मराठवाड्यात वीज पडून तिघे ठार 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - सूर्यनारायण कोपलेला असताना मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत गुरुवारी (ता. चार) विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली. वीज पडून बीड आणि जालना जिल्ह्यांत तिघांचा मृत्यू झाला. पाऊस, गारपिटीने रब्बीतील गहू, हरभरा आदी पिकांसह फळबागांना फटका बसला. ठिकठिकाणी वादळामुळे कैऱ्या गळून पडल्या. 

महिला, युवक ठार 
बीड : 
जिल्ह्यातील अंबाजोगाई, परळी, केज, आष्टी, किल्लेधारूर, गेवराई, माजलगाव शिरूर कासार या तालुक्‍यांत पावसाने हजेरी लावली. केज व अंबाजोगाईत पावसाचा जोर होता. या दोन्ही तालुक्‍यांत गाराही पडल्या. केज तालुक्‍यातील कासारीजवळ वीज पडून तारामती बाळासाहेब चाटे (वय 42) यांचा मृत्यू झाला, तर धनुकवड (ता. धारूर) येथे अशाच घटनेत संदीप श्रीकिसन काळे (18) हा ठार झाला. 

जालना जिल्ह्यात महिला ठार 
जालना :
घनसावंगी, परतूर, मंठा तालुक्‍यांसह विविध भागांत दुपारनंतर पावसाने हजेरी लावली. अंबड, भोकरदन तालुक्‍यांतही ढग दाटून आले होते. काही ठिकाणी वादळवारे वाहिले. सिरसवाडी (ता. घनसावंगी) येथे सायंकाळी सहाच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. शेतातील काम घाईघाईने आटोपून गावाकडे परतणाऱ्या सुनीता गंगाधर करे (34) यांचा वीज पडून मृत्यू झाला. दोन शेळ्याही दगावल्या. सुदैवाने संगीता थोरात बचावल्या. कुंभार पिंपळगाव परिसरात रात्री आठपासून पुन्हा विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. वीजपुरवठाही खंडित झाला. 

गहू, हळदीला फटका 
हिंगोली : 
जिल्ह्यात दुपारी चारच्या सुमारास मेघगर्जनेसह गारांचा पाऊस झाल्याने काढणीस आलेला गहू, हळद आणि कैऱ्यांना फटका बसला. हिंगोली - कळमनुरी मार्गावर सावरखेडा येथे वादळाने झाड पडल्याने वाहतूक काही वेळ बंद होती. गिरगाव (ता. वसमत) येथे सकाळी सातच्या सुमारास सरी कोसळल्या. हिंगोली शहरासह तालुक्‍यातील सिरसम, कनेरगाव नाका, कानडखेडा, आडगाव सवड, सेनगाव तालुक्‍यातील गोरेगाव, केंद्रा बुद्रुक, जवळा बुद्रुक, पळशी या गावांत गारांचा पाऊस झाला. कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ येथेही पाऊस झाला. हिंगोली शहरासह जिल्हाभरात रात्री उशिरापर्यत मेघगर्जना, पावसाची रिपरिप सुरू होती. 

सेलू तालुक्‍यात गारपीट 
परभणी :
परभणी, गंगाखेड, जिंतूर, सेलू तालुक्‍यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. सेलू तालुक्‍यातील हिस्सी शिवारात गारपीट झाली. 
 

मुक्रमाबाद, नांदेड : मुक्रमाबादसह परिसरात दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बीतील ज्वारी, हरभरा आदी पिकांना फटका बसला. आंबा, संत्री, चिंच यासह अन्य फळबागांचे नुकसान झाले. परिसरातील गोजेगाव, सावळी, हंगरगा, दापका (गुं.), हाळणी, चिंचगाव, देगाव, रावणकोळ, बिहारीपूर, भाटापूर, इटग्याळ (पंमू), सावरमाळ, लखमापूर, रावी, बामणी, परतपूर, बामणी, वळंकी, डोरनाळी, हासनाळ, मारजवाडी, आंदेगाव, भासवाडी, वडगीर आदी गावांत पाऊस झाला. मुदखेड शहर परिसरात बरडशेवाळा, बाऱ्हाळी, बिहारीपूर, बारूळ, फुलवळ आदी भागांत पाऊस झाला. नांदेड शहरासह जिल्ह्यातही अनेक भागांत दिवसभर ढगाळ वातावरण होते. 

लातूर जिल्ह्यात आंब्याचे नुकसान 
लातूर : 
लातूर शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. झाडे उन्मळून पडली. आंब्याचे मोठे नुकसान झाले. औसा तालुक्‍यातील पारधेवाडी येथे वीज पडून बैल दगावला. जढाळा (ता. चाकूर) येथे वीज पडल्याने मीरासाहेब वजीर शेख यांच्या शेतातील गोठा खाक झाला. अनेकांच्या घरांवरील पत्रे उडून गेले. 
अहमदपूर, उदगीर, शिरूर ताजबंद, चाकूर, शिरूर अनंतपाळ, देवणी तालुक्‍यातही पाऊस झाला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com