधारण कुटुंबातून आलो आहे. घरच्या परिस्थितीमुळे दहावीपर्यंतच शिक्षण झाले. पुढे काम करीत घरच्यांना आर्थिक हातभार लावला.

शाळेपासूनच मला सामाजिक कामाची आवड होती. सुरवातीला मी एका दैनिकात बातमीदार म्हणून काम केले. त्यानंतर मुक्त पत्रकार म्हणून काम केले. याच काळात लोकांच्या प्रश्‍नांची जाण झाली आणि ते सोडविण्यासाठी झटत राहिलो. त्यातून मी युवक काँग्रेसमध्ये दाखल झालो. 

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या पराक्रमी, समतावादी राजांना मी दैवत मानतो. महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणा, नेतृत्वाने लाभलेला पुरोगामी, सर्वसमावेशकतेचा वारसा, तर दुसरीकडे लोकमान्य टिळक यांचे कार्य, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉ. गोपाळकृष्ण गोखले, धोंडो केशव कर्वे आदींच्या उदारमतवादामुळे मी प्रभावित झालो होतो. त्याचसोबत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामामुळे मला नवी सामाजिक दृष्टी मिळाली. याच्या बळावरच आयुष्यभर गरिबांसाठी कार्य करण्याची ऊर्जा मिळाली. 

शहरातील समस्या सोडविण्याचे शिवधनुष्य आपण कसे पेलणार? 
-
आपल्या शहरात सर्व क्षेत्रांतील कार्यरत असणारी भरपूर तज्ज्ञमंडळी आहेत. प्रशासन, पोलिस खाते, सैन्यदल, आदींमध्ये सर्वोच्च पदावर काम केलेले असंख्य अधिकारी निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक होतात.

त्याचप्रमाणे शिक्षणतज्ज्ञ, लेखक, पर्यावरणवादी कार्यकर्ते, कष्टकरी जनतेचे नेते, विचारवंतदेखील पुण्याचे नागरिक असणे हे खरंतर पुण्याचे वैभव म्हणता येईल. अशा सर्व मंडळींशी सल्लामसलत करून, पुण्याच्या विकासासाठी आणि विविध समस्या सोडविण्याच्या कार्यात त्यांचा सहभाग घेता येईल. शहरातील विविध प्रभागांमध्ये जनता दरबार भरवण्यासाठी वेळापत्रक आखण्याचे, तसेच सोशल मीडियावरून लोकसंपर्क साधून, सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे ठरविले आहे.

आमदार म्हणून शहरासाठी काय कामगिरी केली? 
-
पक्षाने मला विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून (२००८ ते २०१४) काम करण्याची संधी दिली. पिण्याचे पाणी, कचरा वाहतूक, बेरोजगारी, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण, आदी समस्या सोडविण्यावर माझा भर राहिला आहे. थोर देशभक्त केशवराव जेधे चौकात स्वारगेट उड्डाण पुलाचा प्रस्ताव मार्गी लावणे, पानशेत पूरग्रस्तांच्या मालकीहक्काची घरे, रिक्षा व टॅक्‍सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ, मागासवर्गीय आणि ओबीसी समाजासाठी पक्की घरे व बीपीएल कार्डसारख्या सेवासुविधा पुरवणे, सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला शासनसेवेत घेण्याचा आग्रह, अल्पसंख्य जैन समाजास दाखल्यांची व्यवस्था आदी कामे केली. 

मागील पाच वर्षे आपण विरोधी पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून शहरात सक्रिय होतात. पुणेकरांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी काय केलेत? 
-
मागील पाच वर्षांत शहर विकासाची सर्व कामे ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळते. अगदी पिण्याच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न नियोजनशून्यतेने हाताळण्यात आला. त्यामुळे पुणेकरांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. त्यादृष्टीने पावसाची अनियमितता, लोकसंख्यावाढ आणि सर्व बाजूंनी शहर विस्ताराचा वेध घेऊन, राज्य शासन पुणे महापालिका आणि पाटबंधारे खात्याने मिळून पाण्याच्या वितरणाचे सुयोग्य आणि अतिशय गंभीरपणे नियोजन करणे गरजेचे होते. मात्र, शहरात तीन खासदार, पालकमंत्री, आठ आमदार आणि नगरसेवक सत्ताधारी असतानादेखील हा प्रश्‍न सुटला नाही. 

आपण हेल्मेटसक्तीला विरोध केलात, त्याबाबतची आपली भूमिका काय आहे ?
-
माझा हेल्मेट सक्तीला तत्त्वत: विरोध नाही. परंतु मागील काही महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील पोलिस खात्याने अचानकपणे हेल्मेटसक्ती लागू केली. त्यानंतर जवळपास दीड ते पावणेदोन लाख विनाहेल्मेट वाहनचालकांकडून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या सक्तीला असंख्य पुणेकरांनी जाहीर विरोधही केला. या सक्तीविरोधी आंदोलनात मी पण सहभागी झालो. हा निर्णय घेताना लोकांना योग्य पूर्वसूचना देणे, त्याबाबत नागरिकांशी संवाद साधून, त्यांचे प्रबोधन करणे आवश्‍यक होते. मात्र तसे झालेले नाही.  खासदार म्हणून निवडून आल्यानंतर महापालिका हद्दीत हेल्मेट ऐच्छिक करावे, यासाठी मी खासगी विधेयक आणेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com