मरगळलेल्या कॉंग्रेसला संजीवनी देण्याचे आव्हान !

Balasaheb-Thorat
Balasaheb-Thorat

मुंबई - गटातटातील टोकाचे राजकारण, कमालीचा विस्कळितपणा, हरवलेला आत्मविश्‍वास आणि राज्यस्तरावरील मान्यवर नेत्यांचा अभाव अशा अवस्थेत मरगळीचा विळखा बसलेल्या राज्यातील कॉंग्रेसला संजीवनी देण्याचे आव्हान नवे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासमोर आहे.

विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर आली आहे. अशा कठीणवेळी नगर जिल्ह्यातील संगमनेर येथून सलग सात वेळा निवडून आलेल्या बाळासाहेब थोरात यांना कॉंग्रेस पक्षाने प्रदेशाध्यक्ष केले आहे. त्यांच्यापुढे आव्हानांचा डोंगर आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून मंत्रिपद पटकावले आहे. विखे यांचे चिरंजीव सुजय विखे नगरमधून भाजपचे खासदार आहेत. त्यामुळे थोरात यांना विखे यांच्या रुपाने नगर जिल्ह्यातूनच मोठे आव्हान मिळणार आहे. नगरमध्ये कॉंग्रेसचे जितके नुकसान करता येतील तितके विखे करणार, हे उघड आहे. विखे यांना थोरात कसा शह देतात, यावरही थोरात यांची कामगिरी जोखली जाणार आहे. आत्मविश्‍वास हरवलेल्या कॉंग्रेसमधील आजी-माजी आमदारांना थोपवून ठेवण्याची करामत थोरात यांना करावी लागणार आहे. अलीकडेच विखे यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील आमदार आपल्या संपर्कात आहेत, असे विधान केले आहे. कॉंग्रेसचे अब्दुल सत्तार, जयकुमार गोरे, भारत भालके, कालिदास कोळंबकर हे आमदार विखे यांच्याप्रमाणेच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्‍यता आहे.

राज्यातील कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची फळी सक्रिय राजकारणातून जवळपास संपल्यात जमा आहे. विलासराव देशमुख यांच्या पश्‍चात मराठवाड्यात कॉंग्रेसला त्यांच्या तोडीचे नेता मिळाला नाही. अशोक चव्हाण यांचा लोकसभेला दारुण पराभव झाला आहे. तर राजीव सातव यांनी लोकसभा लढण्यास माघार घेतली. विदर्भात कॉंग्रेसला जनाधार आहे. मात्र पक्षाला बळ देण्यासाठी विजय वडेट्टीवर, नाना पटोले, यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप आदींना एकदिलाने काम करण्यास भाग पाडणे यासाठी देखील थोरात यांना कष्ट घ्यावे लागणार आहेत.

पक्षासाठी द्रव्यबळ ओतावे लागणार !
आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करून कॉंग्रेस पक्षाची राज्यातील ताकद वाढविण्यासाठी द्रव्यबळ गोळा करण्याची तसेच खर्च करण्याची मोठी जबाबदारी अध्यक्षांना पेलावी लागणार आहे. त्यावर पक्षाचे यश अवलंबून आहे. हे फार मोठे आव्हान थोरात यांच्यापुढे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com