सहलीतील आजारपण

muktapeeth
muktapeeth

सहलीत बाई आजारी पडल्या. मुलाशी फोनवर बोलल्या आणि पुढच्या प्रवासात त्यांना काहीही त्रास झाला नाही.

आम्ही आधीच युरोपला पोहोचलो होतो. बाकीचे सहलकरी मागाहून आले. हॉटेलवर फडकेबाई भेटल्या. अनेक देश भटकत पॅरिसला आलो. डिस्नेलॅंडला गेलो. डिस्नेलॅंडमधील खेळ पाहत हिंडत होतो. जेवणाची वेळ झाली म्हणून ठरलेल्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. सेल्फ सर्व्हिस असल्याने आम्ही आपापली डिश भरून घेऊन बाहेरच्या बाजूला बसलो. इतक्‍यात फडकेबाईंना कसेतरीच व्हायला लागले. पाणी दिले, वारा घातला, पण त्यांना बरे वाटेना. त्यांना उलटीची भावना झाली. त्या पाणी प्यायल्या आणि त्यांना बरे वाटले. तोच तिथला व्यवस्थापक आमच्याजवळ आला व म्हणाला, "आमच्या आवारात त्या बाईंना त्रास झाला. तेव्हा त्यांना ताबडतोब दवाखान्यात न्यायचे आहे.' लगेच त्यांनी व्हीलचेअर आणली. त्यात बाईंना बसवले. आमच्याबरोबर आणखीन दोन-तीन जणी होत्या. त्यांनी आम्हा दोघांना तेथेच बसवले आणि त्या फडकेबाईंच्याबरोबर दवाखान्यात गेल्या. बराच वेळ झाला, तरी त्यांचा फोन आला नाही. वाट पाहून आम्ही दोघे दवाखान्यात गेलो. पाहतो तर, फडकेबाईंचा ईसीजी काढला जात होता आणि डॉक्‍टर सांगत होते, की त्यांच्या जिवाला धोका आहे, त्यांना आम्ही मोठ्या रुग्णालयामध्ये नेऊन काही दिवस उपचार देणार आहोत. त्या स्वतः सांगत होत्या, की मी आता व्यवस्थित आहे. रुग्णालयात थांबायची जरुरी नाही. पण, डॉक्‍टर त्यांना सोडायला तयार नव्हते. आम्ही आमच्या सहल व्यवस्थापकाला बोलावून घेतले. त्याने विनवल्यावर डॉक्‍टरांनी लगेच एका टॅक्‍सीत बसवून हॉटेलवर पाठवले. फडकेबाई अगदी व्यवस्थित होत्या. रात्री त्यांना चांगली झोप लागली होती. सकाळी उठले, तर बाई जीनबीन घालून पुन्हा प्रवासाला तयार! त्यानंतर दोन दिवसांनी फडकेबाईंना चक्कर आली. त्यांच्या तोंडावर पाणी मारले. मग त्या हळूहळू सावध झाल्या. फडकेबाईंच्या नकळत पुण्याला, त्यांच्या मुलाला फोन केला. सर्व परिस्थिती सांगितली. मुलगा आईशी फोनवर बोलला. त्यांनी मुलाला सांगितले, काही काळजी करू नको. आणि सहलीत त्यांना पुन्हा त्रास झाला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com