लातूर बाजारात व्यापारी, आडते संघर्ष पेटला

लातूर बाजारात व्यापारी, आडते संघर्ष पेटला

लातूर- लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात व्यापारी व आडते संघर्ष वाढत चालला आहे. काही व्यापारी खरेदी केलेल्या शेतमालाचे पैसेच वेळेवर देत नसल्याने आडते अडचणीत आले आहेत. यात वारंवार मागणी करूनही बाजार समिती लक्ष देत नाही. त्यामुळे बुधवारी (ता. 16) आडते रस्त्यावर आले. त्यांनी बाजार बंद पाडला. समिती कार्यालयासमोर आंदोलन केले. निषेधाच्या घोषणाही दिल्या. तीन तास हा गोंधळ सुरु होता.

या बाजार समितीत आठ दिवसात खरेदी केलेल्या शेतमालाचे पेमेंट व्यापाऱयांनी आडत्यांनी देण्याची प्रथा आहे. गेली अनेक वर्ष ही प्रथा सुरु आहे. पण बाजारातील पाच व्यापाऱय़ांनी गेल्या दोन तीन महिन्यापासून आडत्यांचे पेमेंटच केले नाही. वाढत वाढत ही रक्कम कोट्यावधींच्या घरात गेली आहे. त्यामुळे आडते अडचणीत आले आहेत. या व्यापाऱय़ांवर कारवाई करून पेमेंट द्यावे अशी मागणी आडत्यांकडून समितीकडे केली जात होती. पण समिती काही कारवाई करीत असा समज करून आडते आज रस्त्यावर उतरले. त्यांनी बाजार बंद केला. सौदाही होवू दिला नाही.

शेकडो आडते समितीच्या कार्यालयासमोर आले. सुरवातीला सभापती ललितभाई शहा यांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना बोलू दिले गेले नाही. त्यामुळे ते आपल्या कक्षात जावून बसले. त्यानंतर आडते मोठ्या संख्येने एकत्र आले. सभापतींच्या नावाने त्यांनी घोषणाबाजीही केली. तीन चार तास हा गोंधळ सुरु होता. व्यापारी संचालक सुधीर गोजमगुंडे, बाळू बिदादा यांनी आडत्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते. घटनास्थळी पोलिस आल्याने पुन्हा आडते चिडले होते. सभापतींनीच येवून म्हणणे मांडावे असा त्यांचा आग्रह होता. अखेर सभापती शहा आले. त्यांनी संबंधीत व्यापाऱयाच्या विरोधात बाजार समिती काय कारवाई करीत आहे, याची सविस्तर माहिती आडत्यांना दिली.

बाजार सुरु करण्याची विनंतीही त्यांनी केली. आडत असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य सोनवणे यांनी देखील पैसे वसूल करण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत, याची माहिती दिली. त्यानंतर आडते शांत झाले. पण बाजार मात्र बंदच राहिला. यात शेतकरी मात्र भरडला गेला.

बीपीचा अटॅक
आडते जास्तच आक्रमक झाले होते. अनेक अडते सभापतींच्या कक्षावर चालून गेले. तेथे एकच गोंधळ उडाला. यात आडते रमाकांत लोंढे यांना बीपीचा अटॅक आला. तातडीने त्यांना येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com